श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ रावण – – – ☆ श्री सुनील देशपांडे

आजकालच्या काळात प्रत्येक व्यक्तीमध्येच रावण निर्माण झालेला आहे. पूर्वी असं म्हणत की प्रत्येकामध्ये राम असतो. पण आता प्रत्येक जण दहा डोक्यांचा झालेला आहे. त्यातलं पहिलं डोकं तो त्याचं स्वतःचं घेऊन जन्माला आलेला असतो. त्यामुळे ते स्व-बुद्धीचे डोकं त्याचं स्वतःचं असतं. त्यानंतर एकेक डोकी त्याला चिकटत जातात आणि तो दहा डोक्यांचा होतो.

पुढील नऊ डोकी हळूहळू माणसाला चिकटतात… 

१) फेसबुक २) व्हाट्सअप ३) ट्विटर ४) इंस्टाग्राम ५) टेलिग्राम ६) यु ट्यूब  ७) गूगल ८) सिनेमा ९) वार्तापत्रे… 

या नऊ डोक्यांबरोबर स्वतःचे मूळ डोकं स्वबुद्धी हे दहावं डोकं संभ्रमित होत असतं. किंबहुना या दहाव्या डोक्याला संभ्रमित करण्यासाठीच इतर नऊ डोकी त्याला चिटकवली जातात. मग प्रत्येकाचाच रावण बनतो.

अर्थात रावण हा कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि उत्तम राज्यकर्ता होता असे प्रत्यक्ष श्रीरामांनीच म्हटले आहे. फक्त त्याचे स्वतःचे डोके ज्या ठिकाणी वरचढ ठरते तेव्हाच फक्त तो चांगला ठरतो. इतर नऊ डोकी जेव्हा त्याच्या स्वतःच्या मूळ डोक्यावर मात करतात म्हणजेच स्वबुद्धीवर मात करतात तेव्हा हातून पापकृत्य घडते….. म्हणूनच आज आपल्या प्रत्येकामध्ये एक रावण दडलेला आहे. आपलं मूळ डोकं वापरण्यात जर आपण यशस्वी झालो तर आपण जीवनात सत्कृत्य करू शकतो.

इतर डोक्यांचा आपल्यावर किती प्रभाव पडू द्यायचा हे ज्याने त्याने ठरवायचे आहे. आपल्याला रावणच बनायचे आहे. दुसरा पर्यायच नाही. परंतु सत्कृत्य करणारा रावण की दुष्कृत्य करणारा रावण एवढेच आपण ठरवू शकतो. आपल्याला राम बनता येणे शक्य नाही. कारण या इतर डोक्यांना आपल्याला दूर ठेवता येणे शक्य नाही. म्हणून किमान आपली स्वबुद्धी वापरायला शिकणं एवढंच आपल्या हातात आहे.

रावणाचा विनाश होत नसतो. आज दसऱ्याच्या दिवशी रावण जाळण्याचा उत्सव आपण करतो असे म्हणतो पण रावणाची मूर्ती जाळणारे अनेक रावणच असतात. त्यात राम कुठेही नसतो. त्यामुळे हजारो वर्षे रावणाचे दहन करून सुद्धा रावण आहेतच. राम कुठे दिसतो का ते जळणारा रावण पहात असतो. कारण त्याला रामाच्या हातून मृत्यू हवा असतो. तेवढे सद्भाग्य सुद्धा आज रावणाला मिळत नाही. अनेक जिवंत रावण मिळून एका रावणाच्या प्रतिकृतीला जाळत असतात.

… जेंव्हा रामाच्या हातून सद्गती मिळेल तेव्हाच रावण संपतील. राम केव्हा कसे आणि कधी निर्माण होतील हेच रावणांनी पाहणं त्यांच्या नशिबात आहे का ? तोपर्यंत मात्र… 

… रावण जलता है। …. रावण अमर है।

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments