मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘महालक्ष्मी – आईचंच रूप…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
मनमंजुषेतून
☆ ‘‘महालक्ष्मी – आईचंच रूप…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
माझ्या आईचं, शैलजा फेणाणीचं सर्वांत लाडकं दैवत म्हणजे ‘महालक्ष्मी’ ! म्हणून तर तिनं तिच्या मंगळसूत्रामध्ये सुंदर, सुबक, नाजूक, रंगीत मीनाकाम चितारलेल्या आणि कमळात उभ्या असलेल्या ‘लक्ष्मी’चं लॉकेट दिमाखात घातलं होतं!
माझे बाबा, शंकरराव फेणाणी हे भारतातील ‘स्क्रेपर बोर्ड’ या ब्रिटिश चित्रकलेतील मोठे तज्ज्ञ म्हणून गणले जायचे. ते उत्कृष्ट चित्रकार होते. लहानपणी ते कारवारला असताना, त्यांना ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये शिकण्यासाठी आणि चित्रकलेतून उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईला यायची फार इच्छा होती. परंतु चित्रं काढून कोणी पोट भरू शकतं का? यावर त्याकाळच्या उच्चशिक्षित (संस्कृत आणि गणितात तज्ञ असलेल्या) माझ्या आजोबांना यावर विश्वास नव्हता. लग्नापूर्वी अत्यंत कठीण परिस्थितीतही, चित्रकलेच्या माध्यामातून उदरनिर्वाह करण्याची बाबांची जिद्दच, त्यांना मुंबईला घेऊन आली.
बाबा मुंबईला आल्यावर त्यांच्या आयुष्यात, शैलजाच्या पावलांनी मात्र ‘लक्ष्मी’ घरी आली! त्यावेळी घरात केवळ एक खाट आणि कांबळ होती. परंतु दोघांच्या अत्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाच्या कमाईने, लक्ष्मीच्या हातांनी घर हळूहळू सजू लागलं. जसजसा संसार फुलू लागला, तसतसं आईचं ‘महालक्ष्मी’ मंदिराशीही नातं जुळू लागलं, आणि अधिकाधिक दृढही होऊ लागलं! आई जेव्हा महालक्ष्मीची पूजा करत असे, त्यावेळी तर तिच्या चेहर्यावर विलक्षण तेज, सोज्ज्वळता, सात्त्विकता याची प्रचिती येई! एका क्षणात् त्या ‘देवत्वाशी’ ती एकरूप होई! तिच्या महालक्ष्मीवरील जबरदस्त श्रद्धेमुळेच माझ्या जन्माआधी, दर शुक्रवारी ती नवचंडिकेची यथासांग पूजा करून, कुमारिकांना बोलावून, सन्मानपूर्वक, भेटवस्तू देऊन, जेवण घालीत असे.
गणेशोत्सवातील हरितालिकेच्या (पार्वतीच्या – शैलजाच्या) पूजेच्या दिवशी आणि गणपती आगमनाच्या दिवशीसुद्धा दोन्ही दिवस, ती निराहार, उपवास करून, ताजे, खमंग आणि स्वादिष्ट असे अनेक तिखटा-गोडाचे पदार्थ करुन शंभरएक नातेवाईक आणि भक्त मंडळींना घरी जेवू घालत असे. पाण्याचा एक थेंबही न घेता, ही ताकद तिला कुठून येत असेल बरं? याचं आम्हां सर्वांना कोडंच पडत असे. नक्कीच तिला तिची ‘महालक्ष्मी’ उदंड ऊर्जा देत असावी!
माझ्या आईचं माहेरचं नाव ‘कमल’. माझ्या जन्मानंतर ‘नवचंडीचा प्रसाद’ म्हणून आणि कमळात जन्मलेली – (पद्मात् जायते इति) म्हणून, आमच्या भाई काकांच्या (म्हणजे सर्वांचे लाडके सुप्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांच्या) आईनं, “हिचं नाव ‘पद्मजा’च ठेवा, ” असं सांगितलं. ‘नवचंडिकेच्या वरदानाने ही ‘चंडिका’च माझ्या पोटी जन्मली!’ असं कधीकधी आई गंमतीने माझी चेष्टा करत म्हणायची! त्यानंतर दिवसेंदिवस आईची भक्ती पाहून, मीही देवीची भक्त झाले.
बारावीनंतर माझी अॅडमिशन मायक्रोबायोलॉजी हा विषय असलेल्या ‘सोफाया’ कॉलेजमध्ये झाली. आणि योगायोग म्हणजे हे कॉलेज ‘महालक्ष्मी’ मंदिराकडून, पायी अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर होतं. जणू महालक्ष्मीनेच मला जवळ बोलावून घेतलं होतं! त्यामुळे मीही दर शुक्रवारी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी जात असे; आणि देवीसमोर, माझे गुरू ‘पद्मविभूषण’ पंडित जसराजजींनी मला शिकवलेलं ‘माता कालिका’ हे सुंदर भजन आणि इतर देवीची भजनंही मी गात असे. ते गाताना देवीची तिन्ही रूपं पाहून मन खूप प्रसन्न होई. तिथली पुजारी मंडळीही माझी दर शुक्रवारी आतुरतेने वाट पाहत, आणि माझ्या गाण्याचा आनंद घेत. त्यानंतर मला ते पेढे, नारळ, हार, फुलं असा भरपूर प्रसाद देत. अशा वेळी मी देवीसाठी गायले म्हणून हा प्रसाद तिनं ‘माझ्यासाठीच’ पाठवला आहे, असं मला वाटे आणि मोठ्या आनंदाने माझी आई त्याचा स्वीकारही करी.
नित्यनियमाप्रमाणे असेच एकदा मी कॉलेजमधून परतताना शुक्रवारी ‘महालक्ष्मी’ला दर्शनाला गेल्यावेळी, तिच्यासमोर मी ‘माता कालिका’ डोळे मिटून अत्यंत भावपूर्णपणे गायले. मी गात असताना शेजारीच कुणीतरी मुसमुसून रडण्याचा मला आवाज आला. मी दचकून पाहिले… तर एक मध्यमवयीन दाक्षिणात्य स्त्री रडत असल्याचं मला दिसलं. माझं भजन संपल्यावर मी तिला, ‘काय झालं? तुम्हाला काही त्रास आहे का?’ असं विचारल्यावर तिनं मला काय सांगावं?… ती टिपिकल दाक्षिणात्य टोनमध्ये म्हणाली, “आपका गाना सुनकर अमको इतना अच्चा लगता ऐ, तो बगवाऽऽऽन को कितना अच्चा लगता ओगा!” हे ऐकून मला गालातल्या गालात हसू आवरेना! असे अविस्मरणीय प्रसंग नेहमी परमेश्वराची आठवण करून देत त्याच्या ‘अस्तित्वाचीही’ साक्ष देतात!…
साधारणपणे ४२-४३ वर्षांपूर्वी, याच महालक्ष्मीचा प्रसाद घेऊन, मी माझे गुरू, ‘पद्मश्री’ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे जात असे.
‘भारतरत्न’ लतादीदींना खास भेटून मी हा प्रसाद देत असे. असंच एकदा दीदींना भेटल्यावर हा प्रसाद देत मी म्हटलं, “आज मला दोन महालक्ष्मींचं सुंदर दर्शन झालं.. !” हे ऐकल्यावर दीदी जोरात, खळखळून हसल्या आणि म्हणाल्या, “मी महालक्ष्मी नाही काही… , मी ‘कडकलक्ष्मी’ आहे!” दीदींची विनोदबुद्धी अफाट होती! तशीच महालक्ष्मीवरील श्रद्धाही!
विशाल अरबी समुद्राच्या एका छोट्याश्या काठावर वसलेल्या या मंदिरात गाताना, मला अपार आनंद मिळे! साथीला समुद्राच्या लाटांचा तानपुऱ्यासारखा ‘लयबद्ध नाद’ मला साथ करीतसे. देवीची महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशी तिन्ही सुंदर रूपं, मी हृदयात साठवत असे!
एकदा तिथल्या पुजार्यांनी, पूजा केलेला तिन्ही देवींचा एकत्र फोटो, माझं गाणं ऐकून मला दिला होता, जो आजही आईच्या देव्हाऱ्यात पूजला जात आहे.
आई मला बालपणापासून सांगे की, ‘या महालक्ष्मी, महाकाली, आणि महासरस्वतीचा मिलाप म्हणजेच स्त्री शक्ती! स्त्रीमध्ये ही तीनही रूपं सामावलेली आहेत. ’
यातली महालक्ष्मी म्हणजे सुखसंपत्ती आणि वैभवाचं रूप आहे. ही अतिशय शांत, प्रसन्न, प्रेमळ आणि नेहमीच ऊर्जा देणारी आहे.
दुसरी महाकाली – हे समाजाला अत्यंत उपयुक्त असं रूप आहे. ही महाकाली समाजकंटक, गुंडप्रवृत्ती आणि दुष्टांचा नायनाट करणारी महिषासुरमर्दिनी आहे, जी स्त्रियांविरुद्धच्या अन्यायाला चिरडून टाकते. तिच्यातील रौद्ररूप आणि त्वेष आपल्याला मदत करतात. ती शक्तीशाली, बलशाली आणि कणखरही आहे. चांगलं काम करण्याससुद्धा ती प्रवृत्त करणारी आहे.
आणि तिसरी म्हणजे महासरस्वती – ही तर आम्हां कला – सारस्वताचं सुंदर रूप आहे, आमचं दैवतच आहे. तिची अमृतवाणी मोहिनी घालणारी आहे. ही वीणापुस्तकधारिणी आहे. त्या पुस्तकातलं ज्ञान आणि विद्या देणारी आहे. तिचं रूप मोहक आणि लोभसवाणं आहे.
संगीत हा आम्हां कलाकारांना परमेश्वराशी जोडले जाण्याचा सोपा मार्ग आहे. तो सर्वांत जवळचा दुवा आहे. ते एक प्रकारचं मेडिटेशन आहे.
माझ्या आयुष्यातल्या तीन महत्त्वाच्या स्त्रिया, ज्यांनी मला खऱ्या अर्थाने घडवलं, त्या म्हणजे – थोर विदुषी स्वातंत्र्य सेनानी दुर्गाबाई भागवत! त्यांनी मला संगीतकार बनवलं. त्यांचं – माझं नातं म्हणजे आजी नातीचंच जणू! अत्यंत प्रेमळ असलेल्या या दुर्गा आजीचं आणीबाणीच्या काळात, अन्यायाविरुद्ध लढणार्या दुर्गा देवीचंच, कणखर रूप पाहायला मिळालं. अशा महान स्त्रीचा सहवास घडणं हे माझं सद्भाग्यच!
दुसरी स्त्री महासरस्वती – म्हणजे लतादीदी! माझ्या सांगीतिक कारकीर्दीच्या सुरुवातीलाच, अमेरिकेतील पत्रकारांनी लतादीदींना ‘Is there any other voice ranking alongside you?’ असं विचारल्यावर, लतादीदींनी क्षणाचाही विलंब न करता, “Padmaja is extremely talented with an outstanding voice and she is my hope!” असं स्वच्छ सांगून, त्यांनी माझ्याकडून ‘निवडुंग’ चित्रपटासाठी ‘केव्हातरी पहाटे’ आणि लवलव करी पातं’ सारखी आव्हानात्मक गाणी गाऊन घेऊन, माझ्या पंखांत गरूडभरारीचं बळच भरलं! हेही माझं भाग्यच!
आणि तिसरी स्त्री म्हणजे माझी आई – शैलजा – महालक्ष्मीचं रूप! जिच्यामुळे आयुष्यभर मी संगीतातूनच सरस्वतीची आणि महालक्ष्मीची पूजा करत आहे, साधना करत आहे. आत्म्याच्या निकट असणारी एकमेव गोष्ट म्हणजे बुद्धी! ही बुद्धिदेवता- महालक्ष्मी आपल्याला संस्कार आणि समृद्धी देते!
जिनं माझं आयुष्य संस्कारमय आणि सुखसमृद्धीमय केलं, मला घडवलं, त्या माझ्या आई शैलजाप्रमाणेच, ही महालक्ष्मीही, माझ्या ‘आई’चंच रूप आहे!
या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता|
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:||
© पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈