सौ. ज्योती कुळकर्णी 

??

☆ आटपाट देश…  ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

एक आटपाट देश होता. त्याचे नाव कधी हिन्दुस्थान होते, कधी इंडिया होते, तर कधी भारत होते. त्याचा एक वेगळाच इतिहास आहे.

तिथे फार पूर्वी नेहेमीच हवे हवेसे वाटणारे रामराज्य होते. राजा राम सदाचारी व सत्यवचनी होता. प्रजेचा चाहता होता.

राजेशाही नंतरही चालू होती. अनेक आक्रमणे झाली, स्वातंत्र्य लढे झाले. देश स्वतंत्र झाला. लोकांनी लोकांसाठी बनवलेली लोकशाही आली.

ह्या आटपाट देशात एक ‘अकोला’ नावाची आटपाट नगरी होती. ह्या नगरीत एक बँक होती. बँकेने त्यांच्या कर्मचार्‍यांना स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न दाखवले. लोकशाहीत मालमत्ता बाळगण्याचा मूलभूत हक्क असल्यामुळे कर्मचार्‍यांनीही घर बांधण्याचे स्वप्न बाळगले. बँकेकडून व्याजदर देखील कमी रहाणार होता.

झाले! सगळ्यांनी मिळून जमीन खरेदी केली. सोसायटी स्थापन केली. ’आमची सोसायटी’ नाव दिले. बघता बघता जमीन शेतकी नसल्याचे दाखले, तसेच प्लाॅट पाडणे इ. उपचार पार पाडले. म. न. पा. कर्मचार्‍यांना चारा-पाणी देऊन नकाशे पारीत करून घेतले. सगळ्यांनी हुश्श केले.

सगळ्यांच्या दुसर्‍या गावी बदल्या झाल्याने कंत्राटदाराला घरं बांधायला दिलीत. गाठ पडली ठका ठका! त्याने ठकवून ठकवून का होईना ५/६ वर्षात घर बांधून दिले.

तोपर्यंत म. न. पा च्या अभियंत्याला व एका बिल्डरला सोबत घेऊन नगरसेवकाने ठरविले की इथे अवैध वस्त्या निर्माण करून आपले लोकशाही साम्राज्य निर्माण करावे. कारण त्याच्या लक्षात आले की इथे रहायला एकदोन जणच आलेत व कोपर्‍यावरच्या घरांना आवारभिंतीही नाहीत. नगरसेवक म्हणजे प्रभागांचा राजाच! या लोकशाहीतील राजाला राज्य उभारायला छान संधी चालून आलीय!

मग काय विचारता? कंत्राटदाराने आमची सोसायटीच्या लगतची दहा एकर जमीन खरेदी केली. कागदावर बारा एकराचे प्लाॅट पाडले. बकरे शोधून त्यांना त्यावर घरे बांधून द्यायला सुरवात केली. बारा एकर जागाच अस्तित्वात नसल्याने आमची सोसायटीच्या सँक्शन रोडवर घरे बांधली व सोसायटीतल्याच दोघांच्या प्लाॅटमधून त्यांची परवानगी न घेताच टाऊन प्लानिंग वाल्यांना सहभागी करून घेऊन टेंपररी रोड करून घेतला.

रहायला आल्यानंतर त्या दोघांचा विरोध म्हणजे नक्राश्रूच ठरले. कारण त्यांच्यावरच १०७ कलम लावले व अटकेत टाकण्याच्या धमक्या दिल्या. त्यांना कोण दाद देणार होतं! नगरसेवकांचं तर अवैध वस्त्यांमधल्या मतदारांचं साम्राज्य उभं झालेलं होतं. वसाहतीतल्या १५/१६ घरांच्या मताला काय किंमत होती. कोर्टात केस जिंकूनही कारवाई होतच नसल्याने बिचार्‍यांना चूपचाप बसावं लागत होतं! रस्ते, नाल्या एकही सुविधा मिळत नव्हती. उलट यांच्याच जागेतून अवैध वस्त्यांना सगळ्या सुविधा म. न. पा नी मिळवून दिल्या होत्या. ते बघून सगळ्यांनाच अवैध वस्तीत आपले घर नसल्याचा पश्चाताप होत होता. कारण वैध मार्गाने न्याय मागण्याचे त्यांचे सगळे प्रयत्न संपले होते. म. न. पा चे लोक किती गेंड्यांचं कातडं पांघरून रहातात याचा त्यांना बर्‍याच उशीरा का होईना, अंदाज आला होता. म्हणून त्यांनी म. न. पा ला, आपल्याला सर्वांनाही अवैध वस्तीत घर देऊन सगळ्या सुविधा देण्याबद्दल विनंती करायचे ठरवले…

कोणत्याही गावाची एक गावदेवी असतेच. यांची देवी म्हणजे म. न. पा. मग या देवीची आरती करायलाच हवी नं! तशी त्यांनीही केली…

जय देवी जय देवी जय महापालिके देवी

वससी व्यापक रूपे तू अमुच्या गावीऽऽ

हो तू अमुच्या गावी……जय देवी ।।ध्रु ।।

 

करतांना अमुच्या नगरीत तू वास

अवैध निर्माणाचा एकच ध्यासऽऽ

हो एकच ध्यास…. जय देवी ।।१ ।।

 

अवैध निर्माण करिशी तर करिशी

सर्वच सुविधाही त्यांना पुरविशीऽऽ

हो त्यांना पुरविशी….. जय देवी।।२।।

 

सुविधा त्यांना देतांना सोसायटीमर्दिनी होशी

चोर सोडून संन्याशाला फाशी तू देशीऽऽ

हो फाशी तू देशी.. जय देवी।।३।।

 

ते बघूनी वाटले सोसायटीवासियांना

आम्हालाही अवैध घर मिळावे नाऽऽ

हो घर मिळावे ना…जय देवी॥४॥

 

मागणी अपुली मनपा चरणी अर्पियेली

मनपा देवीच्या वार्‍या करीत बसलीऽऽ

हो वार्‍या करत बसली…जय देवी॥५॥

 

जय देवी जय देवी जय महापालिके देवी

वसशी व्यापक रूपे तू अमुच्या गावीऽऽ

हो तू अमुच्या गावी ।

अशा रितीने त्यांनी आपली मागणी मनपा चरणी रूजू केली व अवैध वस्त्यांची मागणी ज्याप्रमाणे म. न. पा. मान्य करते त्याच प्रमाणे आमचीही मागणी म. न. पा देवीने मान्य करावी व ही’साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण होवो’ असे साकडे म. न. पा ला घातले.

ही आमच्या काॅलनीची सत्यकथा आहे. आमच्या जागेतून म. न. पा ने जबरदस्तीने रस्ता केला, त्याला मी व आणखी एक अन्यायग्रस्त आहे त्याने मिळून विरोध केल्यावर विरूद्ध पक्षाने पोलीस कम्प्लेंट केली व आमच्यावरच परिसरातली शांतता नष्ट करण्याबाबत गुन्हा दाखल केला. मूळ विषयाचा उल्लेखही केला नाही. नगरसेवकानीच त्यांना प्रवृत्त केले. परिणामी माझ्यावर व ज्याची जागा गेली त्या दुसर्‍यावरही १०७ कलम लावून समन्स जारी केला. आम्हाला ‘तुम्ही दोघंच आहात, बाकीचा सगळा जमाव एक आहे’ असे सांगून पोलीसांनी हवा तसा जबाब लिहून घेतला. काही दिवसांनी आम्हाला तहसील कोर्टाकडून बोलवणे आले. आमच्या काॅलनीने सुविधा नसल्याने टॅक्स भरायचा नाही ठरवले होते. त्यामुळे माझ्या पतीला जमानत पण घेता येत नव्हती. माझा भाऊ व ह्यांचा भाऊ जमानत घ्यायला आले होते, परंतु तिथे मिळालेल्या सल्ल्यानुसार दोनशे रू. लाच देऊन आम्ही केस रफ्फादफ्फा केली.

दरम्यान साठ फूट रस्त्यावरची अतिक्रमणे वाढवून रस्ता, नाल्या पूर्णपणे बंद केल्यात. आमच्या काॅलनीने ‘कंटेम्प्ट आॅफ कोर्टची’ केस दाखल केली आहे. आता कोर्टाची आॅर्डर मनपाला जाऊनही म. न. पा टाळाटाळ करतेय. २६ सप्टे. ला टाऊन प्लानिंग आॅफिसने धो धो पावसात अतिक्रमणाच्या जागेवर रेषा आखल्यात. पुढे काय होणार माहिती नाही. मी वर लिहिलेली आरती काही मनपा पर्यंत पोहोचवू शकले नाही. फक्त माझे मनोगत आपणा सर्वांपुढे मांडले.

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments