सुश्री वर्षा बालगोपाल
☆ “नाक…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
सकाळी सकाळी आस्था चॅनलवर प्राणायाम पहात असताना छोटा चेतन म्हणाला “ आई आई त्या बाबांनी नाक मुठीत धरलय बघ.” तसे आई म्हणाली “ नाही बाळा ते प्राणायाम करताहेत.” पण एवढं साधं याला कळू नये का वाटून त्याच्या काकूने नाक मुरडले .तिकडे दुर्लक्ष केलेल्या चेतनचे प्रश्न चालूच झाले. ते नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडत आहेत पाहून त्याने पुन्हा विचारले “ आई तू म्हणतेस ते नाक दाबले की तोंड उघडते ते हेच का? .. नाहीतर असं तरं नाही नाक धरी तो पाद करी ••• म्हणजे या बाबांनी••••• “
आईने आलेले हसू आवरले. म्हणाली “ नाही रे बाळा नाक दाबणे हा येथे एक प्रकारचा व्यायाम आहे. “
तोपर्यंत बाबांनी साष्टांग नमस्कार घातला तर चेतन म्हणाला “ यांनी नाक रगडले का? “
या बाबांची मुद्दामच टर उडवली असे वाटून काकूबाईंच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. आपल्या मुलाला एकदा या काकूंनी पण नावे ठेवली होती आठवून म्हटल्याच काकूबाई .. “ बघा काय आपलं पोरं दिवे लावतय ते••• हंऽऽ याला म्हणतात आपण हसे लोकाला अन शेंबूड आपल्या नाकाला. “ आता कस्स नाकं कापलं मनात म्हणत असतानाच या बाईसाहेबांनीही नाक फुगवल. नाकाचा शेंडा लाल झाला. नाकावरचा राग स्पष्ट झाला.
तिने पण चढवला आवाज आणि म्हणाली, “ उगाच नाकाने कांदे सोलू नकोस हं. कशाला आमच्या मायलेकरां मधे नाक खुपसतेस गं? एरवी नाकावरची माशी उठत नाही . आणि आता नाक उडवून माझ्या लहान लेकराला नावं ठेवतेस होय? हंऽऽ नकटी लावी नाक अन् नाकवालीला लावती धाक••• “
“ ए••• तोंड आवर बरका••• तुझं तरी नाक न्हायी जाग्यावं अन् नखरा तिच्या बिघ्यावं••• एरवी नाका समोर चालणारी तू अनं आज काय असा हडळीचा अवतार घेतीयस आं••••”
दोघींचा असा अवतार बघून सासूबाई आल्या, आणि म्हणाल्या, “ कशाला एकमेकींपुढे नाक खाजवताय गं? असं म्हणतात नाकातली नथ लावते तोंडाला कुलूप पण इथे तर नाकापेक्षा मोतीच जड व्हायला लागलाय की••• “
झालं आता सासूबाईंच्या नाकात कोण वेसण घालणार ? दोघी नाक वेंगाडून बसल्या फुरंगटून .
सासूबाई म्हटल्या “ अगं तुमच्या दोघींची भाडणं सोडवायला माझ्या नाकी नऊ येतं गं . नका उगाच भांडू . दोघींना बोलून आपटलं तरी पडूनही नाक वरच असतय सारखं. अगं बायांनो संसाराच्या प्रवाहात नाका तोंडात पाणी जायची वेळ आणू नका••• अगं बायांनो लेक असती नाकाचा शेंडा अन सून पाठीवरला गोंडा तुम्ही माझे दोन दोन गोंडे आहात गं जरा गोंडस रहायला शिका.”
सासूबाईंचे बोल ऐकून नाकातून पाणी गळायला लागले. डोळ्यातूनही वहायला लागले. नाईलाजाने दोघीही आपापल्या खोलीत निघून गेल्या. सासूबाईंनी उगाच नाकपुड्या फुगवून दीर्घ श्वास घेतला•••
‘ प्राणायामाचा ‘ —-
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈