श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ बाजारहाट ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

खरेदी पूर्वीची ते आँन लाईन

आठवडी बाजार आणि जत्रा या  प्रत्येक गावाच्या वैशिष्ट्यपुर्ण गो़ष्टी. शनिवार म्हणले की  आम्हाला आठवतो आमच्या गावचा म्हणजे सांगलीचा आठवडी बाजार. मारुती रोड पासून हरभट रोड ते कापड पेठ, गणपती पेठे पर्यत पसरलेला. आजच्या आँनलाईन खरेदी आणि लाँकडाऊन च्या प्रार्श्वभूमीवर याबाबतच्या आठवणी

तसं पहायला गेलं ते प्रत्येक व्यक्तीची खरेदीची सुरवात अगदी लहानपणापासून सुरु झालेली असते. पूर्वी आपल्या घरी नातेवाईक / ओळखीचे/ शेजारचे कुणीही कधीही अगदी अचानक येऊ शकत. फोनवर विचारून येणे, आधी Appointment घेणे मग येणे वेगैरे मँनर्स सांभाळण्याचा तो काळ नव्हताच मुळी. आणि घरी आलेल्याला चला सगळे मिळून हाँटेलात जाऊ आम्ही पण अजून या हाँटेलात गेलो नाही असे म्हणायचे ही ते दिवस नसायचे. अश्यावेळी आलेल्या पाहुण्यांसाठी चक्क घरात पोहे/ उपमा/ शिरा / चहा / सरबत असं काहीस बनवले जायचे.

कधीकधी अचानक आलेल्या स्नेंहीमुळे आईची गडबड व्हायची, चहा घेणार का?  असे विचारताच चक्क ‘हो’  म्हणायचा तो काळ असायचा आणि थांबा आधण ठेवते असे म्हणायला आणि चहा पुड संपलीय हे लक्षात यायला एकच गाठ पडायची.

अशावेळी जा ग / जा रे कोप-यावरच्या दुकानातून चहा पुड/ आले/ बिस्किटं घेऊन ये अशी आँर्डर दिली जायची. पैसे नंतर देते असं सांग काकांना आणि काका चक्क तयार व्हायचे.  घेतलेल्या सामाना बरोबर हातावर श्रीखंडाची गोळी ठेवायला विसरायचे नाहीत

साधारण लहानपणी पहिल्यांदा अशा प्रकारचा बाजारहाट केलेला सगळ्यांनाच आठवत असेल.

वाड्यात मित्र-मैत्रिणींबरोबर खेळ ऐन रंगात आला असताना आईचे बोलवणे आणि काहीतरी आणायला सांगणे हे जीवावर आल्यासारखे वाटायचे. मलाच का आई दरवेळेला बोलवते, माझ्या बहिणीला / भावाला पण कधी बोलवत नाही याचे दु:ख ही वाटायचे मात्र अभ्यास करत असताना असे बाहेर जाणे मात्र आवडायचं

जसं जसं मोठे होत गेलो तसे खरेदीचा आवाका वाढला आणि मग आम्हाला  आठवडा बाजारासाठी कामाला लावण्यात आले. आठवडा  बाजारासाठी यादी करणे, घरातल्यां  बरोबर  खरेदीला जाणे, दुकान (यादी) वाटून घेणे, खरेदी झाल्यावर मारुती मंदिरात समोरील रसवंती गृहात बसून लिटरच्या मापात उसाचा रस पिणे, ऐनवेळच्या यादी व्यतिरिक्त जास्ती खरेदीची मजा घेणे, बाजारहाट करताना बरोबरचीचे मित्र – मैत्रिणी भेटणॆ, त्यांचे पालक भेटणे,  मग आपल्या पालकांची ओळख करुन देणे, मग चर्चा अभ्यासावर येणे यात नेमके समोर शाळेतल्या बाई येऊन सामील होणे मग हळूच आई मी तिकडे ते घेऊन तिथे थांबतोय/ थांबतीय  ग म्हणून सटकणे, दरावरुन घासाघासी करणे, दर पटला नाही म्हणून पुढे जाणे (आणि परत पहिल्या वाल्याकडूनच त्याच दरात वस्तू घेणे), बाजूच्या मंदीरातील देवाला रस्त्यावरुनच चप्पल काढून हात जोडणे, सगळी ओझी सांभाळत चालत घरी येणे,  माल खराब निघाला तर दुस-यादिवशी बदलून घेणे त्यासाठी भांडण करणे , येताना आणि चार नवीन गोष्टी आणणे

हु:श दमलो / दमले  म्हणत परत घरात आईला मदत करणे

मस्त बाजारहाट असायचा तो. त्याची मजा माँल मधील अलिप्त वाटणा-या खरेदीला नाही, आँनलाईन खरेदीला तर नाहीच नाही. आँन लाईन खरेदी मधून “हाती आले ते पवित्र झाले ” या न्यायाने जी काही वस्तू आली ती स्विकारायची. काही कारणाने बदलायची झाल्यास ” भिक नको पण कुत्र आवर ” अशी परिस्थितीत.  त्या सगळ्या प्रोसीजर पेक्षा परत बाजारात जाऊन प्रत्यक्ष परत नवीन वस्तू आणलेली एकवेळ परवडेल. पण अर्थात श्रम / त्रास यातून थोडी मुक्तता मिळते हे नक्की

पण पारंपारिक बाजारहाट ची मजा काही वेगळीच होती हे नक्की आणि आपल्या पिढीने मस्त एन्जाॅय केला बाजारहाट, बरोबर ना?

(बाजार उठवणारा) अमोल ?

©  श्री अमोल अनंत केळकर

२२/०५/२१

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments