सौ. दीपा नारायण पुजारी

?मनमंजुषेतून ?

☆ एक दुपार ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

ढेबेवाडी! एक टुमदार लहानसं खेडं! त्या गावातील बस स्टॅण्ड जवळच एक लहानसं तळं होतं. पाऊस चांगला झाला तर ते थोडं तलावासारखं दिसे. एरवी वर्षभर  ते  डबकं असे. या तळ्याच्या काठावर मोठे मोठे खडक होते. जवळच एक वडाचं झाड होतं. पंचायतीच्या मदतीने झाडाभोवती एक पार बांधला होता.झाडाची सावली खडकांच्या काही भागांवर पडत असे.झाडाच्या चारी बाजूंनी पारंब्या लोंबत होत्या. सकाळी गावातल्या बायका धुणीभांडी करायला येत. संध्याकाळी पुरुष लोकांची बैठक असे पारावर.गावातल्या मुलांसाठी हे एक प्रकारचं जिमच होतं म्हणा ना!

आज ऊन्हाचा तडाखा काही वेगळाच होता. उन मी म्हणत होतं. झाडाचं एकही पान हलत नव्हतं. एस. टी स्टँड च्या पायऱ्यांवर बसलेला लंगडा भिकारी कुणीतरी दिलेला पावाचा कोरडाच तुकडा खात होता. खाऊन झाल्यावर त्यानं हात अंगातल्या घामानं भिजलेल्या कळकट्ट शर्टच्या बाहीला पुसला. त्याच हातानं त्यानं कपाळावरुन खाली ओघळलेला घामही पुसला. पावाचे कण त्याच्या घामानं चिकचिकलेल्या गालाला चिकटले.आता त्याला तहान लागली . शेजारी पायरीला टेकवून ऊभी केलेली काठी त्यानं उजव्या हातानं पकडली. लंगडत लंगडत काठी ओढत तो समोरच्या कोपऱ्यातल्या नळावर गेला.अशक्त , कृश, ऊजवा पाय वर करुन , काठी आधारासाठी काखेत धरून त्यानं तोटी फिरवली. किं. . ‌ . किं. . किं. . करत नळ उघडला.आपली हाताची ओंजळ तोल सावरत तोटीला लावली. ओणवा होऊन त्यानं तोंड ओंजळीपर्यंत नेलं. पाण्याचे काही थेंब त्याच्या हातावर सांडले. नळ भकास तोटी करून त्याच्या ओंजळीकडं कोरडाच बघत होता.आपलं तोंड ओंजळीला लावून ते थेंब तीर्था सारखे त्यानं चाटले. वडावरचे दोन कावळे कर्कश काकसूर लावत उडाले.धाडधाड आवाज करत दोनची एस. टी. स्टॅंडवर आली. त्या लाल डब्याच्या खिडकीच्या काचा खणखाण आवाज करत ओरडल्या. कंडक्टर धाडकन दार उघडून उतरला. त्यानं शिट्टी कर्कश्शवाणी वाजवून एस. टी. मागं घेतली. पुण्याच्या थांब्यावर आणून थांबवली. एस. टी च्या लाला पिवळ्या पत्र्यावर हातानं थाड थाड वाजवून ड्रायव्हरला ब्रेक लावायचा इशारा दिला.एस. टीनं मागच्या धुराड्यातून काळा गरम धूर सोडला. भस्स भस्स आवाज करत , श्वास टाकत तिचा वरखाली होणारा ऊर हळूहळू शांत झाला. ड्रायव्हरनं त्याच्या सीटवरून खाली ऊडी मारली.त्याच्या बाजूचं अर्धं दार खाडकन उघडून थाडकन बंद केलं. खिडकीची आधीच खिळखिळी झालेली , तुटलेली काच आपलं अस्तित्व दाखवत आवाज करत खुडमुडली.

आपले नाकावर नसलेले मास्क कानाच्या खुंटीवरून काढून दोघं चहाच्या टपरीकडं वळले.

एवढा वेळ बाकड्यावर वाट बघत बसलेले सरपंच, उपसरपंच, कोरोनाची पुण्यातली ताजी खबर ऐकायला पोट आणि पोटावरून घसरणारी पॅंट सावरत टपरी कडं पळाले. लगोलग चार-पाच जणांचं टोळकं तयार झालं. कोरोनच्या बातम्या रंजकतेनं सांगितल्या जाऊ लागल्या. स्टार माझा किंवा आजतक पेक्षा जास्त रंजक, भडक, अतिरंजित आणि धडकी भरवणाऱ्या होत्या.

गण्या, परशा आणि वासू थोडा वेळ ऐकत थांबले.

नंतर ते तळ्याकडं गेले. पाण्यात पाय सोडून ते खडकावर बसले.

त्यांच्या गावात अजूनही कोरोनाचं पाऊल पडलं नव्हतं. पण सायन्सच्या मोघे सरांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात होत्या. या महामारीचं गांभीर्य त्यांना समजलं होतं. ऑक्सिजन अभावी होणारे मृत्यू, ऑक्सिजन गळती, हॉस्पिटलमध्ये सातत्यानं होरपळणारे पेशंटस्. बातम्या ऐकून आज त्यांचा सूर पारंब्या चा खेळ थांबला होता. पाण्यात भाकरी ऊठत नव्हत्या. लहान लहान पावलं स्थिर होती. पाण्यात हलवून लाटांचा आवाज सुध्दा करत नव्हती.

वासूचा चेहरा खूपच गंभीर झाला होता.

तो म्हणाला, “काहीतरी करायला पाहिजे गड्या.”

परशा, जा बर, आपल्या सगळ्या दोस्तांना बोलव इकडं”

परशानं ओळखलं, वासूच्या डोक्यात काही तरी शिजतय. तो पळालाच. पळता पळता तो हाका मारत होता. “ए गंम्प्या, ए, मन्या या रे तळ्यावर.”

“अरे एक राजा चल की. वाश्या बोलवतोय बघ.”

थोड्याच वेळात वडाखाली वानरसेना जमली. सावल्या लांब होईपर्यंत चर्चा सुरू होती. टोळक नंतर मोघे सरांच्या घराकड गेलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी आठची गाडी गावच्या वेशीवर च आडवली गेली. वासू, गण्या, परशा बरोबर त्यांचे बरेच शाळासोबती रस्ता अडवून ऊभे होते. ड्रायव्हरला गाडी थांबवावीच लागली. कंडक्टर खाली उतरला. वासू त्याच्याशी काही बोलला. गाडी तून एक एक पॅसेंजर खाली उतरु लागले. गण्या थर्मल गन घेऊन ऊभा होता. परशा  प्रवाशांनी मास्क नीट घातलाय ना हे बघू लागला.

वासू प्रत्येकाच्या बोटाला oxymeter लावून बघत होता. राजा तेवढ्यात भाषण ठोकून कोरोनाच्या सोवळ्याचे नियम सांगू लागला.काही मुलांनी गावात, स्टॅंडवर, जिथं जमेल तिथं कोरोनात घेण्याच्या काळजी घे, नियमांचे फलक लावले.आख्ख्या ढेबेवाडीचा नूरच बदलला.सरपंचांनी चावडीवर मुलांना सहकार्य करण्याचं फर्मान  सोडलं.आजही उन्हाळा तोच होता. रखरख तशीच होती. स्टॅंडवर एस. टी तशीच खडखडाट करत येत होती. पण एक सूज्ञ विचारांचा वारा गावात गारवा पसरवत होता. तळ्यातलं पाणी लहान लहान लाटांतून हसत होतं.

वडाखाली गाय शांत झोपली होती. वडाच्या झाडाची हिरवी सळसळ वाऱ्याबरोबर आनंद तरंग पसरवत होती.

 

सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments