सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-९ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
.. आई जोगेश्वरी ची सेवा…
आईने नानांच्या पिठाला मीठ जोडण्यासाठी केलेल्या अनेक उद्योगांपैकी आणखी एक उद्योग म्हणजे पाळणाघर. शेजारच्या दोन मुली आणि रुबी हॉस्पिटलला एक सिस्टर होत्या, योगेशच्या आई म्हणतो आम्ही त्यांना. त्यांची दोन मुलं आणखी एक शेजारचे तान्हे बाळ पण होते. योगेशच्या आईंची शिफ्ट ड्युटी असायची. त्यांच्या वेळेप्रमाणे आईने मुलं अगदी नातवंडा सारखी सांभाळली. आई अगदी बांधली गेली होती. ही बाळं मोठी झाली त्यांनाही बाळं झाली, तरी त्या मुलांनी आणि त्यांच्या आयांनी जाणीव ठेवली. जोगेश्वरीचे दर्शन घेऊन त्या आमच्याकडे यायच्या आणि म्हणायच्या, “माजगावकर काकू जोगेश्वरी नंतर दर्शनाचा मान तुमचा आहे. देवी नंतर दर्शन घ्यावं तर ते तुमचचं.
“ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो, ” हे आईचं ब्रीदवाक्य होतं. सेवाभावी वृत्तीमुळे तिने माणसं जोडली, ती म्हणायची कात्रीसारखी माणसं तोडू नका, ‘ सुई’ होऊन माणसे जोडा. ’ पै न पै वाचवून खूप कष्ट करून सुखाचा संसार केला तिने. आईची बँक मजेशीर होती. नाणी जमवून ती एका डब्यात हळदीकुंकू वाहून पूजा करून देव्हाऱ्यात ठेवायची. आईचं रोज लक्ष्मीपूजन व्हायचं. आम्ही म्हणायचो “आई तुझी रोजच दिवाळी असते का गं ? रोज लक्ष्मीपूजन करतेस मग रोज लाडू कां नाही गं करत दिवाळीतल्या सारखे? “ आता कळतंय कशी करणार होती आई लाडू? रेशनची साखर रोजच्यालाच पुरत नव्हती. गुरविणबाई आईला नेहमी त्यांच्या घरी बोलवायच्या. त्यावेळी देवीपुढे नाणी खूप जमायची, इतकी की नाणी वेगवेगळी करण्यासाठी खूप वेळ जायचा, मान पाठ एक व्हायची. पण देवीची सेवा म्हणून आई ते पण काम करायची. गुरव श्री. भाऊ बेंद्रे हुशार होते. त्यांनी रविवार पेठेतून बोहरी आळीतून तीन-चार मोठ्या भोकाच्या चाळण्या आणल्या. आईचं बरचसं काम सोप्प झाल. भोकं बरोब्बर त्या त्या नाण्यांच्या आकाराची असायची त्यामुळे पाच, दहा, 25 पैसे, अशी नाणी त्या चाळणीतून खाली पडायची. घरी पैसे वाचवणारी आई देवीपुढची ती नाणी मोजताना अगदी निरपेक्ष प्रामाणिक असायची. गरिबी फार फार वाईट असते. गुरविणबाई आईकडे सुरुवातीला लक्ष ठेऊन असायच्या. विश्वासाने आईने त्यांचं मन जिंकलं.. दहा पैसे सुद्धा तिने इकडचे तिकडे केले नाही. चाळून झाल्यानंतर पैसे मोजणी व्हायची वेगवेगळी गाठोडी करून आकडा कागदावर लिहून त्या गाठोड्याची गाठ पक्की व्हायची.
देवळातल्या मिळकतीचा आणि त्या गाठोड्यातील पैशांचा गुरव बाईंना अभिमान होता. त्या श्रीमंत होत्या. तितक्याच लहरी पण होत्या. पण आईने त्यांची मर्जी संभाळली. मूड असला तर त्या सोबत म्हणून आईला सिनेमाला घेऊन जायच्या. आणि कधी कधी मुठी मुठीने नाणी पण द्यायच्या. जोगेश्वरीपुढे साड्यांचा ढीग पडायचा. मनात आलं तर त्या नारळ पेढे, तांदूळ, फुटाणे आणि साडीची घडी आईच्या हातात ठेवायच्या. देवीचा प्रसाद म्हणून अपार श्रद्धेने आई ती साडी घ्यायची, आणि दुसऱ्या दिवशी नेसायची तेव्हा आई आम्हाला साक्षात जोगेश्वरीच भासायची. कधीकधी गुरवबाई भरभरून एकत्र झालेले देवी पुढचे तांदूळ गहू पण आम्हाला द्यायच्या. आई त्याची सुरेख धिरडी करायची. तिची चटणी आणि बटाट्याची भाजी इतकी लाजवाब असायची की समोरच्या उडपी हॉटेलचा मसाला डोसा पण त्याच्यापुढे फिक्का पडायचा. हा जेवणातला सुरेख बदल आणि चविष्टपणा चाखून माझे वडील आईला गंमतीने म्हणायचे, ” इंदिराबाई मनात आलं तर देऊळसुद्धा गुरवीण बाई तुमच्या नावावर करून देतील. “.. “काहीतरीच तुमचं! “असं म्हणून आई गालातल्या गालात हसायची.
आईनानांच्या गरीबीच्या संसाराला विनोदाची अशी फोडणी असायची. खिडकीतून दिसणाऱ्या जोगेश्वरीच्या कळसाला हात जोडून आई म्हणायची, ” आई जगदंबे देऊळ नको मला, आई अंबे तू मात्र आमच्याजवळ हवीस. आईने मनापासून केलेली प्रार्थना फळाला आली आणि रोड वाइंडिंगमध्ये आमची जागा गेल्याने आम्हाला तिथेच (पोटभरे) मोरोबा दादांच्या पेशवेकालीन वाड्यात आम्हाला जागा मिळाली. तेही दिवस आमचे मजेत गेले. धन्यवाद त्या मोरोबादादांच्या वाड्याला आणि तुम्हालापण..
.. आई जोगेश्वरी माते तुला त्रिवार वंदन .
– क्रमशः…
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈