सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-८ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

मनातलं शब्दात..

असलेली नाती जपणं माणसं जोडणं, केव्हां कुणाची गरज लागेल सांगता येत नाही या धोरणांनी मैत्री वाढवणं, ही भावना मनांत जपणारी अशी ती पिढी होती. सहकार्याची वृत्ती असल्यामुळे आपआपसांतलं प्रेम वाढत होत. प्रिय मित्र आपल्या बरोबरीने चालत राहून, सगळ्या परिस्थितीत आपल्याला साथ देतात. तीच खरी मैत्री असते हो ना ?अशा आदर्श मैत्रीची जोडी आमच्या आईची आणि शांतामावशिची होती. खेरवाडीला चौथीपासून सुरू झालेली त्यांची मैत्री ऐंशी वर्षापर्यंत टिकली. म्हणजे सातव्या वर्षापासूनची मैत्री अतूट पणे 80 वर्षापर्यंत त्यांनी टिकवली. दोऱ्यात ओवलेलं साध मणी मंगळसूत्र आईच्या गळ्यात असायचं तर, शांतामावशी नखशिखांत सोन्याने मढलेली असायची. लष्करमधलं तिचं राजेशाही घर आमचं आकर्षण होत. ‘भरपूर चाला आणि फिट राहा ‘ हा कानमंत्र आईनानांनी आमच्या मनांत बालपणापासूनच रुजवला. बसचे दहा पैसे वाचवून लष्करला जाताना आई आमच्या हातात हरबऱ्याची गड्डी ठेवायची आणि म्हणायची, “हरबरा खात खात पायी जायचय बरं का आपल्याला.! ” लष्कर’ ह्या नावातच एक थ्रिल होतं ते ‘कॅम्प’ या शब्दाला येणार नाही. आत्ताच्या कॅम्प मध्ये जाताना अरुंद रस्ते, गर्दी, प्रदूषणामुळे होणारी गुदमर, जीव गुदमरून टाकणारा रस्ता, नक्को वाटतो. आता लोकं कायम ‘कॅम्प ‘ मध्ये खरेदी करायला दोन पायाची, दोन चाकी नाही वापरत, तर कारची चारचाकी वापरल्याशिवाय पुढे सरकत नाहीत.

तर काय सांगत होते हरबऱ्याची गड्डी घेऊन पोपटसर रंगाचे कोवळे दाणे अलगद जिभेवर ठेवून, खातांना तोंड चालायचे, दाणे सोलताना हात आणि चालताना पाय चालायचे. असा सहजसुंदर व्यायाम व्हायचा. आणि रस्ता मजेत सरसर सरायचा. जोगेश्वरी पासून सुरू झालेली आमची पावलं शिरीन टॉकीज अपोलो टॉकीजपाशी रंगीत पाट्या बघायला रेंगाळायची. पुढचं आकर्षण होतं, भोपळे चौकातल्या हेss भल्या मोठ्या लाकडी भोपळ्याचं. कवेत मावणार नाही असा भला मोठा भोपळा चौकांत कायम ठाण मांडून असायचा, ‘मेन स्ट्रीट’ वरून पळणाऱ्या चकचकीत गाड्या, मोठमोठे रस्ते आणि काउंटरवर गल्ला खुळखुळवत रुबाबात बसलेले गुलाबी, गोरे पारशी आणि त्यांच्या समोरच्या चॉकलेट, गोळ्या, क्रीमरोलने भरगच्च भरलेल्या बरण्या आमचं लक्ष वेधून घ्यायच्या. आई म्हणायची ” वेंधळ्यासारखे इकडे तिकडे बघत चालू नका. समोरून बर्फाची बैलगाडी येतीय, बैलांना द्या उरलेली हरभऱ्याची गड्डी. स्वच्छ रस्त्यावर असा कुठेही कचरा टाकायचा नसतो बरं का! . हं हे बघा! आलं आता मावशीच घर. ” … चढतांना आम्ही आरोळी ठोकायचो, “मावशी आम्ही आलो ग! “आणि मग दिलखुलास हसणारी मायसारखी माया करणारी ती माउली आम्हाला कुशीत घ्यायची. शांतामावशी आमची सख्खी मावशी नाही, आईची बालमैत्रीण आहे हे कुणाला सांगूनही खरं वाटायचं नाही. अशी माणसं, अशी निर्मळ, कृष्ण सुदाम्यासारखी मैत्री शोधूनही सापडणार नाही. ही मावशी नवरात्रात कार मधून, नऊ दिवस नित्यनेमाने जोगेश्वरीला यायची. मारुतीच्या शेपटासारखी लांबलचक, अगदी गणपती चौकापर्यंत पोहोचलेल्या, बायकांच्या रांगेत नथीचा आकडा सांभाळत, ओटीचं ताट सावरत उभी असलेली गोरीपान शांतामावशी उन्हाने लालेलाल व्हायची, खिडकीतून डोकावणाऱ्या आईचा जीव मैत्रिणीचा चेहरा बघून कासाविस व्हायचा. माठातल्या थंडगार पाण्याचा तांब्या आणि जिभेवर विरघळणारी आलेपाक वडी आई आमच्या हातून शांतीकडे पाठवायची. गौरी गणपतीच्या वेळेला तर त्यांच्या प्रेमाला उत्साहाला भलतच ‘ ‘भरतं ‘ यायचं. आमच्याकडच्या सवाष्णीला पुरणावरणाचा स्वयंपाक करून, जेवायला घालून, आई सवाष्ण म्हणून लष्कर मध्ये जायची आईचा पदर धरून आमच शेपूट बरोबर असायचचं. तेव्हा मात्र जाताना आई टांगा करायची. टकॉक.. टकॉक घोड्याच्या टापावर चालणारा टांगा आमच्यासाठी महारथ असायचा. आईसाठी पण ‘लष्कर’ मध्ये जाणं म्हणजे आनंदाची पर्वणी होती. सगळ्यांना पोटभर जेवायला घालून शांतामावशी आईची तिला चौरंगावर बसवून घसघशीत ओटी भरून, साडी चोळी देऊन मैत्रिणीला माहेरवाशिणीचा मान द्यायची. काही वेळा सख्ख्या नात्यापेक्षाही मानलेली नाती श्रेष्ठ ठरतात, नाही का?..

80 व्या वर्षांपर्यंत ही मैत्री अखंड चालू होती. दुर्दैवाने आमची आई आधी गेली. शांतामावशी म्हणाली, “माझी काठीच गेली आता मी कशाला जगु ? आणि खरंच भुतलावर तुटलेला धागा पुन्हा जोडण्यासाठी, मावशी पण आईच्या पाठोपाठ लगेचचं देवाघरी गेली. आणि आम्ही खऱ्या अर्थाने पोरक्या झालो. आई आम्हाला सोडून गेली, मावशी पण गेली. मनाला समजवावं लागतय, आता आई जोगेश्वरी हाच आपला आधारवड आहे. तिच्या चरणावर माथा टेकवून मी प्रार्थना करते…. “जय अंबे आई जोगेश्वरी तुझ्या मायेची पाखर सतत आम्हाला मिळू दे”.

– क्रमशः भाग आठवा

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments