सौ राधिका भांडारकर

??

☆ मी छान आहे… ☆ सौ राधिका भांडारकर

डॉक्टर केळकर खूप आजारी होते. एकेकाळचे जळगावचे नामांकित, रुग्णांशी स्नेहसंबंध ठेवणारे आणि अतिशय सचोटीने, कर्तव्यबुद्धीने वैद्यकीय पेशा सांभाळणारे कुशल, शल्यचिकित्सक ते होते. मी त्यांना कलियुगातले कर्मयोगी असेच म्हणायचे. ते असे मरणासन्न अवस्थेत असताना मी त्यांना भेटायला गेले तेव्हा मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली. म्हणाले, ” ये. बैस. कशी आहेस? “

खरं म्हणजे हा प्रश्न मी त्यांना विचारणार होते ना?

त्यावेळी मनात आलं ९० व्या वर्षी महाप्रयाणाला निघालेली व्यक्ती, वेदनांच्या पलिकडे जाऊन इतकी शांत कशी असू शकते? भयमुक्त, अलिप्त, स्वीकृत. मी त्यांचा हात धरून विचारले, “कसे आहात सर ?”

“अगं! मी छान आहे, काही तक्रार नाही. ”

आम्ही छान गप्पाही मारल्या. त्यांच्या वेदना मला जाणवत होत्या पण ते मात्र त्या सर्वांना पार करून छान बोलत होते

दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निधनाची बातमी आली आणि सहजपणे मला महाभारतातला तो अत्यंत सुंदर, अर्थपूर्ण श्लोक आठवला.

अनित्यं यौवनं रूपं

जीवितं द्रव्यसंचय:।

आरोग्यं प्रियसंवासो

गृध्येत्तत्र न पंडित:॥

तारुण्य, सौंदर्य, आयुष्य, आरोग्य, प्रियजनांचा सहवास हे सारं परिवर्तनीय आहे. चिरंतन नाही, अशाश्वत आहे. पण जे सुजाण असतात ते या सर्व गोष्टींमध्ये गुंतून पडत नाहीत. ते फक्त शाश्वताचाच पाठपुरावा करतात.

जेव्हापासून माणसाचं जगणं सुरू होतं तेव्हापासून पळणं, धावणं सुरू होतं. शिक्षण, नोकरी, पैसा, पद, अधिकार, कीर्ती, चांगलं, अधिक चांगलं, त्याहून उत्तम मिळवण्यासाठी त्याची पुरी दमछाक होते. जास्तीत जास्त जमीन पादाक्रांत करण्यासाठी तो धाव धाव धावतो आणि सूर्यास्त समयी त्याला जाणवते ती फक्त एक घोट पाण्याची गरज. त्यावेळी त्याच्यासाठी शाश्वत फक्त एकच असते का? एक घोट पाणी. ? अंततः त्याला काहीच मिळत नाही. ना जमीन ना पाणी ना शांती. त्यातच त्याचा अंत होतो.

या पार्श्वभूमीवर मला डॉक्टर केळकर यांचे मृत्यूश्येवरचे “मी छान आहे” हे शब्द खूप महत्त्वाचे वाटतात. त्यात एक स्वीकृती होती. जो जन्माला येतो तो मरणाला घेऊनच. मृत्यू हेच सत्य आहे. जगणं ते मरणं हा सत्याकडून सत्याकडे जाणारा प्रवास आहे. त्या प्रवासातलं जे अपरिवर्तनीय, चिरंतन, निरंतर, कायमस्वरूपी असणारं जे काही आहे तेच शाश्वत आणि या शाश्वताची कास धरून कर्म करणारा आणि कर्मातून अलिप्त होणारा तो खरा ज्ञानी. असा माणूस मरतानाही आनंदी असतो कारण मुळातच तो देहाभिमानी नसतो. कालचक्राची स्थित्यंतरे त्यांनी मानलेली असतात, जाणलेली असतात. बाल्य, शैशव, यौवन आणि वार्धक्य या परिवर्तनीय अवस्थांचं त्याला ज्ञान असतं. त्यामुळे तो कधीही विचलित नसतो. भंगुरतेच्या पाठी तो धावत नाही. त्याची कर्मेही एका अज्ञात शक्तीला समर्पित असतात म्हणून तो मुक्त आणि आनंदी असतो आणि अशा मुक्ततेत, आनंदात शाश्वतता असते.

मी एक अत्यंत पढतमूर्ख, सामान्य व्यक्ती आहे. भल्याभल्या ग्रंथवाचनातूनही मला आत्मा— परमात्म्याचं ज्ञान झालेलंच नाही. पण डॉक्टर केळकर यांचे तीनच शब्द.. “ मी छान आहे “ मला शाश्वत काय असते याचा अर्थ सांगून गेले हे मात्र निश्चित.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments