सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ माझं काम माझ्यासाठी नक्की काय आहे? ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की कष्टकरी लोक म्हणजे शारीरिकदृष्ट्या श्रम करणारी लोकं पैशाची अडचण किंवा चणचण असते म्हणूनच काम करतात. यापेक्षा फार काही वेगळी अपेक्षा ते आपल्या कामाकडून ठेवत नसावेत किंवा नसतात. पण असं नक्कीच नाहीये.

नुकत्याच घडलेल्या प्रसंगांनं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.

गोष्ट अशी की आमच्या सोसायटीत इमारतीचा जिना झाडायला येणाऱ्या आणि कचरा गोळा करायला येणाऱ्या मावशी काल अॅडमिट होत्या. त्यामुळे त्या आज काही कामावर येतील असं मला वाटलं नाही. पण आश्चर्याचा धक्का म्हणजे त्या आज चक्क कामावर आल्या आणि त्यांनी सर्व काम केलं.

याबाबत नंतर त्यांची मुलगी आमच्याकडे काम करण्यासाठी आली असताना मी तिच्याशी विचारपूस केली. तेव्हा ती मला म्हणाली, “की ताई सगळेजण तिला समजावून सांगत होते पण तिने कुणाचंही ऐकलं नाही. आणि मग मी विचार केला की आईच्या जागी मी असते तर मीदेखील अशीच कामावर आले असते. ” 

मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं की, “अहो तुम्हाला इतक्या इमर्जन्सीमध्ये कामावर न येतादेखील पैसे दिलेच असते. इतकी माणुसकी तर कुणीच सोडत नाही. अनुभव आहे की त्यांना. ” 

यावर त्यांची मुलगी म्हणाली, “पण ताई पैसा म्हणजे सगळं नव्हे. “

मी म्हटलं म्हणजे? यावरती त्यांची मुलगी बोलू लागली. ती म्हणाली, “गेल्या दोन वर्षांपासून मलासुद्धा लोक आडून आडून विचारतात आता तुमची दोन्ही मुलं शिकली. नोकरीला लागली. सुना आल्या. नातवंड झालं. सून नोकरी करते. मग तुम्ही इतर घरची कामं का करता? ती सोडून आराम करा. नातीला सांभाळा. इतकी दगदग करण्याची गरज नाही. पण मी कुणाचं ऐकलं आणि ऐकणारही नाही. कारण मला माझं काम म्हणजे फक्त पैसे मिळवून देण्याचं साधन असं वाटत नाही.” 

मग मी त्यांना विचारलं, “काय वाटतं तुम्हाला तुमचं काम म्हणजे ? काय आहे ते तुमच्यासाठी?”

यावर त्या म्हणाल्या, “ताई आपलं काम म्हणजे आपलं इमान असतं. आपला मान असतो. पैसा नंतर येतो पण आधी आपल्याला विश्वास असतो की आपण आपल्या पायावर जगू शकतो. मी चार घरची धुणीभांडी, केरफरशी करते. सगळ्यांच्या घराच्या किल्ल्या माझ्याकडे असतात. विश्वासाने सगळे नसताना त्यांच्या घरात काम करून वर्षानुवर्ष त्या किल्ल्या मी माझ्या घराच्या असल्यासारख्या सांभाळते. सगळेजण सणासुदीला मला त्यांच्या घरातला माणूस असल्यासारखं वागवतात. चार माणसं चार चांगल्या गोष्टी सांगतात. अगदी सहज मला बराच चांगल्या गोष्टी ऐकायला, बघायला मिळतात. रोज बाहेर येताना जाताना घडणाऱ्या गोष्टी मला नवीन विचार करायला भाग पाडतात. हे सगळं मला माझ्या कामामुळे अनुभवायला मिळतं. माझा आत्मविश्वास आणि सन्मान म्हणजे काम आहे. जर मी हे सगळं सोडून घरी नुसती बसून राहिले. तर मला खायला प्यायला, कपडे घालायला सगळं मिळेल. पण माझी ओळख जी काही आहे ती मात्र नसेल. मी फक्त आई, बायको, आजी एवढ्याच नात्यापुरती उरेल आणि मला तसं जगायचं नाहीये. मला माझी ओळख वेगळी ठेवायचीय. शिकले असते नोकरी केली असती तरी मी कायम नोकरीतलं काम करत राहिले असते नंतर आणखीन काही वेगळं करत राहिले असते. आता शिकले नाही म्हणून काय झालं.. जे काम करायला मला मिळालं आहे त्याने एक प्रामाणिक बाई.. एक चांगलं काम करणारी बाई म्हणून माझी ओळख झाली आहे ती मला जास्त महत्त्वाची वाटते. ” 

जेमतेम सातवी शिकलेल्या घरकाम करणाऱ्या बाईचे हे विचार खऱ्या अर्थाने पुढारलेले आहेत. वर्षानुवर्ष त्या सगळ्यांकडे काम करतात. त्यांच्याबाबत आत्तापर्यंत काहीच तक्रार नाही. अतिशय आनंदाने गाणं गुणगुणत हसत खेळत त्यांचं काम चालू असतं. यामागे त्यांचा हा विचार आहे हे आज मला इतक्या वर्षांनी कळलं. आणि खरच खूप छान वाटलं. शिक्षणाचा आणि प्रगल्भ विचारांचा किंवा जगण्याचा प्रत्येक वेळी संबंध असतोच असं नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

मनात विचार आला की प्रत्येकाने असा विचार करायला हवा की माझं काम माझ्यासाठी नक्की काय आहे ! फक्त पैसे मिळवून देणारे साधन की आणखीन काही? कारण या ‘आणखीन काही वरतीच’ मनाचं सुखसमाधान अवलंबून आहे. नाही का? 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments