सुश्री वर्षा बालगोपाल
☆ “== कान ==” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
गणपतीला शूर्पकर्ण का म्हणतात माहिती आहे का? तर त्याचे कान सूपासारखे आहेत म्हणून आणि डोळे का बरं बारीक? सगळं बारकाईने पहाता यावे म्हणून. माणसानेही नेहमी कमी बोलावं जास्त ऐकावं बारकाईने पहावं आणि सगळं डोक्यात ठेवावं. प्रवचन चालू होते आणि अचानक कानठळ्या बसणार्या आवाजाने तिकडे कान टवकारले गेले.
बाहेर येऊन पाहिले तर काय अंगणात एका मुलाने दुसर्याच्या कानाखाली आवाज काढला म्हणून दुसर्यानेही पहिल्याच्या कानशिलात वाजवली होती.
कारण काय जाणून घ्यायच्या आतच त्यांचा आवाज ऐकू येत होता.
रागाने कानातून धूर निघत होता. आणि पहिला विचारत होता या कानाचे त्या कानाला कळू न द्यायची गोष्ट कानोकानी खबर लागत दूरवर गेलीच कशी?
अरे भिंतीला कान असतात रे बाबा. तर तर म्हणे भिंतीला कान असतात तूच लावत असशील भिंतीला कान. त्यावर दुसर्याने कानावर हात ठेवले. * म्हणाला तुझेच कोणीतरी *कान फुंकलेले दिसताहेत. आता नीट कान देऊन म्हण किंवा कान उघडे ठेऊन ऐक •••
कितीही कानी कपाळी ओरडले तरी कानामागून यायचे आणि तिखट व्हायचे जगाचा नियमच आहे.
तेवढ्यात आई तेथे आली आणि म्हणाली माझ्या कानावर आले ते खरे आहे तर! तुमचे कान फुटले नाहीत हे मला माहित आहे. म्हणून दोघांचीही कानउघाडणी करणार आहे. काहीही झालं तरी मारामारीवर उतरायचं नाही. समजलं? वाईट सगळे या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचे असते हा कानमंत्र म्हणून काळजावर कोरायचा असतो. हे कान पिरगळून सांगितले. परत मारामारी केली तर कान लांब करीन बरका म्हणून धमकी दिली. शिक्षा म्हणून कान धरायला सांगितले. आईनेच कान टोचलेले दोघांच्याही ध्यानात रहाणार होते.
शेवटी आई ती आईच! ती कान उपटू शकते, कानाखाली जाळही काढू शकते आणि कानात तेलही घालू शकते हे मुलांना कळल्यामुळे मुलांनी लगेच कान धरून माफी मागितली आणि त्यांचे परत सुत जुळले.
आता तुम्ही कान समृद्ध करा….
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈