डाॅ. मीना श्रीवास्तव
☆ ‘गृहिणी सचिवः सखी… वगैरे वगैरे !’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
आपल्या सर्वात लाडक्या सणाचे अर्थात दिवाळीचे कवित्व संपत आले. या बहुपेडी सणाच्या निमित्याने घरचे अन दारचे सोपस्कार पार पाडतांना गृहिणींच्या शक्तीचा पार निचरा झाला असेलच. दिवाळीच्या तोंडावर नवऱ्याला हातात झाडू घ्यायला लावत साफसफाई करायला लावणाऱ्या गृहिणीवर बरेच विनोद वाचले. पण ते तेवढ्यापुरतेच, कारण विनोद ही गांभीर्याने घ्यायची गोष्टच नव्हे. आणखीन एक चीज आहे जी बहुदा चटपटीत आणि चमचमीत असावी अशी मान्यता आहे. त्यात समाजप्रबोधन औषधाला देखील असू नये याची काळजी घेतल्या जाते. ती म्हणजे जाहिरात! मात्र प्रत्येक नियमाला अपवाद असतो मंडळी.
कॉटन किंग या ब्रँडची ३ वर्षांपूर्वीची अधिकृत जाहिरात! गोष्टीचे नांव, ‘कशा असतात ह्या बायका!’ भाऊबीजेला आपल्या ‘लाडक्या झिपऱ्या’ लहान भावाला कॉटन किंगचा शर्ट देणारी बहीण, या पलीकडे भावा-बहिणीच्या नात्याचे अलवार पदर उलगडणारी, लहानपणीच नव्हे तर मोठेपणी देखील एकमेकांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहणारी ही आजच्या आधुनिक काळातील भावाच्या खऱ्याखुऱ्या लाडक्या बहिणीची गोष्ट! प्रत्येक स्त्रीची स्वतःच्या आयुष्यातील सर्व पातळ्यांवर लढण्याची आणि नाती जपण्याची सक्षमता दाखवतांनाच पुरुषप्रधान संस्कृतीवर तरलतेने भावनात्मक भाष्य करणारी ही यू ट्यूब वरील जाहिरात माझ्या मनांत घर करून राहिली आहे. तुम्ही देखील ती अवश्य पहा! ही ऍड आठवण्याचे कारण भाऊबीज तर आहेच, पण त्यापलीकडे स्त्रीच्या बहुमुखी व्यक्तिमत्वाचे घडवलेले विलोभनीय दर्शन आहे.
महाकवी कालिदासांनी आपल्या ‘रघुवंशम्’ या प्रसिद्ध संस्कृत महाकाव्यात स्त्रीच्या विविध रूपांचे हृद्य वर्णन केले आहे. रघुवंशकुलोत्पन्न अयोध्येचा राजा (दशरथाचा पिता) अज आपली प्राणप्रिय पत्नी इंदुमती हिच्या निधनानंतर शोकसंतप्त होत विलाप करीत म्हणतो,
“गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधौ ।
करुणाविमुखेन मृत्युना हरता त्वां बत किं न मे ह्रतम” ।।-
(रघुवंशम् -अष्टम सर्ग – ।। ६७ ।।)
(भावार्थ – “हे वल्लभे, तूच माझी गृहलक्ष्मी, मंत्री, सचिव, एकांतात अनन्य हृदयस्थ सखी आणि………… संगीत-नृत्यादि मनोरम कलांच्या प्रयोगात माझी प्रिय शिष्या होतीस. म्हणूनच सांग (समष्टीरूपाने-एकंदरीत) तुझे हरण करणाऱ्या क्रूर काळाने माझे सर्वस्व हरले नाही कां?)
या श्लोकानुसार एकाच स्त्रीच्या किती भूमिका असतात हे ध्यानात येते. तिला मखरात बसवण्यात भारतीय संस्कृतीचा खूप मोठा हातभार आहे. या पार्श्वभूमीवर एक वाक्य आठवले. मध्यंतरी मुलीशी मैत्री वाढवण्याकरता मुलांमध्ये एका संवादाची आवर्तने होत होती, ‘जेवलीस कां?’ हा ‘डेंजर ट्रेंड’ असल्याचे ध्यानात आल्यावर मुंबई पोलिसांनी अशा भविष्यकालीन रोमियोंसाठी एक प्रसिद्ध टिवटिव केली होती, ‘ती जेवेल रे तिच्या घरी, काळजी करू नकोस!’
आपल्या पतीला अन मुलांना संबंधित स्त्री सतत विचारात असते ‘जेवलास कां?’ अन आपण तिला असे कधी विचारतो? कित्येक घरांमध्ये कर्त्या पुरुषाला अन मुलांना सकस अन्न द्यायचा परिपाठ आहे. त्यांना अंगमेहनत पडते, म्हणून ही तथाकथित कल्याणकारी योजना! गर्भारपण, मासिकपाळी नामक नैसर्गिक प्रक्रियांमध्ये स्त्रियांच्या रक्तातील लोह तत्व कमी होऊन त्यांना रक्तक्षय होत असतो. याखेरीज अनियमित निकृष्ट आहार अन नियमित उपवासामुळे हा आजार वृद्धिंगत होत असतो. या बाबतीत स्त्रीचे शैक्षणिक, आर्थिक अन सामाजिक स्थान कुठलेही असू दे, तिला या सार्वत्रिक समस्येने ग्रासलेले असते असे खेदाने म्हणावे लागेल. याला माझ्या आत्मानुभवाची जोड आहे. स्वतः कडे दुर्लक्ष करणे हा भारतीयच नव्हे तर अखिल स्त्रीजातीचा स्थायीभाव असावा. स्वतःला त्यागाची मूर्ती म्हणवून घेण्यात धन्यता मानणाऱ्या स्त्रीला इतरांकडून प्रोत्साहन मिळाले तर यात दोष हा कुणाचा?
शेवटी मला सर्व वयाच्या स्त्रियांना असे आवाहन करावेसे वाटते की कोणी ‘जेवलीस कां?’ असे म्हणो अथवा न म्हणो, आपण आपल्या रोजच्या सकस, संतुलित अन नियमित आहाराचे महत्व ध्यानी घ्यावे! पुरुषमंडळींना घरी यायला उशीर झाला तरी आपण झोपायच्या किमान दोन तास आधी आपली रात्री जेवायची वेळ कां चुकवायची?
…… तुम्हाला काय वाटतं?
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈