सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २० ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आप्पा

आप्पांविषयी माझ्या वडिलांना नुसताच आदर नव्हता तर त्यांच्यावर त्यांचे अलोट प्रेम होते. आप्पा म्हणजे माझ्या वडिलांसाठी ते त्यांच्या पित्यासमान होते. पप्पांनी त्यांच्या वडिलांना पाहिले सुद्धा नव्हते कारण ते जेमतेम चार महिन्याचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

आप्पा म्हणजे पप्पांच्या मावशीचे यजमान. पप्पांचे बालपण, कुमार वय घडवण्यात माझ्या आजीचा वाटा, तिचा त्याग, तिची तळमळ आणि केवळ मुलासाठी जगण्याचं तिचं एकमेव ध्येय हे तर अलौकिकच होतं. पण या सर्व बिकट वाटेवर माझ्या आजीला आप्पांनी खूप सहाय्य केलं होतं. अगदी निस्वार्थपणे. त्यांनीच आजीला शिवणाचे मशीन घेऊन दिले आणि तिच्या उदरनिर्वाहाची सोय करून दिली होती. शिवाय पप्पांचीही त्या त्या वेळची मानसिकता त्यांनी सांभाळली होती. बरंच व्यावहारिक, बाहेरच्या जगात वावरताना आवश्यक असणारं शिक्षण त्यांच्याकडूनच पप्पांनी घेतलं असावं. अगदी भाजीपाला, फळे, मटण, मासे यांची पारख कशी करावी इथपासून सहजपणे जाता जाता अप्पांनी त्यांना बरंच काही शिकवले होते. माय—लेकाच्या आयुष्यात कुठलंही लहान मोठं संकट उभं राहिलं की आप्पांचा त्यांना आधार असायचा.

आप्पा आणि गुलाबमावशीला चार मुलं. भाऊ, पपी, बाळू आणि एक मुलगी कुमुद आत्या. या परिवाराविषयी पप्पांना अपरंपार जिव्हाळा होता आणि तितकाच जिव्हाळा त्यांना सुद्धा पप्पांविषयी होता. पप्पा म्हणजे त्यांचा मोठा भाऊच होता. मोठ्या भावाविषयी असावा इतका आदर त्यांनाही पप्पांविषयी होता. पप्पांची तीच फॅमिली होती आणि पर्यायाने आमचीही. आमची एकमेकांमधली नाती प्रेमाची होती, रुजलेली होती, अतूट होती आणि आजही ती टिकून आहेत अगदी तिसऱ्या पिढीपर्यंत.

पप्पांच्या आयुष्यातले आप्पा आणि मी मोठी होत असताना पाहिलेले, अनुभवलेले अप्पा यांच्यात मात्र तशी खूप तफावत होती. माझ्या आठवणीतले आप्पा पन्नाशी साठीतले असतील. डोक्यावरचे गुळगुळीत टक्कल, अंगावर शुभ्र पांढरा सदरा पायजमा आणि दोन्ही खांद्यावर अडकवलेली शबनम पिशवी.. एखाद्या पुढार्‍यासारखेच ते मला कधी कधी वाटायचे. सकाळ संध्याकाळ ते घराबाहेर पडायचे. तसे ते निवृत्तच होते पण घरासाठी बाजारहाट ते करायचे, देवळात वगैरेही जायचे. त्यांचा थोडाफार मित्रपरिवारही असावा. संध्याकाळी मात्र ते ठाण्याच्या स्टेशन रोडवरच्या मराठी ग्रंथ संग्रहालयात जात आणि घरी येताना त्यांच्या शबनम पिशवीत निरनिराळ्या वर्तमानपत्राच्या घड्या आणत. ते नियमित पेपर वाचन करत आणि राजकारणावरच्या जोरदार चर्चा त्यांच्या घरी घडलेल्या मी ऐकल्या आहेत त्यात माझे पप्पाही असायचे.

मला आता नक्की आठवत नाही पण कुणा एका जिवलग मित्राला कर्ज घेताना त्यांनी गॅरंटी म्हणून सही दिली होती आणि त्यांच्या या जिवलग मित्राने बँकेचे कर्ज न फेडता गावातून गाशा गुंडाळला होता. तो चक्क बेपत्ता झाला आणि आप्पा गॅरेंटियर म्हणून बँक कर्ज वसुलीसाठी त्यांच्या मागे लागली. आप्पांची मालमत्ता म्हणजे त्यांचं राहतं घर… त्यावरही टाच आली. कर्जाची रक्कम तरी ही पूर्ण भरली गेली नसती तर आप्पांना अटकही होऊ शकत होती. पण अशा संकट समयी त्यांचे सुसंस्कारी आणि आप्पांविषयी आदर बाळगणारे त्यांचे जावई बाळासाहेब पोरे त्यांच्यापाठी खंबीरपणे उभे राहिले. आमच्या कुमुदात्यावर त्यांचं निस्सीम प्रेम होतं. तिच्या डोळ्यात साठलेल्या अश्रुंमुळेही ते भावुक झाले असावेत पण त्यांनी त्यांच्या जवळची सगळी पूंजी, स्वतःचे घर मोडून आप्पांसाठी बँकेतलं कर्ज फेडलं आणि या गंडांतरातून आप्पांना सहीसलामत मुक्त केलं. या बदल्यात बाळासाहेब, कुमुदआत्या आणि त्यांची तीन मुलं यांच्या राहण्याची व्यवस्था आप्पांनी त्यांच्याच घरातल्या माळ्याचे नूतनीकरण करून आणि तो माळा राहण्यायोग्य करून केली. कदाचित हा खर्चसुद्धा बाळासाहेबांनीच केला असावा. आता त्या घरात वरती कुमुदआत्याचा परिवार आणि खाली आप्पांचा परिवार असे एकत्र राहू लागले. अर्थात या सर्व प्रकरणात खरी गैरसोय सोसली ती बाळासाहेब आणि कुमुदआत्यांनी.. पण तरीही भावंडं, आई वडील यांच्यावरील प्रेमामुळे तसे सारेच आनंदाने राहत होते आणि या अखंड परिवाराला आमचाही परिवार जोडलेला होताच. आज जेव्हा मी या सर्वांचा विचार करताना माझ्या बालपणात जाते तेव्हा मला एक जाणवते की नाती का टिकतात? ती का बळकट राहतात ? असं कुठलं रसायन अशा नात्यांमध्ये असतं की जे अविनाशी असतं! 

हीच नाती नंतरच्या काळात बदलत गेलेली मी पाहिली, पण आज मला फक्त याच टप्प्यापर्यंत जाणवलेलं तुम्हाला सांगायचं आहे आणि जेव्हा या परिवाराच्या चौकटीतल्या, जरी सुखी असलेली ही चौकट असली तरीही तिच्या केंद्रबिंदूविषयीचा विचार करताना, अर्थात या केंद्रबिंदूशी आप्पांची मूर्ती असायची आणि असं वाटायचं आज जे काही चित्र आहे ते केवळ आप्पांमुळे. हे वेगळं असू शकलं असतं. पहिला प्रश्न माझ्या मनात यायचा की पप्पांना व्यवहाराचे धडे देणारे आप्पा असे फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेच कसे आणि कुठेतरी मला असंही वाटायचं आप्पांच्या मनात अपराधीपणाचा लवलेशही नव्हता. त्यांची नोकरीही टिकली नव्हती तरी त्यांचं घरातलं बोलणं, वागणं रुबाबदारच असायचं. त्यांच्यामुळे त्यांच्या थोरल्या मुलाला— भाऊला पुढे शिकता आलं नाही. मिळेल ती नोकरी पत्करून लहान भावंडांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी, आई-वडिलांच्या संसाराला हातभार लावण्याची जबाबदारी त्याला उचलावी लागली होती आणि कदाचित परिवारामध्ये जे पुढे कलह निर्माण झाले त्याची कुठेतरी बीजं इथेच रोवली गेली असावीत.

बाळासाहेब आणि कुमुदआत्यांनी तर स्वतःच्या संसाराला मुरड घालून आप्पांना वेळोवेळी मदत केली पण आप्पांनी कधीच कुठल्याही प्रकारचं अपराधीपण स्वतःवर पांघरून घेतलंच नाही. किती गमतीशीर असतं हे जीवन!

माझ्या आठवणीले आप्पा हे असे पुढचे होते म्हणून त्यांच्याविषयी माझ्या मनात थोडा राग होता. मला ते दुसर्‍यांच्या जीवावर आरामशीर जगणारे वाटायचे. पण याच आप्पांनी माझ्या आजीला आणि वडिलांना मायेचा आधार दिला होता, त्याची नोंद मी का ठेवू शकत नव्हते? उपकारकर्त्या आप्पांची प्रतिमा माझ्या मनात निर्माण होत नव्हती. त्यावेळी मी पप्पांना आवडणार नाही म्हणून माझा आप्पांविषयी असलेला एक वेगळाच सुप्त राग कधी उघड करू शकले नाही.

आप्पा ही व्यक्ती मला फारशी नाही आवडायची. शिवाय तो राग कधीही निवळला नाही त्याला आणखी एक कारण होतं, ते म्हणजे माझ्या आठवणीत ते गुलाबमावशीशी म्हणजे त्यांच्या पत्नीशी कधीही चांगले प्रेमाने, आदराने, वागले नाहीत. गुलाबमावशी मला फार आवडायची……. गोरीपान, ठुसका थुलथुलीत बांधा, गळ्यातलं ठसठशीत मंगळसूत्र आणि कपाळावरचं गोल कुंकू, गुडघ्यापर्यंत अंगावर कसंतरी गुंडाळलेलं सैलसर काष्टा असलेलं नऊवारी लुगडं पण तरीही ती सुंदरच दिसायची आणि अशी ही गुलाबमावशी मला फार आवडायची. ती माझ्या आजीइतकी हुशार नव्हती, भोळसट, भाबडी होती, तिचं बोलणंही खूप वेळा गमतीदारच असायचं. तिला नक्की काय म्हणायचं ते कळायचे नाही. आणि हो ती अत्यंत सुंदर स्वयंपाक करायची.

आमची शाळा त्यांच्या घरापासून जवळ असल्यामुळे शाळा सुटल्यावर मी खूप वेळा गुलाबमावशीकडे जायची. मला खूप भूक लागलेली असायची. मग ती डब्यातली सकाळची नरम पोळी, आणि वालाचं बिरडं किंवा कुठलीतरी भाजी, तिने केलेलं कैरीचं लोणचं ताटलीत वाढायची. अमृताची चव असायची त्या अन्नाला. पैशाची इतकी ओढाताण असलेल्या कुटुंबातही ती जे घरात उरलं सुरलं असेल त्यातून चविष्ट पदार्थ रांधून सगळ्यांना पोटभर खायला द्यायची मग तिला अन्नपूर्णा का नाही म्हणायचे? आणि अशा या भाबड्या अन्नपूर्णेवर आप्पा पुरुषी हक्काने, मिजासखोर नवरेगिरी करायचे. सतत तिला हुडुत हुडुत करायचे. कुणाही समोर तिचा अपमान करायचे. ती जर काही आपली मतं मांडू लागली तर तिची अक्कल काढायचे आणि तिला जागच्या जागी गप्प बसवायचे. त्यावेळी मला ती गुलाबमावशी नव्हे तर गुलाममावशी भासायची. तिच्या अशा अनेक उतरलेल्या चर्या माझ्या मनात आजही वस्ती करून आहेत. कुणीच का आप्पांना रोखत नाही असे तेव्हा मला वाटायचे आणि आज वाटते की “मी पण का नाही गुलाब मावशीची बाजू घेऊन आप्पांना कधीच बोलले नाही?” केवळ लहान होते म्हणून? पप्पाच सांगायचे ना, ” जिथे चूक तिथे राहू नये मूक”.

पप्पांचे आप्पांइतकेच गुलाबमावशी वर प्रेम होतं. मग त्यांनीही आप्पांना कधीच का नाही त्यांच्या या वागण्याविषयी नापसंती दर्शविली? या कुठल्याही प्रश्नांची उत्तर मला तेव्हा आणि नंतरही कधीच मिळाली नाहीत. पण ही न मिळालेली उत्तरं शोधणं हा एक प्रकारे माझ्या जडणघडणीचा भाग ठरत होता.

गुलाबमावशी आमच्या घरी यायची तेव्हा आजीजवळ मन मोकळं करायची. आजीही बहिणीच्या मायेने तिची आसवं पुसायची. आप्पांचे उपकार जाणून ती आप्पांविषयी गैर बोलू शकली नसेल पण गुलाबमावशीला धीर द्यायची. कधी बोचक्यात तांदूळ बांधून द्यायची. तिच्या आवडीचा गोड मिट्ट चहा द्यायची. आमच्या घरातल्या मधल्या खोलीत चाललेलं या दोन वृद्ध बहिणींचं मायेचं बोलणं आजही माझ्या मनाला चरे पाडतं.

पण त्यावेळी मुलगी म्हणून जगत असताना मी मात्र मनाशी एक ठरवलं होतं, “आयुष्यात आपली कधीही गुलाबमावशी होऊ द्यायची नाही. जगायचं ते सन्मानानेच, स्वत:चा स्वाभिमान, स्वत्व आणि ओळख ठेऊनच.

 – क्रमशः… 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments