श्री सुनील देशपांडे
मनमंजुषेतून
☆ सम्राट अशोक आणि जागतिक शांतता. ☆ श्री सुनील देशपांडे ☆
खालील मजकूर मला व्हाट्सअप वरून फिरत फिरत आला. तो आणि त्यावरचे माझे विचार सादर करीत आहे –
सम्राट अशोकाची जयंती आपल्या देशात का साजरी केली जात नाही?
खूप विचार करूनही “उत्तर” सापडत नाही ! तुम्हीही या “प्रश्नांचा” विचार करा !
सम्राट अशोक
वडिलांचे नाव – बिंदुसार गुप्त
आईचे नाव – सुभद्राणी
…. एकच “सम्राट” ज्याच्या नावाने जगभरातील इतिहासकारांनी “महान” हा शब्द लावला.
… या “सम्राटा” चे राजेशाही चिन्ह “अशोक चक्र” भारतीयांनी त्यांच्या ध्वजात ठेवले.
… हाच “सम्राट” ज्याचे शाही चिन्ह “चारमुखी सिंह” हे भारत सरकारने “राष्ट्रीय चिन्ह” मानून चालवले आहे आणि “सत्यमेव जयते” स्वीकारले आहे.
… ज्या देशात सैन्याचा सर्वोच्च युद्ध सन्मान, सम्राट अशोकाच्या नावावर आहे, तो “अशोक चक्र” आहे.
… “अखंड भारत” (आजचे नेपाळ, बांगलादेश, संपूर्ण भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान) च्या विशाल भूभागावर एकहाती सत्ता गाजवणारा सम्राट, ज्याच्या आधी किंवा नंतर असा राजा किंवा सम्राट कधीच नव्हता…
… सम्राट अशोकाच्या काळात “23 विद्यापीठे” स्थापन झाली. त्यामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, कंदाहार इत्यादी विद्यापीठे प्रमुख होती. या विद्यापीठांमध्ये परदेशातून विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात येत असत.
… “सम्राट” च्या कारकिर्दीला जगातील विचारवंत आणि इतिहासकार भारतीय इतिहासातील सर्वात “सुवर्ण काळ” मानतात.
… “सम्राट” च्या काळात भारत “विश्वगुरु” होता. तो “सोन्याचा पक्षी” होता. जनता सुखी आणि भेदभावमुक्त होती.
… ज्यांच्या कारकिर्दीत, “ग्रॅंट ट्रंक रोड” या प्रसिद्ध महामार्गासारखे अनेक महामार्ग बांधले गेले. 2, 000 किलोमीटरच्या संपूर्ण “रस्त्या’च्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आली. “सराय” बांधण्यात आली..
माणसं माणसं आहेत.. , प्राण्यांसाठीही, पहिल्यांदाच “वैद्यकीय गृह” (हॉस्पिटल) उघडण्यात आली. प्राण्यांची हत्या बंद झाली.
……. असा “महान सम्राट अशोक” ज्यांची जयंती त्यांच्याच देशात का साजरी केली जात नाही? तसेच सुट्टीही का जाहीर केली जात नाही?
ज्या नागरिकांनी ही जयंती साजरी करावी ते आपला इतिहास विसरले आहेत, आणि ज्यांना हे माहित आहे, त्यांना ही जयंती का साजरी करावीशी वाटत नाही हे कळत नाही हे खेदजनक आहे.
… “जो जिंकतो तो चंद्रगुप्त” होण्याऐवजी “जो जिंकतो तो सिकंदर (अलेक्झांडर)” कसा झाला??
चंद्रगुप्त मौर्याचा प्रभाव पाहूनच अलेक्झांडरच्या सैन्याने युद्ध करण्यास नकार दिला होता हे सर्वांनाच माहीत आहे. सैन्याचे मनोबल वाईटरित्या तुटले आणि अलेक्झांडरला “मागे फिरावे” लागले.
वरील सर्व मजकूर वाचल्यानंतर खरोखरच हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात यावा आणि आत्तापर्यंत जे घडले नाही ते इथून पुढे तरी घडावे.
चंद्रगुप्त मौर्यापासून सम्राट अशोकापर्यंत भारत देश आणि संस्कृतीचा संपूर्ण जगावर प्रभाव पडला होता.
सम्राट अशोक हा आपल्या देशाचा सगळ्यात मोठा राजकीय आणि सांस्कृतिक ठेवा आहे हे सर्वमान्य आहेच, म्हणूनच त्याची प्रतिके आज सुद्धा स्वतंत्र भारताची प्रतिके म्हणून आपण अभिमानाने धारण करतो. अशा या महान सम्राटाची जयंती पुण्यतिथी कुणाला माहिती आहे काय? असल्यास ती साजरी करणे आणि जीवनगाथा सर्व समाजाला ज्ञात व्हावी अशा दृष्टीने जागृती करणे हे कार्य करण्याची गरज आहे.
…. अनेक सामाजिक संस्थांना विनंती की याबाबत काहीतरी अधिक कार्यवाही व्हावी. त्यातून आपल्या महान परंपरेची आठवण आणि समाज जागृती व्हावी. मला असे वाटते सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून तर त्याचे महत्त्व अधिक आहे. सम्राट अशोकामुळे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसारच नव्हे तर अंगीकार संपूर्ण आशिया खंडात, विशेषतः पूर्व आणि दक्षिण आशियामधील सर्व देशांमध्ये झाला होता. आपल्या मातीतील सर्वश्रेष्ठ चक्रवर्ती हिंदू सम्राट त्याच्या उत्तर आयुष्यात बुद्ध धर्माचा प्रचारक झाला ही खूप मोठी आणि अभिमानास्पद घटना आहे.
शांततेचा प्रसार शक्तिमान व्यक्ती किंवा राष्ट्राकडूनच चांगला होऊ शकतो. हिंसेचा अतिरेक झाल्यानंतर शांतीचा पुरस्कार ही खूप मोठी क्रांतिकारक घटना आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युनोचा जन्म झाला. शेवटी अपरिमित मनुष्यहानी नंतरच माणसाला जाग येते, परंतु ती जास्त काळ टिकत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर शांततेचे वारे व युनोचा उदय या घटना घडून सुद्धा त्याचा परिणाम फार काळ टिकला नाही. सध्या तर सगळीकडे युद्धाचाच ज्वर पुन्हा पसरलेला दिसतो. यावेळी आपल्या भारतीय संस्कृतीतील या महान परंपरेची आठवण जागृत ठेवून जागतिक शांततेच्या दृष्टीने भारताने प्रयत्नशील राहावे. जागतिक शांततेसाठी सम्राट अशोक यांच्या जीवन कार्याची आठवण सतत जागती ठेवणं ही गोष्ट अत्यावश्यक आहे असे वाटते…… तीच चक्रवर्ती सम्राट अशोकाला सर्वात मोठी श्रद्धांजली आणि भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा सन्मान ठरेल. या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर काही हालचाल होईल का? आपण आशा करूया !
© श्री सुनील देशपांडे.
नाशिक मो – 9657709640 ईमेल : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈