सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

 चैतन्याचा दिवा 

पहाटेच्या प्रसन्न प्रहरी पप्पा ज्ञानेश्वरीतील ओव्या सुरेल स्वरात गात. सहजपणे साखर झोपेत असताना सुद्धा आमच्या कानावर त्या अलगद उतरत. नकळतपणे असं कितीतरी आमच्या अंतःप्रवाहात त्यावेळी ते मिसळलं आणि आजही ते तसंच वाहत आहे. पप्पांच्या खड्या आवाजातलं सुस्पष्ट, नादमय पसायदान आणि त्या नादलहरी अशाच मधून मधून आजही निनादतात.

।।दुरितांचे तिमिर जावो 

विश्व स्वधर्म सूर्ये पाहो 

जो जे वांछील तो ते लाहो

प्राणीजात।। 

खरोखरच माऊलीने मागितलेलं हे पसायदान किती अर्थपूर्ण आहे! यातला संदेश वैश्विक आहे. त्रिकालाबाधित आहे.

आज दिवाळी सारखा प्रकाशाचा सण साजरा करत असताना मनात असंखय विचारांचं जाळं विणलं जातं. दिवाळी म्हणजे उजळलेल्या पणत्या, रंगीत रांगोळ्या, वातावरणातला तम सारणारे कंदील, खमंग —मधुर फराळ, नवी वस्त्रे, गणगोतांच्या भेटी, आणि अनंत हार्दिक शुभेच्छा. आनंद, सुख समाधानाच्या या साऱ्या संकल्पना. पण या पलीकडे जाऊन विचार केला तर असं वाटतं कुठेतरी यात “मी” “ माझ्यातले अडकले पण” आहे फक्त. यात प्रवाहापासून लांब असलेल्या, वंचित, उपेक्षितांच्या जीवनातही आनंदाचा उजेड पडावा यासाठी काही केले जाते का आपल्याकडून ?अनोख्या चैतन्याने आणि मांगल्याने भारणारा हा सण आहे. पण या चैतन्य उत्सवाच्या तरंगात सर्वव्यापीपणा अनुभवास येतो का? आपण आपल्यातच मशगुल असतो. आपल्या पलीकडे काय चाललं आहे, इतर जन कोणत्या अवस्थेत आहेत याचा विचार सहसा आपल्या मनाला स्पर्श करत नाही. आपल्या पलीकडल्यांचा विचार करणे हे या निमित्ताने गरजेचे वाटायला नको का? केवळ आर्थिक विषमतेच्या पातळीवरच नव्हे, तर मानसिक आधाराच्या दृष्टीनेही ते गरजेचे आहे. आनंद सुख समाधानाचे भाव केवळ आपल्या आपल्यातच अनुभवण्यापेक्षा विवंचनेत असणाऱ्या, परिस्थितीने गाजलेल्या, वंचित, उपेक्षित कारणपरत्वे कुटुंबाने व समाजानेही नाकारलेल्या, टाकलेल्या व्यक्तींच्या जीवनातले काही क्षण या सणाच्या निमित्ताने आपण उजळण्याचा का प्रयत्न करू नये?

माझ्या मनात बालपणापासून जपलेली एक आठवण आहे. खरं म्हणजे आज त्या आठवणीला मी एक संस्कार म्हणेन. बाळपणीच्या त्या दिवाळ्या स्मरणातून जाणे ही अशक्य बाब आहे. एका गल्लीतलं एकमेकांसमोर असलेल्या एक खणी दोन खणी घरांच्या वस्तीतलंच आमचंही घर. तिथली माणसं, तिथलं वातावरण, तिथले खेळ, सण, विशेषता दिवाळीची रोषणाई, पायरीवरच्या मंद पणत्या, ओटीवरच्या रांगोळ्या आणि एकमेकांच्या घरी जाऊन केलेले फराळ हे सतत फुलबाजी सारखे मनात उसळत असतात. पण या साऱ्या आनंदाच्या उन्मादात एक आकृती मात्र विसरता येत नाही. वृद्ध, थकलेल्या गात्रांची, घरासमोरच्या काशीबाईच्या घराच्या बाहेरच्या ओसरीवर कधीतरी कुठून तरी आश्रयाला आलेली— नाव, गाव, स्थान, जात धर्म कशाचीच माहिती नसलेली एक उपेक्षित वृद्ध अनामिका. पण अभावितपणे ती या गल्लीची कधी होऊन गेली हे कळलेच नाही आणि कुठलाही सण असो सोहळा असो गल्लीतली सगळी माणसं प्रथम तिचा विचार करायचे. पहिला फराळ तिला पोहोचवला जायचा. आम्ही गल्लीतली मुलं तिच्या पायरीवर पणत्या लावायचो. रांगोळ्या काढायचो. काशीबाईंनीही तिला तिचा ओसरीवरचा आश्रय कधीही हलवायला सांगितले नाही. या ऋणानुबंधाचा अर्थ तेव्हा कळत नव्हता पण त्या सुरकुतलेल्या अनामिकेवरच्या चेहऱ्यावरची आनंदाची लकेर आम्हाला खरा सणाचा आनंद द्यायची. आणि ती लकेर तशीच आजही मनात जपून आहे.

या सणानिमित्ताने भावंडात होणारी वाटणी कशाचीही असू दे, फराळाची, नव्या कपड्यांची. फटाक्यांची पण त्या सर्वांमधून बाजूला काढलेला एक सहावा हिस्सा असायचा. तो घरातल्या मदतनीसांच्या मुलांचा, रोज रात्री “माई” म्हणून हाक मारणाऱ्या त्या भुकेल्या याचकाचा, जंगलातून डोक्यावर जळणासाठी सालप्याचा भार घेऊन येणाऱ्या आदिवासी कातकरणीचा आणि घटाण्याच्या मागच्या गल्लीत वस्ती असलेल्या तृतीयपंथी लोकांचाही. त्यावेळी सहजपणे, विना तक्रार, विना प्रश्न होणाऱ्या या क्रियांचा विचार करताना आता वाटतं, वास्तविक तेव्हा हे उपेक्षित, वंचित, प्रवाहापासून दूर गेलेले कुणीतरी बिच्चारे म्हणून मुद्दाम का आपण करत होतो ? तेव्हा या विषमतेचा भावही नव्हता. तो केवळ एक रुजलेला उपचार होता. पण तरीही नकळत “कुणास्तव कुणीतरी” हा संस्कार मात्र मनावर बिंबवला गेला. या एका जीवनावश्यक सामाजिक संवादाची गुणवत्ता, आवशक्याता जाणली गेली हे मात्र निश्चित आणि पुढे वाढत्या वयाबरोबर हे पेरलेले बीज अंकुरित गेलं. साजरीकरणाकडे डोळसपणे, अर्थ जाणून आणि मन घालून कृती करण्याची एक सवय लागली.

इनरव्हील क्लब ची प्रेसिडेंट या नात्याने आम्ही दिवाळी सणांचे काही उपक्रम राबवत असू. वृद्धाश्रमातील फराळ भेट हा एक अत्यंत हृद्य कार्यक्रमअसायचा. रिमांड होमच्या मुलांबरोबर तिथेच फराळ बनवण्याचा कार्यक्रम असायचा, तसेच रांगोळ्या फटाके वाजवणे अशी धम्माल त्या मुलांबरोबर करताना खरोखरच एक आत्मिक समाधान अनुभवले. तांबापुरा वस्तीत घरोघरी जाऊन पणत्यांची रोषणाई केली, फराळ वाटप केले, कपडे, शाली त्यांना दिल्या आणि हे संवेदनशील मनाने केले. केवळ पेपरात फोटो येण्यासाठी नक्कीच नव्हे. रोटरी, इनरव्हील तर्फे आजही या सणांचं हे भावनिक बांधिलकीच रूप पाहायला मिळतं. शिवाय समाजात “एक तरी करंजी” सारख्या तरुणांच्या संघटना आहेत, जे स्वतः आदिवासी पाड्यावर जाऊन त्यांच्या समवेत दिवाळी हा सण धुमधडाक्यात साजरा करतात. या दृष्टीने दिवाळी ही मला नेहमीच महत्वाची वाटत आली आहे.

कविवर्य ना. धो. महानोर एकदा सहज म्हणाले होते,

 मोडलेल्या माणसाचे

 दुःख ओले झेलताना

 त्या अनाथांच्या उशाला

 दीप लावू झोपताना

अमळनेरला माझ्या सासरी पाडव्याच्या दिवशी घरातले सर्व पुरुष प्रथम धोबीणी कडून दिवा उतरवून घेतात. तिला ओवाळणी देतात. खूप भावुक असतो हा कार्यक्रम. धोबीणी कडून दिवा उतरवून घेणे आजही शुभ मानले जाते. या प्रथा गावांमध्ये आजही टिकून आहेत. विचार केला तर असे वाटते, हर दिन त्योहार असलेल्यांसाठी हे सण नसतातच. ज्यांच्या घरी रोजची चूल पेटण्याची विवंचना असते त्यांच्यासाठीच या सणांचं महत्त्व असतं आणि म्हणून सण साजरा करताना त्यांची आठवण ठेवून काही करण्यात खरा आनंद असतो

दिवाळीच असं नव्हे तर कुठलाही सण साजरा करताना अगदी सहज आठवण येते ती निराधार, बेघर, रस्त्यावर झोपणाऱ्या असंख्य लोकांची. भविष्याचा अंधकार असणाऱ्या, उघड्या नागड्या उपासमारीत वाढणाऱ्या मुलांची, दुष्काळामुळे हातबल झालेल्या शेतकऱ्याची, जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची, शरीराचा बाजार मांडणार्‍या लालबत्ती भागातल्या असाहाय्य, पीडित, लाचार स्त्रियांची, कुटुंबाने नाकारलेल्या लोकांची, सीमेवर राष्ट्रासाठी स्व सुखाकडे पाठ फिरवून प्राणपणाने थंडी, वारा, ऊन पावसाची पर्वा न करता सीमेचं रक्षण करणार्‍या सैनिकांची, त्यांच्या कुटुंबीयांची, अनाथ —अपंगांची, सुधार गृहात डांबलेल्या, विस्कटलेल्या मुलांची. कोण आहे त्यांचं या जगात? त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची कोणाची जबाबदारी? या समाज देहाचा तोही एक अवयवच आहे ना मग एक तरी पणती त्यांच्या दारी आपण लावूया. स्नेहाची, अंधार उजळणारी.

एक तरी करंजी त्यांना देऊया. एक मधुर, भावबंध साधणारी.

एक फुलबाजी त्यांच्यासमवेत लावूया. ज्याने त्यांच्याही चेहऱ्यावर हास्याची कारंजी उसळतील.

नकारात्मक बाबींच्या अंधकारावर प्रकाशाचे असे चांदणे पेरूया.

आपल्या भोवती असंख्य अप्रिय घटनांचा काळोख पसरलेला असला तरी अवघे विश्व अंधकारमय नाही. सत्याचे, दातृत्वाचे, चांगुलपणाचे, सृजनशीलतेचे असंख्य हात समाजात कार्यरत आहेत. जे पणती म्हणून सभोवतालचा अंधकार छेडण्याचे कार्य करत आहेत. आपणही अशीच त्यांच्यातली एक मिणमिणती पणती होऊया. तिथे जाणीवांचा, संवेदनाचा उजेड पेरूया..

बाळपणी झालेल्या संस्काराच्या या ज्योतीला असेच अखंड तेवत राहू दे !

 नका मालवू अंतरीचा दिवा

 नैराश्य तम दूर करण्यासी हवा

 आपुला आपल्याशी जपलेला

 मनोगाभार्‍यात चैतन्याचा दिवा…..

क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments