सौ उज्ज्वला केळकर
☆ सांजवेळ – – लेखिका : सुश्री शैलजा दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆
मी वनिता आणि ही माझी रोजनिशी… रोजनिशी म्हणते कारण मला दुसरं नाव आठवत नाही. ही तारीखवार लिहिलेली रोजनिशी नाही. ज्या दिवशी लिहिण्यासारखं घडेल किंवा लिहावं असं मनात येईल त्या दिवशी लिहिलेली ही डायरी आहे.
वयाची पंचाहत्तरी जवळ यायला लागली आणि मनात विचार येऊ लागला की आता वानप्रस्थाश्रम सोडून संन्यासाश्रमाकडे वाटचाल सुरु करायला हवी. ह्याची पहिली जाणीव त्या दिवशी झाली.
दाराची बेल वाजली. दार उघडलं तर दारात सामान घेऊन वाणी उभा. मी म्हटलं, अरे, आम्ही तर यादी दिली नव्हती. तो म्हणाला, सकाळीच तर वहिनीसाहेब यादी देऊन गेल्या. तो सामान ठेवून निघून गेला. ही पहिली वेळ होती जेव्हा सुनेने माझ्याशी चर्चा न करता वाण्याला महिन्याच्या सामानाची यादी दिली होती. सामानातही खूप बदल झाला होता. गव्हाच्या ऐवजी तयार आट्याची पाकिटं आली होती. तेलही बदललं होतं. तुकडा बासमतीऐवजी अख्खा बासमती आला होता. त्या दिवशी ठरवलं, आता स्वयंपाकघराचा मोह सोडून तिथून बाहेर पडायचं. त्यात लुडबुड करायची नाही. बाहेर बसून भाजी निवडणं वगैरे एवढीच मदत करायची.
दुसऱ्या दिवशी रविवार होता. मुलगा म्हणाला, आई, उद्या आम्ही सर्व जण सिनेमाला जातो आहोत. तुझं पण तिकीट काढणार होतो, पण त्या थिएटरला पायऱ्या खूप आहेत. तुला त्रास होईल म्हणून तिकीट काढलं नाही. तो म्हणाला ते खरं होतं. अलीकडे पायऱ्या चढताना खूप दम लागायचा. त्या दिवसापासून जाणवलं, आता नाटक, सिनेमा ही मनोरंजनं बंद करायला हवीत. घरातच टीवी, फोन, वाचन ह्यात मन रमवायला हवं.
नात पार्टीला गेली होती. खूप उशीर झाला होता. एक वाजत आला होता. माझा डोळ्याला डोळा लागेना. तिची काळजी वाटत होती. तिचे आईवडील शांत होते. ती आल्या आल्या मी म्हटलं, अगं, किती उशीर! पण माझं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच ती म्हणाली, अगं आजी, मी आईबाबांना सांगून गेले होते मला उशीर होईल म्हणून. तू कशाला एवढी काळजी करतेस? तिच्या त्या ‘तू कशाला एवढी काळजी करतेस?’ ह्या वाक्याने मला जागं केलं. खरंच, तिची काळजी करायला तिचे आईवडील समर्थ आहेत. मी कोण तिची काळजी करणारी? माझा काय संबंध? त्या दिवसापासून ठरवलं, भावनांना आवर घालायचा. कशातच गुंतायचं नाही.
तुका म्हणे उगी राहावे। जे जे होईल ते ते पाहावे।
घरच्या आघाडीवर अशी हळूहळू निवृत्त होत असताना शरीरानेही वृद्धत्वाची जाणीव करून द्यायला सुरुवात केली होती. पहिला नंबर लावला पायांनी. जरा जास्त वेळ उभं राहिलं की पाय भरून यायला लागले. चालताना किंवा बसल्यावर एवढं जाणवत नव्हतं, पण उभं राहिलं की त्रास होत होता. शॉपिंगला किंवा कुठे समारंभाला गेलं तर चटकन कुठे बसायला जागा मिळते का ते बघायला लागले. हळूहळू शॉपिंग, समारंभ हे बंदच केलं. रस्त्यावरून चालण्याचा आत्मविश्वास कमीकमीच होत गेला. कोणीतरी बरोबर असावं असं वाटायला लागलं. आणि मग बाहेर जाण्यावर बंधनंच आली.
नंतर जाणीव करून दिली दातांनी. दात दुखत नव्हते, पण त्यांचे तुकडेच पडत होते. म्हणून डेंटिस्टकडे गेले. त्यांनी खालचे सर्व दात काढायला सांगितले. ते दात काढून नवीन बसवण्यात दोन महिने निघून गेले. हे दोन महिने खाण्याचे फार हाल झाले. अगदी खूप शिजवलेलं किंवा पातळ खाणंच खाता येत असे. त्याचा तब्येतीवरही परिणाम होत होता. कवळी बसवल्यानंतरही ती सेट होईपर्यंत खूप त्रास झाला. कवळी घातली की हिरड्या सोलवटायच्या. शेवटी एकदाची ती कवळी सेट झाली पण तेव्हापासून अन्नाची चवच गेली.
जास्त वेळ बसलं की पाठ आणि कंबर दुखायला लागली. ह्या साऱ्यामुळे माझं जगच आक्रसून गेलं. एरवी सगळीकडे बेधडक वावरणारी मी, पायाच्या दुखण्यामुळे शॉपिंग, समारंभ बंद झाले. एकटी जाण्याचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे रस्त्यावर जाणंच बंद झालं. मी आता कॉलनीतच फेऱ्या घालू लागले. पण तिथेही एक दिवस चालताना ठेच लागली आणि पडता पडता वाचले. त्यामुळे तोही आत्मविश्वास गमावला. खाली जायची भीती वाटायला लागली. शेवटी माझी खोली, माझा पलंग आणि मदतनीस ठेवलेली बाई एवढंच माझं संकुचित जग झालं. बाहेर कुठे जायची दगदग नकोशी वाटू लागली.
वृद्धत्व जवळ जवळ येत होतं पण त्यातही काही सोनेरी क्षण येतात जे मनाला उभारी देऊन जातात. मुलगा ऑफिसमधून लवकर घरी येतो. आल्यावर माझ्या खोलीत येतो. पलंगाजवळ खुर्ची घेऊन बसतो आणि माझी चौकशी करतो. आई तू बरी आहेस ना? गोळ्या नीट वेळेवर घेतेस ना? वेळच्या वेळी जेवत जा. व्यायाम कर. त्याचे हे प्रश्न अगदी साधे असतात पण त्यातल्या आपुलकीच्या स्पर्शाने माझं मन आनंदाने भरून येतं.
एक दिवस रात्री जेवताना सून म्हणते, आई, तुम्हाला पोळी चावताना त्रास होतो ना? मी रात्री तुमच्यासाठी घावन करत जाईन. चावायला सोपं आणि पचायलाही हलकं. तिची ही काळजी मनाला हळुवार स्पर्श करून जाते.
चष्मा लावून गोळ्यांची नावं वाचताना नात तिथे येते आणि म्हणते, आजी तुला गोळ्या रोज शोधाव्या लागतात ना? दर रविवारी मी आठवड्याच्या गोळ्यांच्या पुड्या करून ठेवत जाईन. हिरव्या पुडीतल्या गोळ्या सकाळी लाल पुडीतल्या रात्री घ्यायच्या. ते तुला सोपं होऊन जाईल. गोष्ट साधीशीच पण मन भरून येणारी.
नातवाचा वाढदिवस दुसऱ्या दिवशी असतो. तो म्हणतो, आजी! तुझा शिरा खूप सुंदर होतो. उद्या माझे मित्र येणार आहेत. तू शिरा करशील? दुसऱ्या दिवशी जास्त वेळ उभं न राहता येणाऱ्या माझ्या अंगात दहा हत्तीचं बळ संचारतं आणि मी शिरा करते. तो कसा झाला ह्यापेक्षा नातवाने करायला सांगितलं ह्याचाच आनंद फार मोठा असतो.
मार्केटमधून येताना सून तीन गाऊन्स घेऊन येते. म्हणाते आता घरात साडी नका नेसत जाऊ. पायात येते. पडायला होईल. घरात हे गाऊन्स घालत जा. घालायला सोपे आणि सुटसुटीत. तिने दाखवलेली काळजी मनाला भिडते.
एका रविवारी मुलगा म्हणतो, आई तू घराबाहेर जाऊ शकत नाहीस. आज आपण लॉंग ड्राईवला जाऊ या. तुलाही बाहेर पडल्यावर बरं वाटेल. आम्ही सगळेच बाहेर पडतो. खूप दिवसांनी भेटलेला बाहेरचा निसर्ग मनात भरून घ्यावासा वाटतो.
अश्या आंबटगोड आठवणी जागवताना मनात येतं, खरंच आता किती थोड्या अपेक्षा उरल्या आहेत. घरातल्या कोणीतरी रोज खोलीत येऊन आपुलकीने फक्त कशी आहेस असं विचारावं. सुनेने रोजचं जेवणाचं ताट मदतनीस बाईबरोबर न पाठवता एखाद दिवशी स्वतः घेऊन यावं. जवळ बसावं. चार गोष्टी बोलाव्यात. नातवंडानी वेळ मिळेल तेव्हा जवळ बसून तुटलेल्या बाहेरच्या जगातल्या चार गोष्टी सांगाव्यात. आजारी पडल्यावर कोणी तरी येऊन कपाळावर नुसता हात ठेवावा.
सांजवेळ ही हुरहूर लावणारी असते. आयुष्याची सांजवेळही अशीच हुरहूर लावते. गतायुष्यात केलेल्या चुका आठवून देणारी, छोट्याश्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असं वाटायला लावणारी…
… अशी ही सांजवेळ.
लेखिका : शैलजा दांडेकर
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈