सौ. ज्योती कुळकर्णी
☆ तरीही मी मतदान केलेच… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
‘तरीही मी मतदान केलेच ‘. अनेक अडचणी आल्यात तरी सांगायचं आहे मला,
‘तरीही मी मतदान केलेच’. खरंच ऐका आता माझ्या अडचणी.
मी पण या देशातच रहाते आणि इथे लोकशाहीच आहे. या लोकशाहीतच घडलेला माझा खराखुरा अनुभव मी मांडणार आहे. सगळे जण सारखं सांगताहेत सध्या ‘मतदान करा मतदान करा ‘ म्हणून ! माझाही एक अनुभव जरूर वाचा सख्यांनो.
आम्ही आमच्या सोसायटी साठी जागा विकत घेतली नियमाप्रमाणे ले आऊट पाडून मंजूर केले. नकाशा मंजूर केला व त्यावर घरे बांधलीत. सोसायटीने ६० फूट डेव्हलपमेंट रोड पण आपल्या जागेतून सोडला जो आजूबाजूच्या सोसायट्यांशी संलग्न आहे. सगळे बँकेत असल्याने आपपल्या बदलीच्या गांवी होते दरम्यान त्यावेळचा मनपा इंजिनियर, नगरसेवक व R L T सारख्या अकोल्यातील नामवंत कॉलेजमधील एक प्राध्यापक -बिल्डर यांनी संगनमताने ६० फूट डी पी. रोडवर घरे बांधायला सुरवात केली. इथे जे मोजके रहायला आले होते त्यांनी त्यांच्या बांधकामाची रेघ आखली तेव्हापासून विरोध केला व कोर्टात गेले. मनपाकडे तक्रार दिली तरी उपयोग झाला नाही. मनपाने त्यांच्या विरुद्ध नोटिसेस् काढल्या पण त्याचा उपयोग झाला नाही. मनपाने कुठलीच कारवाई केली नाही. कारवाई केली नाही याचाच दुसरा अर्थ संरक्षण दिले असाच निघू शकतो. केस चालू असतानाही पूर्ण रस्ता बंद केला या नागरिकांनी. तरी मनपातर्फे कुठलीच कारवाई झाली नाही. माझ्या प्लॉट मधून सगळ्या नागरिकांना, मी विरोध केला तरी जबरदस्तीने रस्ता पाडून दिला. ३५ वर्षे झाले केस लढतोय. जिंकलो आहे. पण कारवाई केल्याच जात नाही. सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते त्यांच्या पाठीशी आहेत.
आता तर इतक्या वर्षांपासून मंजूर असलेल्या लेआऊट मधील येवढा मोठा रस्ताच कॅन्सल करून पूर्ण डेव्हलपमेंट रोडचा प्लान बदलून टाकला असल्याचे कळले. पुणे टाऊन प्लॅनिंग मधून मंजूर केलाय असे सांगण्यात
आले. चोर चोर मौसेरे भाई झाले सगळे. इलेक्शन पूर्वी लगबगीने हे काम केल्या गेले. अवैध वस्त्यांची गठ्ठा मते मिळावीत म्हणून. ही लोकशाही आहे की ठोकशाही ! तुम्हीच सांगा सख्यांनो. न्यायालयाचं सूत्र आहे ‘ १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला फाशी कायला नको ‘ सुटलेत नं इथे १०० गुन्हेगार ! १०० गुन्हेगारांना तर सोडलंच पण एका निर्दोषाला फाशी पण झालीच आहे. व्यक्तिशः माझी व माझ्या सोसायटीतल्या लोकांची अवस्था कशी आहे सांगू का सध्या ? ” वाघाने शिकारीसाठी हरिणीची मान पकडलीय. ती शेवट पर्यंत सुटण्याची धडपड करतेय. पण शेवटी तिलाही कळलंय की आपण मरणारच आहोत “अशी आहे.
तुम्हीच सांगा आम्ही मतदान करायचे का?
तरी पण मी मतदान केले आहे. पण ठप्पा मारल्यावर खूप रडले आहे.
शेवटी मला सुचलेल्या ओळी लिहिते
☆ मी लोकशाही ☆
☆
धोक्यात लोकशाही येतेय सांगते मी
आहेच जे खरे ते ठासून बोलते मी
*
माझीच ही टिकावी सत्ता इथे सदाही
मेखीस आपल्या या लपवून नांदते मी
*
घेऊन सोबत्यांना काढेल एक टोळी
वाटेत सावजांना हेरून हाणते मी
*
अज्ञान या जनांचे माझ्याच फायद्याचे
अन्याय मीच करते गुंडास पोसते मी
*
धमकीस भ्यायलेले साक्षीस कोण येती
नाहीत जे पुरावे सोईत मांडते मी
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈