श्री सुनील शिरवाडकर
☆ “गुरुचरित्र” का वाचावे ?… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
चंपाषष्ठी झाली की दत्तभक्तांना दत्तजयंतीचे वेध लागतात. आपापल्या परीने नियम पाळुन एक सप्ताहाचे पारायण सुरु होते. नरसिंह सरस्वतींच्या विविध लिलांचे वर्णन गुरुचरित्र ग्रंथात विस्ताराने केले आहे. दत्तभक्त मोठ्या श्रध्देने या ग्रंथाचे पारायण करीत असतात. या ग्रंथाच्या पारायणाने अनेक दिव्य अनुभव आलेली पण अनेक मंडळी आहेत मी स्वतः या ग्रंथाची अनेक पारायणे केली आहेत. मग मला त्यातून काय मिळाले? काय अनुभव आले?
येथे एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. बुद्धीला न पटणाऱ्या, आजच्या काळाशी विसंगत वाटणाऱ्या अनेक कथा, उपदेश या ग्रंथात आहेत. विवाहित स्त्रियांचे, विधवा स्त्रियांचे आचरण, ब्राम्हणांनी करावयाची आन्हिके, कर्मकांड वगैरे बाबी पटणार्या नाही. पण मग हा ग्रंथ का वाचायचा?पारायण करताना मनात काही कामना, इच्छा धराव्यात का?कारण भगवद्गीतेत तर सांगितले आहे “मा फलेषु कदाचन”..
गजानन विजय ग्रंथात दासगणू म्हणतात,
“प्रसंग याचना करण्याचा।
मनी नको आणूस साचा।”
पण मग पारायण करताना वाटतेच ना असे की आपल्याला काहीतरी फळ मिळावे… हे हे असे असे घडावे…. असे असे व्हावे. सगळ्यांच्याच मनात असे विचार येतील असे नाही. पण पारायण केल्यावर त्याचे फळ मिळावे, काही positive व्हावे असे तर बहुतेकांना वाटतेच.
आणि तसेही ग्रंथात जागोजागी उल्लेख आहेतच. ।
जो का भजेल श्रीगुरुते ।
इहपर साधेल तयाते ।
अखंड लक्ष्मी सदनाते।
अष्टैश्वर्ये नांदती।
*
सिध्द म्हणे नामधारकासी।
श्रीगुरुमहिमा आहे ऐसी।
भजावे मनोभावेसी।
कामधेनू तुझे घरी।
गुरुचरित्रातील सर्वच ओव्यांचा अर्थ नाही समजत. बऱ्याच वेळा असेही होते, वाचन चालू आहे.. पण मन भरकटत चालले आहे. पण थोडाच काळ. पुन्हा मन आपोआप वाचनात गुंतत जाते.
आणि मग…
जसे जसे पारायण पूर्णत्वाकडे जाते…. मनातील इच्छा आपोआप कमी कमी होत जातात. ही सेवा गुरूंनी आपल्याकडून करून घेतली हेच मोठे फळ असे वाटायला लागते. आणि जेव्हा पारायण पूर्ण होते तेव्हा….
… तेव्हा, त्या क्षणी मिळणारी अनुभूती… ते मानसिक बळ…. ती आत्मिक शांती कोणत्याही ऐहिक, भौतिक सुखापेक्षा मोठी वाटु लागते.
… आणि खरे तर हेच असते पारायणाचे फळ.
पारायण सात दिवसांचे करा… तीन दिवसांचे करा, अगदी काही जण रोज एखादा अध्यायही वाचतात. पण ग्रंथाला जवळ करा. मनोभावे वाचन करा. ग्रंथाच्या शेवटी ग्रंथकार म्हणतात,
।। मुख्य भाव कारण।।
।।प्रेमे करिता श्रवण पठण।।
।।निजध्यास आणि मनन।।
।।प्रेमे करोनि साधिजे।।
*
।।श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।।
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈