मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तो सुवास दरवळतो तेव्हा… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
सौ राधिका भांडारकर
☆ तो सुवास दरवळतो तेव्हा… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
जेव्हा जेव्हा मी माहेरपणाचा आनंद उपभोगून जळगावला परतत असे तेव्हा जीजी (माझी आजी) माझ्यासोबत खाऊचे डबे भरून देत असे आणि ते डब्बे तिच्या जुन्या झालेल्या लुगड्यांचे रुमाल करून त्यात बांधून देत असे. तेव्हा मी तिला म्हणायचे, ” काय ग जीजी माझं सामान वाढवतेस. मी खाल्लं ना सारं इथेच. ”
तेव्हा ती म्हणायची, ” कुठे ग ?अनारसे राहिले की, शिवाय तुला सुकलेले मासे आवडतात ना? जळगावला कुठे मिळतात? जा घेऊन. काही नाही वाढत सामानबिमान.. ”
परवा मी माझं कपाट आवरत होते. तिथे एका कोपऱ्यात सांभाळून ठेवलेला जीजीच्या लुगड्याचा तो रुमाल मला सापडला आणि माझं अंग शहारलं. त्या लुगड्याच्या तुकड्याला जीजीचा वास होता. त्या वासातलं प्रेम, ती मायेची उब, तिचा स्पर्श जाणवला. मन आणि डोळे तुडुंब भरून गेले. किती बोलायचे मी तिला पण तिच्यासारखी माया माझ्यावर जगात कोणीच केली नसेल. एक तुकडा लुगड्याचा आणि त्याचा गंध म्हणजे माझ्यासाठी त्या क्षणी जीजीचं संपूर्ण अस्तित्व होतं.
आयुष्यात असे कितीतरी आठवणींचे गंध साठलेले आहेत. जेव्हा जेव्हा मी तांदुळाच्या शेवया, उकडीचे मोदक अथवा अळूच्या वड्या करते किंवा कुणाकडून त्या मला आलेल्या असतात तेव्हा तेव्हा त्या पदार्थांचे ते सुगंध माझ्या बालपणीच्या श्रावण महिन्यात मला घेऊन जातात. श्रावण सोमवारी आणि शनिवारी आईने सोवळ्यात रांधलेला तो सुवासिक स्वयंपाक आणि पाटावर बसून ताटाभोवती रांगोळ्या रेखलेल्या त्या संध्याभोजनाच्या पारंपरिक पंगती आठवतात. केळीच्या पानावर वाढलेला तो गरमागरम वरणभाताचा, साजुक तुपाचा सुवास केवळ अस्विस्मरणीय! बालपणीच्या सणासुदीच्या आठवणी आणि वातावरणाला जागं करणारा.
मार्च महिन्यात कधीकधी काहीसं अभ्रं आलेलं आभाळ असतं बघा! ऊन— सावलीचा खेळ चालू असतो. कुठून तरी मोगरा, बकुळ, सुरंगीच्या फुलांचा मस्त गंध दरवळतो आणि मला का कोण जाणे आजही शालेय परीक्षा जवळ आल्याचे ते दिवस आठवतात. तो अभ्यास, त्या वह्या, ती पुस्तके आणि परीक्षेची एक अनामिक धडधड पुन्हा एकदा अनुभवास येते.
खरं म्हणजे आयुष्याच्या प्रवासात मी अनेक देश पाहिले पण कुठेही पावसात भिजलेल्या मातीच्या गंधाने मला मात्र नेहमीच भारतात आणून सोडले आहे. अचानक आलेला पहिला पाऊस, छत्री रेनकोट नसल्याने माझी आणि सभोवताली सर्वांचीच झालेली तारांबळ, ते भिजणं आणि मृद्गंधासह अनेक वातावरणातील सुगंध जगाच्या पाठीवर कुठेही मला आठवत राहतात. इतकंच नव्हे तर खरं सांगू का? या वासांची एक मजाच असते. हे आठवणीतले गंध ना तुम्हाला कुठल्याही क्षणी कुठेही घेऊन जातात. पुण्यात मी जेव्हा दोराबजीच्या दुकानात हिंडत असते तेव्हा मला तिथल्या खाद्यपदार्थांचे अथवा इतर वस्तूंवरून येत असलेले वास थेट परदेशात घेऊन जातात. असते मी भारतातच पण दुकानातल्या शीतपेटीतून दरवळणारे वास मला इटली, रोम जर्मनीतही घेऊन जातात. तिथले बेकरी प्राॅडक्टचे, खमीरचे काहीसे भाजके आंबट वास मला ठिकठिकाणच्या देशाची सफर घडवतात. मग तिथल्या आठवणीत मी पुन्हा एकवार रमून जाते.
एकदा मी लेकीकडे.. अमेरिकेला असताना भाजणीच्या चकल्या करत होते. तेव्हा लेक म्हणाली, ” मम्मी मला अगदी आपल्या जळगावच्या घरात असल्यासारखं वाटतंय गं! या तुझ्या चकलीच्या वासाने. ”
आणि तिने दिलेला परफ्युम मी जेव्हा भारतात आल्यावर वापरते तेव्हा मला अमेरिकेत माझ्या लेकीपाशी असल्यासारखं वाटतं.
वॉशिंग्टनला फिरत असताना मॅग्नोलियाचा तो पांढऱ्या फुलांनी गच्च लगडलेला वृक्ष पाहिला आणि त्या फुलांच्या सुगंधाने मला माझ्या अंगणातल्या अनंताच्या झाडाची आठवण झाली. भारतातला पांढरा सुवासिक चाफाही आठवला.
खरोखरच अशा कित्येक निरनिराळ्या सुवासांबरोबर केलेल्या मनाच्या प्रवासाला ना नकाशांची जरूर लागते ना वाहनांची. हा प्रवास निर्बंध, मुक्त असतो.
मी दहावी अकरावीत असेन. घर ते शाळा असा साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटांचाच रस्ता असेल. ते वय उमलणारं, भावभावनांचं, काहीसं तरल, देहातली कंपने अनोळखी, न समजणारी. त्यावेळची एक आठवण. गंमतच बरं का?
एक युवक, दिसायला वगैरे बरा होता, छान उंच होता. रोज मध्येच रस्त्याच्या कुठल्यातरी कोपऱ्यावरून माझ्याबरोबर शाळेपर्यंत अगदी न बोलता चालत यायचा. शाळेच्या आवारात शिरताना मला दोन सोनचाफ्याची फुले द्यायचा. माझ्या मैत्रिणी म्हणायच्या, ” आला ग तुझा चंपक!”
आज मला इतकं आठवत नाही की त्यावेळी माझ्या मनात त्याच्याविषयी काय भावना होत्या किंवा मी त्यांनी दिलेली फुलं केवळ भिडस्तपणे घेत होते की मनापासून घेत होते? कोण जाणे! पण आजही जेव्हा जेव्हा या सोनचाफ्याच्या फुलांचा सुगंध येतो तेव्हा त्या कुरळ्या, दाट केसाच्या, उंच युवकाची आठवण जागी होते मात्र आणि तितकंच हसूही येतं. आयुष्यातले असे वेडपट क्षण किती मजेदार असतात ना याची जाणीव होते केवळ ती या आठवणीतल्या गंधांमुळे.
मुलाचे घरदार, शिक्षण, रूप, भविष्य चोखंदळपणे पाहून, पारखून माझं लग्न जमलं. सासर अमळनेरच, मी मुंबईची. तेव्हापासून साहित्यप्रेमी असल्यामुळे गावाविषयीच्या अगदी बा. भ. बोरकरी कल्पना! लग्नाआधी मी अमळनेरला गेले होते. होणाऱ्या नवऱ्याने अगदी रोमँटिकपणे मला मोटरबाईक वरून गावात, गावाबाहेर फिरवून आणले. गाव छानच होता. गावाला शैक्षणिक, ऐतिहासिक, धार्मिक, अध्यात्मिक परंपरा होती आणि त्याचबरोबर एक घराघरातून ढणढण पेटलेल्या मातीच्या चुलींचा, खरपूस भाकऱ्यांचा, तसाच गाई म्हशींच्या गोठ्यांचा, शेणामुताचा, कडबा —पेंढ्यांचा असा एक संमिश्र वेगळाच वास होता आणि तुम्हाला म्हणून हळूच कानातच सांगते, हा वेगळा वास माझ्या होणाऱ्या नवऱ्याला ही असल्यासारखे मला तेव्हा जाणवले होते आणि ते मी त्याला स्पष्टपणे सांगितले होते. तेव्हा तो म्हणाला होता, ” मग काय विचार आहे तुझा? लग्न कॅन्सल?”
आमचं लग्न झालं. गेल्या पन्नास वर्षात खूप काही बदललं असेल नसेल पण चुकूनमाकून पेटलेल्या मातीच्या चुलीचा तो भाजका वास आणि गायीगुरांच्या सहवासातला वास मला पुन्हा पन्नास वर्षे मागे घेऊन जातो. एका अनोळखी पण जन्माची गाठ बांधली जाणार असलेल्या व्यक्तीबरोबरची ती पहिलीवहिली रोमँटिक बाईक सफर आठवते. आहे की नाही गंमत?
अशा कित्येक आठवणी. माझी आई जळगावला यायची. काही दिवस रहायची आणि परत जायची. ती गेल्यावर मला खूप सुनं सुनं वाटायचं. कितीतरी दिवस मी तिची रुम तशीच ठेवायचे कारण त्या खोलीला आईचा वास असायचा. आणि नकळत त्या वासाचा मला आधार वाटायचा.
तसे तर अनेक वास सुवास! रेल्वे स्टेशनचा वास, विमानतळावरचा वास, समुद्रकिनारी ओहोटीच्या वेळचा वास आणि त्यासोबतच्या कितीतरी आठवणी.
… गंधित आठवणींची एक मजेदार यात्रा. कधीही न संपणारी. कधी भावुक करणारी, हळवी, संवेदनशील तर कधी खळखळून हसवणारी.
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈