श्री नितीन सुभाष चंदनशिवे
मनमंजुषेतून
☆ पैठणीवरचं नक्षीदार नातं… भाग – 2 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆
(बहिणीने मला बजावून ठेवलं. दोन तीन महिने इकडं यायचं नाव काढू नकोस. तिचा राग शांत झाला की मग ये. पण माझं धाडसच होत नव्हतं.) – इथून पुढे —-
तीन महिने होऊन गेले. वहिनीने एकही फोन केला नाही. माझं नाव काढलं तरी ती तिथून उठून जायची. तिचा राग शांत होण्याची लक्षणे दिसत नव्हती. आणि त्यातच आमच्या मोठ्या आत्तीच्या मुलीचे म्हणजे सोनालीचं लग्न ठरलं. वहिनीला घाबरून मी लग्नाला न जाण्याचा निर्णय घेतला. पण सोनालीने स्वतः फोन करून सांगितलं तू मला लग्नात हवा आहेस काहीही करून ये. मी ही मनात ठरवलं. काय व्हायचं ते होऊ दे. असं वहिनीपासून तोंड लपवून कुठवर राहायचं. एकदाच काय असेल ते होऊ दे राडा. जीव तर घेणार नाही ना ती. आणि मी लग्नाच्या दिवशीच डायरेक्ट मंडपात हजर व्हायचं. लग्न करून तिथूनच माघारी यायचं असा निर्णय घेतला.
तो दिवस उगवला. मनात धाकधूक घेऊनच प्रवास केला. आज आपल्याला तुडवलं जाणार आहे. हे मनाशी पक्के ठरवूनच मी तिकीट काढलं होतं. मी विवाहस्थळी पोहचलो. लांब थांबून अंदाज घेतला. तोंडाला रुमाल बांधला होता. नवरदेवाला घोड्यावरून नाचवत मंडपात नेलं जात होतं. मंडप गच्च भरला होता. मी लांबून बघत होतो. आई, बहिणी अण्णा चुलते चुलत्या सगळ्याजणी दिसत होत्या. आणि माझी नजर शोधत होती ती फक्त सुनितावहिनीला. तिला पाहण्यासाठी. तिच्या जवळ जाऊन लहान लेकरू होऊन हट्ट करण्यासाठी कायम आसुसलेला मी. आज वहिनी नजरेला दिसूच नये असं वाटत होतं.
अक्षता वाटप सुरू झालं. नवरा आणि नवरीला आत कुठेतरी नटवत होते. मी तोंडाला रुमाल बांधूनच दबकत दबकत मंडपाजवळ गेलो. दोन्ही बाजूला खुर्च्या अगदी व्यवस्थित लावल्या होत्या. मंडप गच्च भरला होता. लग्नात सगळे नातेवाईक खूप दिवसांनी एकमेकांना भेटत असतात. सगळेजण गप्पा मारत बसले होते. मी आल्याचं कुणालाच कळलं नव्हतं. मी मागेच अक्षता हातात धरून उभा राहिलो. आणि तेवढ्यात माझी चुलत बहीण स्नेहा अचानक माझ्या जवळून जात असताना तिने मला ओळखलं. तिने माझ्या तोंडावरून रुमाल ओढला आणि जोरात ओरडली. “नितीनदादा आलाय इथं”. माझ्या पोटात कळ आली. पण मी पळून जायचं नाही असं ठरवूनच आलो होतो. आणि स्नेहल पळतच ‘आला आला आला ‘ असं करत धावत नवरीच्या रूमकडे गेली.
सुनितावहिनी सोनालीला म्हणजे त्या नवरीला तयार करत होती. आणि तिच्याजवळ ही बातमी गेलीच. “एका दमात सात आठ जणींनी तिला सांगितलं “आलाय बघ तुझा नितीनभावजी” वहिनीने सगळं हातातलं काम सोडलं. ती त्याच वेगाने तिथून बाहेर आली. इतर सगळ्या बायका तिच्या मागे. आणि ती माझ्या नजरेसमोर दिसू लागली. दोघी तिघी जणींनी तिला धरायचा प्रयत्न केला. लग्नात भांडू नकोस म्हणून समजावू लागल्या तशी वहिनी जोरात ओरडली “जे कुणी मध्ये येतील त्यांनाही मी सोडणार नाही. ” तिचा तो अवतार पाहून सगळेजण जागेवर शांत उभे राहिले. साउंड सिस्टम बंद झाली. तसं सगळयांना माहीत होतच मी वहिनीसोबत काय केलेल होतं ते. त्यामुळे मला धडा मिळायला हवा अशी तमाम लोकांची इच्छा होतीच. पण यात गंमत अशी झाली होती. जे नवऱ्याकडचे नवे वऱ्हाडी पाहुणे होते त्यांना यातलं काहीच माहीत नव्हतं. ते माझ्याकडे एखादा पाकीटमार असल्यागत एकटक बघत होते.
दोन्ही बाजूला लोक उभे होते. मी या टोकाला तर वहिनी त्या टोकावरून चालत यायला लागली. तिची एकटक रागीट नजर माझ्यावर रोखलेली. माझ्या पोटात कळ दाटून येत होती. समोरून वहिनी नाही तर तीन महिन्यांपासून आपली बरी न झालेली जखम सांभाळणारी जखमी वाघीणच येत होती. असंच मला वाटत होतं. वहिनी अगदी जवळ आली. मी मान खाली घातली तशी वहिनीने उजव्या हाताने माझ्या डाव्या गालावर खनकन मुस्काडीत वढली. तिच्या हातातल्या दोन तीन बांगड्या फुटून खाली पडल्या. परत दुसऱ्या हाताने दुसऱ्या गालावर वढली. तेव्हाही बांगड्या फुटल्या. मी अडवायला हात वरती केला तर हातावर तिच्या मनगटाचा मोठा दणका बसला. आणि एका बांगडीची काच माझ्या हातात घुसली. एक तुकडा तिच्या मनगटात रुतला. वहिनीने जोरात हाणायला सुरवात केली. मी शांत उभा होतो. समोरचं काहीच दिसत नव्हतं. डोळ्यावर अंधारी यायला लागली. वहिनीने वेग वाढवला. मला वेदना सहन होत नव्हत्या. मी खाली बसलो. कपाळाच्या डाव्या बाजूला वर एक काच घुसली होती. तिथून रक्त येत होतं. डोळा मोठा झाला होता. ओठांवर काही दणके बसले होते त्यामुळे दात ओठात रुतल्यामुळे तिथून ही रक्त येत होतं. वहिनीचा राग शांत होत नव्हता. मी खाली बसलो. तर बाजूची खुर्ची तिने उचलली आणि मला मारण्यासाठी दोन्ही हाताने वर उचलली. पण काय झालं कुणास ठाऊक. तिने खुर्ची बाजूला जोरात आपटली. तिचे दोन्ही पाय तुटले.
अण्णा जवळ आले. “वहिनीला म्हणाले आता बास झालं. जा तू आत. “वहिनी शांत झाली आणि आत निघून गेली. मी तसाच तिथंच बाजूच्या खुर्चीत बसून राहिलो. सगळेजण माझ्याकडे केविलवाणे बघत होते. लग्नात आलेल्या नव्या पोरी बघण्याची लै हौस असायची मला. पण आज मानच वर होत नव्हती.
त्याच अवस्थेत अक्षता टाकल्या. सोनालीचं लग्न झालं. आणि सगळेजण जेवायला गर्दी करू लागले. मला भूक लागली होती. पण कोणत्या तोंडाने जेवायचं हेच कळत नव्हतं. नवऱ्याला आणि नवरीला भेटून जावं म्हणून स्टेजवर गेलो तर सगळेजण बाजूला झाले. सोनालीजवळ जाऊन फक्त दहा सेकंद उभा राहिलो. कुणीच माझ्याशी बोललं नाही. आई आणि अण्णा जवळ आले. आई म्हणाली “जेवण करून घे चल. “मी हुंदके देत मान हलवली. आणि मी पुण्याला चाललोय परत असं म्हणून तिथून काढता पाय घेतला. पावलं टाकत मंडपाच्या बाहेर आलो.
जेवढी मस्करी वहिनीची केली होती त्याहून जास्त अपमान झाला होता. पण वहिनीला एका शब्दाने बोललो नाही. तिने एका खोलीत नेऊन हवं तेवढं मारलं असतं तरी चाललं असतं. असं काहीतरी विचार करून मी रुमालाने तोंड पुसत होतो. जेवणाचा वास दरवळत होता. पण जेवायचं तरी कुठं आणि कसं?नकोच म्हटलं, बाहेर जाऊन खाऊ अस म्हणून निघायला लागलो.
तेवढ्यात सुनितावहिनीने मागून येऊन मानेवर अजून एक फटका हाणला. मी दात ओठ खात रागाने मागे बघितलं तर सुनितावहिनीचे दोन्ही डोळे गच्च भरले होते. माझे ही डोळे गच्च भरून आले. मी हात जोडले आणि म्हणलं “वहिनी माफ कर. माझं चुकलं. अजून काय मारायचं बाकी राहिलं असेल तर सांग घे मार मला. सगळा राग शांत करून टाक”. वहिनी काहीच बोलली नाही. मी तसंच हात जोडून म्हणलं “निघतो वहिनी. एकाच दिवसाची सुट्टी काढून आलो होतो. उशीर होईल जायला गाडी मिळणार नाही” असं म्हणून निरोप घेऊन पाठ तिच्याकडे केली आणि चालायला लागलो तेवढ्यात, माझं मनगट वहिनीने हातात घट्ट धरलं आणि आणि हात जोरात मुरगाळात वहिनी म्हणली. “मला उपाशी ठेवून जाऊच कसं वाटतय भावजी तुम्हाला”. खळकन डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. मागे फिरलो, आणि वहिनीच्या गळ्यात पडलो. तिच्यापेक्षा माझी उंची वाढली होती. हुंदके बाहेर पडू लागले. वहिनीही रडू लागली. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
सुनितावहिनी पदराने माझं तोंड पुसत होती. आणि एका हाताने मला धरून जिकडे जेवणाची पंगत बसली होती तिकडे घेऊन चालली होती. आणि मला हळूच म्हणत होती “ओय भावजी ती बघा ती हिरव्या ड्रेसमध्ये जी उभी आहे ना ती लै तुमच्याकडे बघतेय बर का लावा जरा सेटिंग” मला हसूही येत होतं आणि रडूही येत होतं. आणि आमच्या घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उगवताना दिसत होतं.
वहिनीने एका ताटात वाढून घेतलं. दादा एका बाजूला आणि वहिनी एका बाजूला बसली दोघांच्या मध्ये मी. दादाने एक गुलाबजाम माझ्या तोंडात त्याने स्वतःच्या हाताने कोंबला. इकडून वहिनीने भाताचा घास माझ्या ओठाजवळ केला. आणि फोटू वाल्याला आमची सुनिता वहिनी म्हणत होती “अरे ये फोटूवाल्या काढ की आमचा बी एक फोटू”
कॅमेरावाल्याने क्लीक केलं आणि मंडपात गाणं वाजू लागलं.
“पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
संसारातून वेळ काढूनी खेळ खेळूया नवा
होम मिनिस्टर… होम मिनिस्टर.. होम मिनिस्टर
वहिनी बांदेकर पैठणी घेऊन आला.. ”
आणि डोळ्यातली आसवं पुसत पुसत सुनितावहिनी मला घास भरवू लागली.
अशा कित्येक सुनीतावहिनी प्रत्येकाच्या घरात आहेत. ज्यांच्यापर्यंत पैठणी पोहचलीच नाही. त्या वहिनीपर्यंत आमच्या नक्षीदार नात्याची पैठणी मात्र पोहचती करा.
— समाप्त —
© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)
संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
मो 7020909521
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈