सौ राधिका – माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…सायकलींचं शहर..’ भाग-१० ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

सायकलींचं शहर..

50, 60 वर्षांपूर्वी पुण्याच्या चार लाखाच्या वस्तीत एक लाखाच्या वर नुसत्या सायकलीचं होत्या. प्रत्येक घरात दोन तरी सायकली असायच्या. मुला मुलींचा कॉलेज प्रवास सुरू झाला तो सायकली वरूनच नव्या सायकलीला 110 ते 140 रुपये किंमत असायची पण अहो!सर्वसामान्यांसाठी ही पण किंमत खूप होती. कशीतरी जोडाजोडी करून, काही वडिलांच्या पगारातून, थोडे आईच्या सांठवलेल्या हिंगाच्या डबीतून तर थोडे स्वकष्टाचे दूध, पेपर टाकून मिळवलेल्या पैशाची जोडणी करून रु50, 60 उभे करायचे आणि सेकंड हॅन्ड सायकल दारात यायची. त्याच्यातही समाधान मानणारी ती पिढी होती. लेखक डॉ एच वाय कुलकर्णी त्यांच्या लेखात गमतीदार किस्सा लिहितात 1955 साली श्रीअंतरकरांकडून मी सायकल घेतली, ती तब्बल 30 वर्ष वापरलेली होती त्यानंतर मी ती 1960 सालापर्यंत वापरली त्यावेळी कॉर्पोरेशनला वार्षिक टॅक्स अडीच रुपये असायचा मग पत्र्याच्या बिल्ला मिळायचा तो सायकलला लावला नाही तर कॉर्पोरेशनच्या लोकांच्या तावडीत सायकल स्वार सहज पकडला जायचा. भर दिवसाची ही कथा तर रात्रीची वेगळीच कहाणी, रात्री रॉकेलचा दिवा हवाच. तो दिवा सायकल खड्ड्यात गेली की डोळे मिटत असे. मग काय सगळाच अंधकार. आणि मग पोलिसांनी अडवल्यावर कष्टाने सांठवलेले अडीचशे रुपये रडकुंडीला येऊन पोलिसांच्या स्वाधीन करावे लागायचे..

मोहिमेवर जाणारी पेशवाई कारकीर्द संपून पुण्याच्या परिसरातील त्यांची घोडदौड संपुष्टात आली आणि पुण्याच्या रस्त्यावर टांग्याच्या घोड्याच्या टापा सुरू झाल्या. प्रमुख साधन म्हणून हजारभर टांगे पुण्यात फिरू लागले विश्रामबाग वाडा आणि सदाशिव पेठ हौद चौकात दत्त उपहारगृहाजवळ टांगा स्टॅन्ड असायचा, बाजीराव रोड वरून नू. म. वि. पर्यन्त आल्यावर आनंदाश्रम ते आप्पा बळवंत चौक हा रस्ता इतका अरुंद आणि गर्दीचा होता की समोरून बस आली तर येणाऱ्या सायकल स्वाराला उडी मारून बाजूलाच व्हावं लागायचं.

1953 पासून टांग्याचा आकडा घसरला आणि रिक्षाचा भाव वधारला.

1960 नंतर आली बजाजची व्हेस्पा स्कूटर, मग स्कूटरची संख्या वाढून सायकलचा दिमाख आटोपला. त्यात पीएमटी बसने भर टाकली. बस भाडं कमी, पुन्हा सुरक्षित, आरामात प्रवास.. मग टांगेवाल्यांना टांग मिळून सायकल स्वारही तुरळक झाले.

पण काही म्हणा हं ! इतर नावाच्या बिरुदाबरोबर पुण्याला सायकलीचं शहर हे नांव पडलं होतं त्या काळी. आत्ताच्या काळात मात्र गाड्यांच्या गर्दीतून सुळकांडी मारून पुढे जाणारा विजयी वीर क्वचितच दिसतो. आणि हो ! एखादा ज्येष्ठ नागरिक तरुणाला लाजवेल अशा चपळाईने सायकल स्वार झालेला आजही दिसतो. पण असं काही असलं तरी तेंव्हांची मजा काही औरच होती.

तर मंडळी आपण ही आठवणींची ही शिदोरी घेऊन सायकलवरून फेरा मारूया का?

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments