सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

ते भाग्यवान… ☆ सुश्री शीला पतकी 

शाळेला सुट्टी मिळालेल्या पोरासोराने अंगणामध्ये सुंदर किल्ला बांधला. मावळे विराजमान झाले.. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर अरुढ झाले.. जागोजागी भगवे झेंडे फडकू लागले… पोर आनंदाने टाळ्या पिटू लागली.. पहाटे अंगणात केरवारे झाले.. सडा टाकला गेला. सुंदर रंगवलीत रंग भरले गेले.. पणत्यांच्या  रूपाने आकाशीची नक्षत्र अंगणात ऊतरून आली.. अंगणाचे रूप कसे दिमाखदार रंगीबेरंगी झाले. नहाणी घरात सुवासिक तेलाचा आणि उटण्याचा सुवास दरवळू लागला.. घंगाळाच्या पाण्यातन वाफा निघू होऊ लागल्या… मनसोक्त पाण्याने आंघोळीझाल्या.. साबणाच्या वासाने देहाला घमघमाट आला. देवघरामध्ये मंत्रोच्चार होऊन पूजा झाल्या अभिषेक झाले देवासाठी केलेल्या खास बेसनाच्या लाडवांचा प्रसाद त्यांना दाखवला गेला. इथे पावेतो घरातल्या सगळ्या बायका नटून थटून तयार झाल्या नव्या साड्यांची सळसळ कानी येऊ लागली बैठकीच्या हॉलमध्ये पाट रांगोळी झाली फराळाची जय्यत तयारी सुरू झाली. सारी मंडळी आरतीसाठी देवघरात जमली आरती आणि प्रसाद झाल्यावर थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घेणं सुरू झालं नमस्कार आशीर्वाद झाल्यानंतर सगळी मंडळी फराळाच्या पानावर स्थानापन्न झाली लाडू चकली चिवडा शंकरपाळे कडबोळे अनारसे यांनी पान सजली पुरुष मंडळी बायकांचे कौतुक करून फराळावर ताव मारू लागली आणि बायका त्यांना आग्रह करून वाढू लागल्या… चेष्टा मस्करी हसणे खिदळणे आणि पोरट्यांचा कल्ला यात फराळ उरकला मग महिलांची पंगत.. छे छे बायकांची पंगत माज घरात रंगली.. पुरूष मंडळी गाद्यांवर सुपारी खात बैठक मारून होते. दिवाळी अंकाची पानं चाळण्यात सगळे मग्न. पोर सर्व फटाके उडवायला केव्हाच पळाली. आतून आजी आजोबांची लकेर  सावकाश उडवा रे – काळजी घ्या– भाजून घ्याल नाहीतर…. इत्यादी सूचनांचा भडीमार सुरू झाला पण लक्षात कोण घेतो ? पोरं फटाक्यात मग्न आणि बायका पुढच्या स्वयंपाकाला लागलेल्या….

असो… ! दिवाळीचे हे दृश्य फक्त आता कथा कादंबऱ्यात वाचावं. घरात इन मीन चार माणसं.. सगळं रेडीमेड.. फराळ, इडली वडा यांना डिशमध्ये स्थान आले. सगळ्यांनी मोबाईलमध्ये तोंड खूपसायचे आणि हॅप्पी दिवालीचे मेसेजेस पाठवायचे —-  

पण वरील वर्णनाची दिवाळी ज्यांनी अनुभवली ते भाग्यवान… अशा सर्व भाग्यवंतांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments