सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-११ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
–लग्न पहावं करून-.
जोगेश्वरी परिसर म्हणजे अगदी मोक्याची जागा. आत्ताचा गजबजलेला लक्ष्मी रोड तेव्हा अस्तित्वातच नव्हता. तो रस्ता नागमोडी आणि कच्चा होता. काही अंतराने फक्त चार-पाच देवळे होती. गणपतीची मिरवणूक, लग्नाची वरात, भिक्षावळ, पालखी श्री जोगेश्वरी रस्त्यावरून पुढे जायची. ही वर्दळीची जागा म्हणून जोगेश्वरीजवळच श्री. शंकरराव कुलकर्णी ह्यांनी गाळा विकत घेतला होता. त्यामुळे छकडा किंवा बैलगाडीतून सायकली दुरुस्त करायला आणायला त्यांना सोईचं पडायचं. मंदिरात ओटा आणि दगडी फरशी होती. शुभकार्य निघाले की जोगेश्वरी परिसरात शिरल्यावर लग्न कार्यवाहक सगळीच काम करून समाधानाचा निश्वास सोडून निर्धास्तपणे तिथून बाहेर पडायचे. कारण सगळ्या वस्तू जोगेश्वरी परिसरातच मिळायच्या. ‘घर पहाव बांधून आणि लग्न पहावं करून ‘ इतकं शुभकार्य करणे अवघड होते. वधूपिता प्रथम वळायचा पत्रिकेच्या कारखान्यात. शामसिंग रामसिंग परदेशी उत्तम पत्रिका छापायचे. इतकी तत्पर सेवा होती की ‘शाम प्रिंटिंग प्रेस’ मध्ये पन्नास हजार पत्रिका तयार असायच्या, सगळा मसुदा एकदम रेडी. श्रीगणेश प्र. श्रीजोगेश्वरी प्र. वधू वर वडील मंडळी वधू-वर पिता सगळं छापलेले रकाने तयार असायचे नंतर फक्त नावं विचारून फायनल करून प्रिंट करायची. चला ! महत्वाचं शुभ मुहूर्ताचे पहिलं कार्य असं पार पडून पत्रिकांचे गठ्ठे 2 तासात लग्न घरी वेळेवर व्यवस्थित पोहोचायचे. अशा तऱ्हेने कार्याचा पहिला आणि महत्त्वाचा गड, ‘सर’ केला जायचा. काही हौशी पुणेकर पत्रिकेवर वधूवरांचे फोटो छापून घ्यायचे. आत्ताच्या अवजड, भरभरून, डेकोरेट केलेल्या अल्बम पत्रिका, वाचतानाच वाचणारा वाकतो. पण काही म्हणा हं !त्या वेळच्या ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीची सर नाही येणार आत्ताच्या लग्न पत्रिकेला. कार्याला वाजंत्री, सनई, चौघडा हवाच. ती मंडळी याच परिसरात भेटायची. दूध भट्टी, गॅस बत्तीवाले, दारू गोळे, भुईनळे वाले आमंत्रणाची वाटच बघत बसलेले असायचे. राजीवडेकरांच्या प्रसिद्ध दुकानात धोतर, कोट-टोपी जॅकीट, पगडी घेऊन हौशी पुरुष मंडळी बाहेर पडायची, तर शालूकरांच्या दुकानातून शालू घ्यायला बायका अधीर व्हायच्या. मनासारखा शालू मिळाल्यावर नवरीची कळी खुलायची. देण्या घेण्यासाठी हलकी भारी नऊवारी निवडायला वडीलधाऱ्या बायका खण आळीकडे लगबगीने जायच्या. वाटेत आचारी अड्डा लागल्यावर अनुभवी माणसं मजुरी, मेनू, माणसांची संख्या सारं काही घासाघिस करून, व्यवहार पक्का करून मोकळे व्हायचे. चला ! जेवणावळीचं मुख्य काम संपलं ss. ढोल, ताशा, मिरवणूक, वाजंत्री ई. व्यवहार खुंटा बळकट करून पक्का केला जायचा. आता राहिला अत्यंत आवडीचा… हौसेचा व्यवहार म्हणजे सोनं, दागिने खरेदीचा. रु. 250 /- तोळा सोन्याचा भाव होता. गरीबाघरचे वधूपिते मणी मंगळसूत्र, जोडवी विरोली, खरेदी करायचे तर हौशी श्रीमंत वधूपिते लाडक्या लेकीसाठी पेशवाई थाटाचे दागिने पसंत करायचे, घोंगडे आळीतल्या घोंगड्यांची पण तेव्हा चलती होती. सगळ्या साईजच्या घोंगड्यांनी शरीराला मस्त उब मिळायची. ज्ञानविलास प्रसिद्ध कारखाना पण इथेच होता. लग्नात नवरा सायकल, घड्याळ्या- साठी आणि भारी शूज करता रुसून बसायला नको, म्हणून ओरिएंटल मध्ये लेटेस्ट बुटाची खरेदी व्हायची. नवी कोरी सायकल घ्यायला कुलकर्णी अँड सन्स तिथे सज्ज होतेच, आणि अजुनी आहेत. मिलन, कला विकास फोटो स्टुडिओ पण सेवेला हजर असायचे. सारं काही श्री जोगेश्वरीच्या सानिध्यातच मिळाल्यामुळे वरमायपिता वधूमायपिता धन्य धन्य होऊन मानाच्या कसबा गणपतीला पान सुपारी, अक्षत, विडा, शकुनाचे पाच लाडू आणि पत्रिका द्यायला नटून थटून बाहेर पडायचे.
– क्रमशः भाग पहिला
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈