सौ. उज्ज्वला केळकर
☆ आमचा स्नेहमेळावा… भाग – १ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
संध्याकाळची साडे सातची वेळ. कोल्हापुरातील एक कार्यक्रम संपवून मी घरी परतत होते. गाडीत असतानाच फोन वाजला.
‘हॅलो… ’
‘हॅलो… हा उज्ज्वला केळकरांचाच फोन आहे का?’
हो. मी उज्ज्वला केळकरच बोलतेय. आपण कोण?’
‘अग कुमुद, ’मी उल्हास सावळेकर बोलतोय. ’
‘काय? ‘ मी चकीत. माझ्या आनंदाश्चर्याला पारावार राहिला नाही. काय काय आणि किती किती बोलू, असं मला झालं, पण तिथे गाडीत सविस्तर बोलणंही शक्य नव्हतं. मग म्हंटलं, ’मी बाहेर आहे. घरी गेले की तुला लगेच फोन करते. ’
उल्हास सावळेकर हा माझा वर्गमित्र. इयत्ता ५वी पासून ते ११वीपर्यन्त आम्ही एका वर्गात होतो. असे आणखीही खूप जण होते. कॅँप एज्युकेशन सोसायटी हायस्कूल ही शाळा प्रामुख्याने मुलांची शाळा होती. पूर्वी फक्त सातवीपर्यंतच मुली घेत. मलाही कधी सातवी पास होते आणि मुलींच्या शाळेत जाते, असं झालं होतं. पण कसचं काय? माझ्या आधीच्या बॅचपासून मॅनेजमेंटचं धोरण बदललं आणि आठवीपासून मुलींनाही प्रवेश दिला गेला. या शाळेतून ११वी पास झालेल्या मुलींची माझी दुसरी बॅच. अर्थात मुली हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच असायच्या. सात, आठ फार तर दहा. ११वीला आमच्या ‘अ’ तुकडीत (गणित घेतलेली तुकडी) तीन मुली होतो, तर ‘ब’ तुकडीत चार मुली. एकूण मुलींचा पट सात.
मला उल्हासशी कधी बोलते, असं झालं होतं. काय काम असेल बरं त्याचं माझ्याकडे? सगळ्यात प्रश्न पडला होता, माझं नाव त्याला कसं कळलं? आणि मोबाईल नंबर कुठून मिळाला?
मी घरी पोचले. चपला काढल्या आणि हातात फोन घेऊन सुरूच झाले. सर्वात आधी हेच विचारले, ‘माझं नाव तुला कसं कळलं आणि मोबाईल नंबर कुठून मिळाला?
तो म्हणाला, ‘अग, आपल्या वर्गात तो गिरीधर राजोरे होता ना, त्याचा सर्वात मोठा भाऊ जवाहर. लता त्यांच्या वर्गात होती ना! त्यांच्या ग्रूपचा अजून परस्परांशी संपर्क आहे. लताकडून व्हाया जवाहर- गिरीधर राजोरे तुझं नाव आणि नंबर मला मिळाला. ’
आता लता कोण, हे सांगायचं तर खूप मोठी लांबड लावायला हवी. पण त्याला इलाज नाही. लता म्हणजे माझी मामेबहीण. माझ्या मुंबईच्या मामांची मुलगी. माझ्यापेक्षा ४ वर्षांनी मोठी. ती १०वी११वीला पुण्याला आमच्याकडे म्हणजे आण्णांकडे ( माझे मोठे मामा आणि तिचे मोठे काका) शिकायला आली होती. त्या काळात आठवीनंतर शाळेत मुली घेत नसत. लताची गोष्ट वेगळी. ती सोहोनीसरांची पुतणी. त्यामुळे वर्गात ती एकटीच मुलगी. वर्गाच्या दारासमोरच्या भिंतीशेजारी तिच्यासाठी आडवा बाक टाकलेला असे. हळू हळू वर्गात ती अॅडजेस्ट झाली. वर्गात मुली नाहीत, म्हणून मैत्रिणी नाहीत. मित्रच सगळे. त्यातही, राजोरे, दोषी, नागूल, पेंढारकर ही जवळची स्नेही मंडळी. लता म्हणजे जगन्मित्र॰ यापैकी कित्येकांचे धाकटे भाऊ दोन दोन वर्षानी लहान, आमच्याच शाळेत शिकत असायचे. यापैकी काही जणांचे स्नेहबंध ती कॉलेजला गेल्यावर, तर काहींचे तिच्या लग्नानंतरही टिकून राहिले. विशेषत: जवाहर आणि त्याची बायको खूपदा तिच्याकडे येत. काही वेळा मीपण तिथे असे. जवाहरचा तीन नंबरचा भाऊ गिरीधर आमच्या वर्गात होता. तेव्हा माझ्या नावाचा आणि फोन नंबरचा प्रवास लता-जवाहर-गिरीधर-उल्हास असा झाला. मला मजा वाटली. मुलांच्या चिकाटीचं कौतुकही वाटलं.
उल्हास बोलत होता, ‘ आपली १९५९ ची एस. एस. सी. ची बॅच. यंदा आपल्याला एस. एस. सी. होऊन ५० वर्षे होतील. त्या निमित्ताने अंदा आण गेटटुगेदर करू या. ‘
‘छानच आहे कल्पना. आपल्या शाळेतच करायचं का?
‘नाही. शाळेची काही अडचण आहे म्हणे. एम्प्रेस गार्डनमध्ये करायचं ठरतय. तुला वर्गातल्या इतर मुलींची नवे, फोन नंबर माहीत आहेत का?’
‘नाही रे! रिझल्टनंतर कुणाच्या गाठी-भेटीच नाहीत. आता गेटटुगेदरच्या वेळी कोण कोण भेटतात बघू. ‘
अर्धा तास तरी आम्ही फोनवर बोलत होतो. काही जुन्या आठवणी निघाल्या. त्यानंतर गेटटुगेदर होईपर्यंत सतत कुणाचे ना कुणाचे फोन येत राहिले. कार्यक्रमाचं नियोजन, कुणी कुठे थांबायचं, नाश्त्याचा, जेवणाचा मेन्यू, एम्प्रेस गार्डनमध्ये कसं पोचायचं, मला अद्ययावत माहिती मिळत होती.
अखेर गेटटुगेदरचा दिवस उजाडला. नऊ- साडे नऊपर्यंत सारे जमले. आही त्यावेळी ११वीला ८० जण होतो. त्यादिवशी सगळी मिळून ५०-५५ मुले हजर होती. ४-६ मुले मागच्या पुढचा एखाद्या इयत्तेतील होती. मुले म्हणजे त्यावेळची. आता त्यापैकी बरीच जण आजोबा या पदवीला पोचली होती. मुले-सुना, मुली-जावई तर सगळ्यांनाच होते. मला सांगताना सहकुटुंब जमायचे असं सांगितलं होतं, पण तिथे पाहीलं, तर सारे एकेकटेच आले होते. एक मी वगळता कुणाचंच कुटुंब नव्हतं. हे आले होते, म्हणजे काय, तर ते म्हणजे सन्माननीय पाहुणे म्हणून निमंत्रित होते आणि त्यांनीही फारसे आढेवेढे न घेता यायचं कबूल केलं होतं. आमच्या भाग्याने आम्हाला शिकवणारे तीन गुरुजनही उपस्थित होते. दिवेकरसर, बुलबुलेसर आणि जोशीसर.
सुरुवात शाळेच्या प्रार्थनेने केली. नंतर प्रत्येकाने आपलं नाव, आपलं कुटुंब, आपण काय करतो, किंवा करत होतो, इ. माहिती सांगितली. नंतर आम्ही शाल, श्रीफल देऊन आमच्या तीनही गुरुवार्याँचा आदर सत्कार केला. त्यांच्याविषयी कुणी कुणी बोलले. मग सुरू झाल्या शाळेतल्या आठवणी. किती तरी दिवस मनाच्या कोठीत बंदिस्त असलेल्या, एकेका आठवणींच्या नमुनेदार चिजा बाहेर निघाल्या. या आठवणी काही केवळ ११वीतल्याच नव्हत्या. शाळेत आल्यापासून सेंडॉफ होऊन बाहेर पडेपर्यंतच्या आठवणी.
माझ्या बाबतीतल्या तीन आठवणी अजूनही सगळ्यांच्या लक्षात होत्या. त्यापैकी एक म्हणजे, एका नाटिकेत मी घरोघरी जाऊन आंबाबाईचा जोगवा मागणार्या जोगतिणीचे काम केले होते. एका घरातली बाई तिला भिकारीण म्हणते, तेव्हा ती संतापते. तिच्या अंगात येतं आणि उदो-उदो म्हणत ती घुमू लागते. केस मोकळे सोडलेले. खाली बसून पिंगा घातल्यासारखी ती कंबर आणि वरचा भाग हलवते. मधून मधून उदो-उदो म्हणून किंचाळते. या माझा कामाला टाळ्या मिळाल्या होत्या. बक्षीसही मिळालं होतं बहुतेक.
दुसरी आठवण माझ्या वर्गातल्या मुलांपुरती मर्यादित आहे. आम्ही आठवीत होतो तेव्हा. गोवा मुक्ती आंदोलनाचे वेळी कार्यकर्ते हेमंत सोमण पोर्तुगीजांच्या पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मा झाले, अशी बातमी आली. काही कोण जाणे, मला कविता सुचली. मी वर्गात वाचून दाखवली. मुलांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. दुसर्या दिवशी बातमी आली, ते काही हुतात्मा झाले नाहीत. त्यांना पकडून तुरुंगात टाकले. बातमी चांगलीच होती, पण माझी कविता मात्र हुतात्मा झाली.
– क्रमशः भाग पहिला
सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈