सौ. उज्ज्वला केळकर
☆ गोष्ट एक आण्याची… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
आमच्या सोसायटीत यंदा हनुमान जयंतीचा उत्सव करायचा ठरला. बर्याच दिवसात सार्वजनिक कार्यक्रम सोसायटीत झाला नव्हता, हे एक कारण आणि दुसरं म्हणजे त्या दिवशी रविवार होता. लहान-थोर सार्यांनाच सुट्टी होती. बेत ठरला. प्लॅनिंग केलं गेलं. घरटी 25 रु. वर्गणी काढायचं ठरलं. पुरोहितांकडून मारूतीचा फोटो आणला. विधीवत पूजा झाली. गंध, फूल, धूप, दीप, अक्षता सगळं यथासांग पार पडलं. ‘भीमरूपी महारुद्रा… ‘आरती झाली. नारळ फुटले. सर्वांना प्रसाद म्हणून खोबर्याचे तुकडे दिले. दामले वाहिनींनी प्रसादासाठी खोबर्याच्या वड्या करून आणल्या होत्या. त्याही वाटल्या. त्यानंतर स्पर्धा सुरू झाल्या. सूर्य नमस्कार, मनाचे श्लोक, कथाकथन (यात मारुतीच्या किंवा समर्थ रामदास स्वामींच्या कथा सांगणे) इ. कार्यक्रम झाले. सारे वातावरण आनंद, उल्हास, चैतन्य यांनी भरून गेले.
कार्यक्रमात सहभागी होताना स्मृतीवरचा धुराळा उडून गेला आणि मन बालपणात, प्राथमिक शाळेत असतानाच्या काळात भटकू लागले. आमच्या शाळेतही हनुमान जयंतीचा उत्सव दणक्यात साजरा होई.
मी कॅम्प एजुकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत शिकत होते. घरापासून शाळा दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर होती. सुरुवातीला माझे धाकटे मामा मला शाळेत पोचवायला येत. आम्ही त्यांना तात्या म्हणत असू. थोड्या दिवसांनी मी एकटी जाऊ-येऊ लागले. तशी आमची शाळा तळा-गाळातली म्हणता येईल अशी होती. पहिली ते चौथी चार वर्ग. प्रत्येकी एक तुकडी. लहानशीच इमारत.
दर शनिवारी शाळा सकाळची असे. शेवटच्या तासाला प्रत्येक वर्गात मारुतीच्या फोटोची पूजा केली जाई. उदबत्ती लावली जाई. फुले वाहिली जात. नारळ फोडला जाई. मग प्रसाद म्हणून खोबर्याचे तुकडे वाटले जात. आपल्याला मोठा तुकडा मिळावा, म्हणून सगळे टपून असत. यासाठी दोन पैसे वर्गणी घेतली जाई. त्यात सगळे बसे.
घरातून निघताना मात्र मी वर्गणीसाठी एक आणा घ्यायची. दोन पैसे वर्गणी. दोन पैसे माझ्याकडे उरत. शाळा सुटली आणि शाळेच्या बाहेर पडले की उजवीकडे पंचवीस-तीस पावलांवर एक चौक लागे. डावीकडे वळले की घरी जायचा रस्ता. सरळ गेले की म. गांधी रोड लागे. तिथून चाळीस – पन्नास पावले चालले की उजवीकडे एक आईस फॅक्टरी होती. एक लालबुंद, गोरे, गोल-मटोल पारशी गृहस्थ त्या फॅक्टरीचे मालक होते. तिथे दोन पैशाला आईसफ्रूट मिळे. आम्ही मैत्रिणी तो घेऊन तिथेच पायरीवर चोखत राहू. मग अबाउट टर्न आणि उजवीकडे वळून घराच्या रस्त्याला. अशी चंगळं मी पहिली ते चौथी चार वर्षे केली.
क्वचित कधी तरी घरात एक आणा गवसे. त्या दिवशी मधल्या सुट्टीत एक आण्याचा दुधाचा आईसफ्रूट ‘काय मस्ताय ना!’ असे म्हणत म्हणत चव घेत घेत तो चोखायचा.
आमच्या शाळेसमोर, गोळ्या, शेंगा, पेरू, चिंचा, आवळे असा माकडमेवा काही काही बायका विकायला बसत. माझ्या मैत्रिणी काही-बाही घेत. मग सगळ्या मिळून शेअर करून खात असू. माझ्याकडे पैसे नसत. घरी मागायची हिंमत होत नसे. त्यामुळे मैत्रिणींकडून फक्त घ्यायचं, द्यायचं काहीच नाही, याची फार खंत वाटायची.
यथावकाश वर्ष संपलं. परीक्षा झाली. आम्ही दुसरीत गेलो. माझे मोठे मामा कॅम्प एजुकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेत मुखाध्यापक होते. आम्ही त्यांना आण्णा म्हणत असू. तेच माझे पालकही होते. त्यामुळे मला नादारी होती. तरीही चार आणे फी द्यावी लागे.
मी दुसरीत गेले, तेव्हा माझ्या धाकट्या मामांना, तात्यांना वाटलं की मी वरच्या इयत्तेत गेले, म्हणजे माझी फीदेखील एक आण्याने वाढली असणार, म्हणून त्यांनी मला फीचे पाच आणे दिले. प्रत्यक्षात बाईंनी फीचे चार आणेच घेतले. माझ्याकडे एक आणा उरला. त्या दिवशी मी एक आण्याच्या माशाच्या आकाराच्या भरपूर गोळ्या घेतल्या आणि मैत्रिणींमध्ये वाटल्या. मला त्यावेळी इतका आनंद झाला, काहीसा अभिमानही वाटला. मनात म्हंटलं, गेल्या वर्षीचं उट्टं काढलं. पण हा आनंद फक्त महिनाभरच टिकणार होता.
एक तारखेला प्रगती पुस्तक मिळालं. त्यावर पालकांची सही आणायची होती. मी दप्तरातून प्रगती पुस्तक काढून आण्णाना दिले. त्यांनी सही केली. प्रगती पुस्तकात फीचा कॉलम होता. त्यात चार आण्याची नोंद होती. तात्या म्हणाले, ‘मी तर तुला पाच आणे दिले होते. एक आणा कुठाय? ‘ मग मी प्रथम मोठ्याने गळा काढला. मग रडत रडतच सांगितले, ‘एक आण्याच्या गोळ्या घेऊन मैत्रिणींना वाटल्या.’ हेही संगितले की त्या अधून मधून काही बाही घेतात, बोरं,चिंचा ,शेंगा, गोळ्या…माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मला त्यांना आत्तापर्यंत काहीच देता आलं नव्हतं म्हणून मी त्या दिवशी गोळ्या आणून वाटल्या.
मला वाटलं होतं, तसा त्या दिवशी आण्णाचा मार काही खावा लागला नाही. त्यांनी मला कधीच मारले नाही. ते फक्त एवढंच म्हणाले, ‘ त्या दिवशीच घरी आल्यावर तसं सांगायला हवं होतंस! त्या दिवसापासून पुढे कायमच मी पैशाच्याबाबतीत अगदी चोख व्यवहार करू लागले. त्यानंतर आणखीही एक गोष्ट घडली. मला घरून गोळ्या, शेंगा, पेरू असं काही-बाही आणण्यासाठी अधून-मधून आणा- दोन आणे मिळू लागले.
सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈