सौ राधिका भांडारकर
☆ माझी जडणघडण… भाग – २४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
मृणाल
मृणाल म्हणजे माझी आतेबहीण. माझ्यात आणि तिच्यात फार फार तर एखाद्या वर्षाचं अंतर असेल म्हणजे आम्ही तशा बरोबरीच्याच. एकत्रच वाढलो, एकत्र खेळलो, बागडलो, मोठ्या झालो आणि आयुष्याला जशी वळणं मिळत गेली तसं तसे आपापल्या विश्वात रमलो.
पण आज मागे वळून बघताना, मृणाल एक व्यक्ती म्हणून तिचा विचार करताना माझ्या मनात अनेकविध अनेक रंगी भावना जागृत होतात. कळत नकळत आपण या व्यक्तीमधल्या कोणत्या आदर्श मूल्यांकडे आकर्षित होत गेलो किंवा आजही आकर्षित होतो याचा विचार माझ्या मनात येतो आणि एकाच वयाच्या जरी असलो तरी त्या त्या वयातल्या वैयक्तिक गुणांचे मापन करताना मृणाल माझ्यापेक्षा अनेक बाबतीत सरस्, सर्वश्रेष्ठ होती—आहे आणि तिच्या या श्रेष्ठत्वाचा पगडा अथवा सरसतेचं प्रभुत्व माझ्या मनावर लहानपणापासूनच होतं असं वाटतं.
गोष्टी अगदी किरकोळही असतील. म्हणजे ज्या वयात मला साधी कणिक भिजवता येत नव्हती त्या वयात मृणाल अगदी सफाईदारपणे सुंदर मऊ गोलाकार पोळ्या करत असे. कुमुद आत्या कधी आजारी असली तर क्षणात ती साऱ्या घर कामाची जबाबदारी लीलया उचलत असे. अगदी तिच्या आईप्रमाणे घरातलं स्वयंपाक पाणी व इतर सारी कामे, शिवाय आईच्या औषधपाण्याचं वेळापत्रक सांभाळून, सर्व काही आवरून शाळेत वेळेवर पोहोचायची. शाळेतही अत्यंत हुशार विद्यार्थिनी म्हणून तिची ख्याती होती. एकही दिवस गृहपाठ केला नाही म्हणून तिला शिक्षा झाली नसेल. सुंदर हस्ताक्षरातल्या तिच्या वह्यांची आठवण आजही माझ्या मनात आहे. शिवाय ती नुसतीच अभ्यासू किंवा पुस्तकी किडाही नव्हती. लहान वयातही तिचं वाचन दांडगं होतं. तिला कोणतंही पुस्तक द्या ते ती एका बैठकीत वाचून काढायची. वाचनाचा वेग आणि आकलन या दोन्हीचा समतोल ती कसा काय साधायची याचं मला आजही नवल वाटतं. जे पुस्तक वाचायला मला एक दोन दिवस तरी लागायचे ते ती काही तासातच कशी काय संपवू शकते याचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं आणि अशा अनेक कारणांमुळे असेल पण ही समवयस्क आतेबहीण मनातल्या मनात माझी गुरुच बनायची. नकळत मी ही माझ्या मनाला सांगून पहायची,” मृणाल सारखं आपल्यालाही हे आलं पाहिजे…जमलं पाहिजे.”
एक मात्र होतं तिचं लहानपण आणि माझं बालपण -काळ एकच असला तरी आमच्या भोवतालचं वातावरण वेगळं होतं. मृणाल भावंडात मोठी होती म्हणून तिला जन्मत:च मोठेपण लाभलेलं होतं. आई-वडिलांची, भावंडांची ती अतिशय लाडकी होती हे नि:संशय. तिचे पप्पा ज्यांना आम्ही “बाळासाहेब” म्हणत असू- ते एक चतुरस्त्र व्यक्तीमत्त्व नक्कीच होतं. शिक्षण क्षेत्रामधील एक नामांकित व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता. शिक्षणाचे महत्त्व त्यांना फार होतं. शिक्षण याचा अर्थ केवळ पाठ्यपुस्तकीय किंवा केवळ जगण्यासाठी उपयुक्त साधन एवढंच नव्हे तर ते कसं चौफेर आणि अवधानयुक्त असावं याबद्दल ते खूप आग्रही होते. आपल्या तिन्ही मुलांनी नेहमीच उच्च स्थानावर असायला हवं म्हणून ते जागरूकही होते. त्याबाबतीत ते काहीसे कडक आणि शिस्तप्रिय मात्र होते. काहीसं छडी लागे छम छम विद्या येई घमघम या काव्यपंक्तीचा लाक्षणिक अर्थ त्यांच्या कृतीत जाणवायचा. त्यामुळे त्यांचा धाक वाटायचा. आदराबरोबर भीती वाटायची आणि मला असंही तेव्हा वाटायचं की मृणालभोवती एक धाक आहे, काहीसं दडपण आहे. ज्या मुक्त वातावरणात मी वाढत होते त्यापेक्षा मृणालभोवतीचं वातावरण नक्कीच वेगळं होतं. बाळासाहेबांची आणि माझ्या वडिलांची वैचारिक बैठक, दोघांच्याही व्यक्तिमत्त्वातील भव्यता जरी समान असली तरी कुठेतरी विचारांच्या प्रतिपादनात नक्कीच साम्य नव्हतं आणि याच फरकाचा परिणाम आमच्या जडणघडणीत होत असावा पण असे जरी असले तरी माझ्या आणि मृणालच्या अनेक आघाडीवरच्या प्रगतीत महत् अंतर होतं. हे अंतर पार करण्याची जिद्द माझ्यात नव्हती पण मी विलक्षण प्रभावित मात्र व्हायची.
सुट्टीत आम्ही नेहमी एकत्र खेळायचो. विशेषतः आमचे बैठे खेळ खूपच रंगायचे. त्यातले ठळक खेळ म्हणजे कॅरम, पत्ते आणि बुद्धीबळ. कॅरम आणि पत्ते खेळताना माझ्या मनात नेहमीच छुपा विचार असायचा की, “मृणालच आपली पार्टनर असावी. तिच्या विरोधात नको बाई खेळायला.” कारण त्यातही ती अग्रेसरच होती पण त्यात मला जाणवायचा तो तिचा समजूतदारपणा. खेळताना “कुठे चुकले” हे मात्र ती सांगायची पण ते सांगताना तिचा सूर अगदी विलंबित लईत असायचा.
तिच्यात आणि माझ्यात खेळताना एक फरक जाणवायचा तो म्हणजे मला खेळायला खूप आवडायचे, माझी वृत्ती खेळकर होती पण “खेळाडू” हा किताब मला मिळू शकला नाही. याउलट मृणाल मैदानी खेळात, बैठ्या खेळात, बॅडमिंटन, टेबल टेनिस सारख्या खेळातही प्रवीण होती. आमच्या शाळेच्या टीमची तर ती कॅप्टनच होती. अंतर शालेय जिल्हास्तरीय क्रीडा क्षेत्रात तिची उल्लेखनीय कामगिरी होती आणि खेळातलं हे प्राविण्य तिने महाविद्यालयीन स्तरावरही गाजवलं. तिला मिळणाऱ्या ट्रॉफीज पाहून त्या बालवयात, उमलत्या वयात तिच्याविषयी वाटणाऱ्या कौतुकानेच नव्हे तर “मी का नाही तिच्यासारखी होऊ शकत?” या वैष्यम्यानेसुद्धा मी भारावून जायचे.
खरं म्हणजे आमच्या परिवारामध्ये वेगवेगळी गुणसंपदा तशी प्रत्येकात होती पण मृणाल मला नेहमीच सर्वगुणसंपन्न वाटायची. दिवाळीत तिने काढलेल्या मोठमोठ्या सुबक रांगोळ्या, तिचे भरत काम, तिचे शिवणकाम, तिने बनवलेला फराळ या सगळ्यातला तिचा जो उत्कृष्टपणा असायचा त्याने मात्र मी थक्क व्हायचे. केवळ तिच्या गुणांची यादी देणे हा मात्र माझा या लेखनाविषयीचा उद्देश नक्कीच नाही.
तिच्या आयुष्याचा आलेख मांडताना म्हणजे अगदी शाळेत सतत पहिला नंबर मिळवणाऱ्या शाळकरी मुलीपासून ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या गव्हर्नमेंट कॉलेजच्या डीन पदी पोहोचणारी, पीएचडीचे अनेक विद्यार्थी घडवणारी, विद्यार्थीप्रिय एक बुद्धिमान स्त्री म्हणून तिच्याकडे पाहताना टप्प्याटप्प्यावर माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. अनेकविध गुणांची शिदोरी बांधून देताना त्या अज्ञात परमेश्वराने तिच्या भविष्यातल्या नियतीविषयीचा विचार आणि तरतूद करून ठेवली होती का?
कुमुदआत्या गेली तेव्हा मला वाटते मृणाल कॉलेजच्या पदवी क्रमाच्या शेवटच्या वर्षाला असेल. विनू, अनिल (तिचे धाकटे भाऊ) तर लहानच होते. खरं म्हणजे अर्धवट वयात ज्यांचं मातृत्व हरवतंं तेव्हा त्यांचं बिथरलेपण काय असू शकतं याची मी नक्कीच साक्षीदार आहे आणि त्याहीपेक्षा जास्त एका क्षणात प्रौढत्वात विरघळणारी बाल्याची रेषा मला अधिक कंपित करून गेली. क्षणात तिने डोळ्यातले अश्रू पुसले होते आणि लहान भावांचे भविष्य आणि वडिलांचं पोरकेपण, एकाकीपण अत्यंत प्रेमाने आणि जबाबदारीने स्वतःच्या झोळीत पेललं. एका क्षणात तिने एक वेगळं मातृत्वच स्वीकारलं जणू आणि आनंदाने नसलं तरी विनातक्रार तिनं ते सांभाळलं. सामान्यातलं असामान्यत्व म्हणजे काय, साधुत्व म्हणजे काय, संतपण कशाला म्हणायचं याविषयीचे अदृश्य सूक्ष्म सूत्र मला मृणालच्या व्यक्तिमत्त्वात नक्कीच शोधता आलं.
कुमुदआत्या गेल्यानंतरचं तिचं आयुष्य म्हणजे खरोखरच एक यज्ञ होता, एक तपस्या होती. जगण्याची तिची भूमिकाच पार बदलून गेली होती. भावंडांना आईची उणीव तिने कधीच भासू दिली नाही आणि पहाडासारख्या शिस्तप्रिय, कडक व्यक्तिमत्त्वांच्या वडिलांसाठीही ती सावली बनून राहिली. स्वतःच्या साऱ्या कायिक, ऐहिक सुखाच्या तिनं जणू काही समिधा केल्या पण आईविना जगताना परिवारातला आनंद टिकवण्यासाठी ती धडपडत राहिली. विनू आणि अनिल मार्गी लागल्यानंतर तिने स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला सुरुवात केली. तोपर्यंत ती चाळीशीत पोहचली होती. अर्थात तिने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, करिअरचे उच्चतम टप्पे पार केलेलेच होते. अपार जिद्दीने आणि चिकाटीने शिष्यवृत्ती मिळवल्या, परदेशी सेमिनार गाजवले. विद्यार्थ्यांचे प्रेम मिळवले. शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत गरजेचा घटक म्हणजे गुणांकनातला प्रामाणिपणा. तिने तो कायम जपला. स्पर्धात्मक परीक्षेसाठीच्या परीक्षकांच्या पॅनलवर असताना तिला करोडपती बनण्याची अनेक प्रलोभने दाखवली गेली पण तिने ती अत्यंत तात्विकपणे झुगारून लावली आणि त्यासाठी तिला ते पदही सोडावे लागले पण त्यामुळे ती यत्किंचितही विचलित झाली नाही.
खरं सांगू जेव्हा मी आणि मीच नव्हे तर तिच्या आजूबाजूचे सारे समवयस्क एका ठराविक चाकोरीतलं सुखी आयुष्य जगत होते तेव्हा मृणाल मात्र जीवनातली अडथळ्यांची शर्यत अथकपणे नेटाने खेळत होती. सर्वगुणसंपन्नतेची शिदोरी तिला कोणा अज्ञात शक्तीने बांधून दिली होती त्या बळावर ती खंबीरपणे स्वाभिमानाने तिचं जीवन जगत होती.
अनेकवेळा मला ती काहीशी घट्ट विचारांची वाटते. तिच्यात एक क्रिटीक आहे असंही जाणवतं. ती पटकन् किंवा उगीचच समोरच्याला बरं वाटावं म्हणून कौतुक करण्याच्या भानगडीत पडत नाही.हा गुण समजायचा की तिच्या व्यक्तीमत्त्वातला अभाव मानायचा हे मला माहीत नाही. पण ती एक आवडती प्राध्यापिका, प्राचार्य होती. तिने अनेकांना घडवलं याचा अर्थ तिने कुणाही गुणवंताचं मानसिक खच्चीकरण न करता किंवा अवास्तव कौतुकही न करता त्याचा यशाचा मार्ग त्याला दाखवून दिला हे सत्य आहे. शिक्षक कसा असावा याचा ती वस्तुपाठच आहे.
एका अपघातात तिला कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झालं तरी पण कधी असहाय्यतेचं अथवा अधूपणाचं भांडवल करून जगणं तिने मान्य केलं नाही. अशाही परिस्थितीत आजही कौटुंबिक सुखदुःखाच्या प्रसंगी, सामाजिक वा इतर अनेक ठिकाणी तिची मनापासून उपस्थिती असते.
इतक्या मोठ्या पदावर विराजमान असतानाही निवृत्तीनंतर मिळणाऱ्या वेतनासाठी केवळ सामाजिक करंटेपणाशी, संकुचित जळाऊ वृत्तीशी तिला विनाकारण लढा द्यावा लागला होता. स्वतःच्या शारीरिक व्याधींचाही बाऊ न करता केवळ “भागधेय” असं समजून ती कणखरपणे लढत राहिली. ती शरण कधीच गेली नाही.
आजही आजारी नवऱ्याची मनापासून सेवा करताना तिचा तोल ती कधीही ढळू देत नाही. आम्हीच तिच्यावरच्या प्रेमामुळे तिला काहीबाही सूचना देत असतो पण ती एकच सांगते,” ठीक चाललंय् माझं. करू शकते मी. इतका काही त्रास नाहीये.”
अमेरिकेवरून येणाऱ्या धाकट्या भावासाठी आजही त्याच वात्सल्याने ती त्याच्या आवडीचे खाद्यपदार्थ स्वतःच्या हाताने बनवते. माझ्या मनात नेहमी येतं इतक्या गुणसंपन्न बुद्धिमान व्यक्तीचं आयुष्य कसं असायला हवं होतं..? निवांत आरामदायी… असं नक्कीच नाही जे आज तिचं आहे. जगत असताना कदाचित तिच्या हातून फार मोठ्या भावानिक चुका झाल्या का? कुठेतरी व्यवहारात ती कमी पडली का? की तिच्या आयुष्यातल्या सुखाच्या वेळाच चुकल्या?
ती मला एकदा म्हणाली होती, “ सुख म्हणजे नक्की काय असतं ते मला माहीत नाही पण मी माझ्या दुःखाला, वेदनांना शंभर टक्के देऊन त्यांना मात्र माझ्या ताब्यात ठेवलेलं आहे.” अशावेळी मला तिच्या स्त्रीत्वात एक कणखर पौरुष दिसतं.
पुन्हा पुन्हा मी मृणालचा विचार करते तेव्हा मला वाटतं मृणालसारख्या व्यक्ती इतरांनाच उदाहरणादाखल असतात, आधारभूत असतात आणि मुख्य म्हणजे अशा व्यक्ती कधी निराधार नसतातच. त्यांच्या अंतरातलं बळ हाच त्यांचा आधार असतो. बाह्य जगाच्या आधाराची त्यांना गरज नसते का? एक मात्र नक्की की स्थितप्रज्ञतेचे प्रवाह मला तिच्या जगण्यात नेहमी जाणवतात. खिंड लढवणाऱ्या योध्याचे दर्शन मला तिच्यात होते. मी असं म्हणणं म्हणजे अतिशयोक्ती आहे किंवा अवास्तव केलेलं ग्लोरीफिकेशन आहे असं मला या क्षणीही अजिबात वाटत नाही.
मृणाल या शब्दाचाही मला खरा अर्थ तिच्यात सापडतो… .. कमळाचा देठ .. .. तो कुठे दिसतो का? चिखलात घट्ट रुतलेला असतो. आपल्याला दिसतात ती फक्त पाण्यावरची गोजिरवाणी सुरेख उमललेली कमळं… … मृणालही अशीच आहे. जीवनरूपी दलदलीत पाय घट्ट रोवून रुतलेली. चेहऱ्यावर मात्र सदैव हास्याचं कमळ फुललेलं.
क्रमशः…
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈