सुश्री उमा वि. कुलकर्णी
☆ स्नेह ताराबाईंचा… ☆ सुश्री उमा वि. कुलकर्णी ☆
बर्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सुमारे तीसपेक्षा जास्त वर्षं झाली असतील. त्या वेळी नियमीतपणे रेडिओ ऐकला जायचा. तसा रेडीओ ऐकत असताना वेगळ्या विषयावरचं ते व्याख्यान ऐकलं. लोकसाहित्यातून दिसणार्या स्त्री-मनाचा आढावा घेणारं ते व्याख्यान होतं. त्यावेळी व्याख्यानातून काही लोकगीतांचेही संदर्भ सांगितले गेले होते. संपूर्ण भाषण लक्ष देऊन ऐकल्यावर व्याख्यातीचं नावही समजलं, सांगलीच्या प्रा. तारा भवाळकर. त्या संपूर्ण संदर्भानिशी ते नाव तेव्हा डोक्यात पक्कं कोरलं गेलं. कायमचं.
याच सुमारास कमल देसाई यांच्याशी ओळख झाली आणि बघता बघता स्नेह वाढला. कधीतरी त्यांच्या तोंडून ताराबाईंचा `तारी.. ‘ असा उल्लेख ऐकला होता, पण तेव्हाही त्यांच्याशी कधीकाळी मैत्री होईल असं वाटलं नव्हतं.
पुढे एका व्याख्यानाच्या निमित्तानं सांगलीला जायचा प्रसंग आला. कदाचित तेव्हा माझं नाव ताराबाईंनी सुचवलं असावं. तेव्हा ताराबाईंची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांच्या घरी गेले. तिथे उषाताईही भेटल्या. ताराबाई काही वेळासाठी कॉलेजमध्ये गेल्या होत्या. तेव्हा उषाताईंची सैपाकघरात काम करायची पद्धत आणि त्यांचा कामाचा उरकही पाहिला. कमलताईंकडून नावं ऐकल्यामुळे मला तरी काहीही अवघडल्यासारखं वाटलं नाही. ही लक्षात राहाण्यासारखी पहिली भेट होती.
अतिशय तरतरीत आणि भरपूर उंचीचं हे व्यक्तीमत्व तेव्हा कायमचं नजरेत आणि मनात भरलं. त्यांचं रंगभूमीशी असलेलं नातं त्या वेळी तरी मला माहीत नव्हतं. पण त्यांचं व्यक्तीमत्व मात्र ठसठशीत असल्याचं त्याच वेळी जाणवलं होतं.
तेव्हा ताराबाई अजूनही नोकरीत होत्या. बहुधा तेव्हा त्या प्रिन्सिपॉलही होत्या. नोकरीतली शेवटची काही वर्षं राहिल्याचं त्यांनी सांगितल्याचंही आठवतं. त्यामुळे त्यांचा तिथला तरी वेळ अतिशय महत्वाचा होता. पण तरीही वेळ काढून मी पुण्याला निघायच्या वेळी त्या घरी आल्या, स्टँडपर्यंत पोचवायला आल्या आणि, अजूनही आठवतं, त्यांनी खास सांगलीचे पेढेही आणून दिले होते (हे त्यांचं आतिथ्य अजूनही कायम आहे). त्याच वेळी त्यांनी अतितच्या बसस्टँडवर मिळणार्या खास भजी आणि बटाटेवड्यांविषयीही सांगितलं होतं. त्या क्षणी मला त्यांच्या त्या जिंदादिलाचं अपरुप वाटलं होतं. त्यांची आज्ञा पाळून परतीच्या प्रवासात मीही ते विकत घेऊन चवीनं खाल्ले होते.
कमल देसाईशी आमचं नातं आणि स्नेहही जुळला होता. दत्ता देसाई हा तर विरूपाक्षांचा सख्खा आतेभाऊ. त्याच्याकडूनही ताराबाईंचं नाव ऐकलं होतं. कमलताईंची भावंडं मिरज-सांगलीत असल्यामुळे त्या दोघींचा खूप पूर्वीपासून स्नेह होता. एकमेकीला `तारी.. ‘- `कमळी.. ‘ म्हणण्याइतकी जवळीक होती. कमलताई जेव्हा पुण्यात असत तेव्हा सांगलीच्या आठवणी निघाल्या की त्यात ताराबाईंची आठवण निश्चितच असे. त्यामुळे ताराबाईंच्या भेटी वरचेवर होत नसल्या तरी नाव सतत परिचयाचं होऊन राहिलं होतं.
नंतरच्या एकदोन भेटी कमलताईंमुळे झालेल्या आठवतात. त्याहीवेळी ताराबाईंकडून पेढे न चुकता मिळायचेच. कमलताईंचा पंचाहत्तराव्वा वाढदिवस सांगलीकरांनी मोठ्या थाटात साजरा केला होता. मुंबई-पुणे-बेळगाव आणि इतर गावांमधून कमलताईंचे चाहते आले होते. विद्या बाळ, सुमित्रा भावे, पुष्पा भावे, अशोक शहाणे असे मोठमोठे लेखक-विचारवंत त्यासाठी हजर होते. त्या सगळ्यांशी आस्थेनं वावरणार्या ताराबाई मला आजही आठवतात.
त्या नंतरही कुठल्याही निमित्तानं सांगलीला गेले तरी ताराबाईंची भेटही ठरलेलीच. एक मात्र मला आठवतंय तसं कमलताईंच्या वाढदिवसांनंतर आमच्यामधला औपचारिकतेचा बुरखा गळून पडला आणि नात्यात मोकळेपणा आला.
कमलताई वारल्या, आणि मी आणि ताराबाई जास्त जवळ आलो. त्याच सुमारास फोन करणंही सुकर होत चाललं. बोलायला मुबलक विषयही मिळत गेले. लोकसाहित्य हा माझ्याही आस्थेचा विषय होता आणि आहे. तसंच कर्नाटक आणि कन्नड संस्कृतीविषयी ताराबाईंनाही आस्था असल्यामुळे विषयांना अजिबात वानवा नव्हती. त्यांनी लोकसाहित्याच्या निमित्तानं संबंधित कर्नाटक पालथा घातलेला असल्यामुळे आमच्या गप्पा कधीच एका बाजूनं राहिल्या नाहीत. माझं कुतुहल, त्यातून निघालेले प्रश्न आणि ताराबाईंचा व्यासंग यामुळे गप्पांना रंगत जायला वेळ लागााायचा नाही. मला काही कन्नड लोककथा आढळल्या की मी त्यांना हमखास फोन करे. त्याही तशाच प्रकारची मराठीत एखादी कथा माहीत असेल तर सांगत. ऐकताना मात्र एखाद्या लहान मुलीचं कुतुहल त्यांच्यामध्ये असे.
अनेकदा गिरीश कार्नाडांच्या नाटकांमागील लोककथेवरून विषय सुरू होई आणि भारतभरच्या तशा प्रकारचा धांडोळा घेण्यात अक्षरश: तासच्या तास निघून जात. तसंच चंद्रशेखर कंबारांच्या जोकुमारस्वामी सारख्या नाटकाचा विषय निघाला तर त्या ती प्रथा मानणार्या काहीजणींना भेटून, त्याचा आणखी तपशिल गोळा करून मला सुपूर्द करत. त्यातूनच त्यांची `जोकुमारस्वामी’ या नाटकाची प्रस्तावना तयार झाली.
डॉ तारा बाई व सुश्री उमा कुलकर्णी
ताराबाईंचा सांगलीकरांनी केलेला वाढदिवस मला आजही आठवतो. ज्या स्नेहभावानं सगळ्यानी कार्यक्रम योजला होता, साजरा केला होता त्यातून त्यांचं ममत्व स्पष्ट दिसत होतं. पुण्यासारख्या गावात माझं साहित्यजीवन गेल्यामुळे मला तेव्हा त्याचं खूपच अपरूप वाटलं होतं. त्याच बरोबर ताराबाईंनी संपूर्ण गावातल्या जीवनाशी कसं स्वत:ला आत्मियतेनं जोडून घेतलंय हेही जाणवलं होतं. ते मी सार्वजनिकरित्या त्या वेळी बोलूनही दाखवलं होतं.
आता ताराबाईंची अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर या परिसरात जो आनंदाचा जल्लोष उसळला, त्याचं मला अजिबात नवल वाटत नाही.
या कार्यक्रमात सहभागी करून घेताना त्यांनी माझ्याविषयी जो विश्वास आणि स्नेह दाखवला, त्याला मी लायक होते की नाही, या विषयी मी तेव्हाही साशंक होते, आताही आहे.
असाच संकोच वाटण्यासारखा आणखी एक प्रसंग ताराबाईंनी आमच्यावर आणला. एका कार्यक्रमासाठी आम्ही दोघेही सांगलीला गेलो असताना तिथल्या आकाशवाणीवर `आर्काईज’साठी त्यांनी आम्हा दोघांची, म्हणजे मी आणि विरुपाक्ष, मुलाखत घेतली. मुलाखत खूपच मोठी होती. विरूपाक्षांचा पंचाहत्तरावा वाढदिवस होता तेव्हा त्यांनी `साधना’च्या विनोद शिरसाटांशी बोलून त्या आठवड्याच्या अंकात प्रकाशित केली आणि आम्हाला आनंदाचा धक्काच दिला. पुढे तीच मुलाखत एका ग्रंथात रा. चिं. ढेरें, कमलताई आणि त्या स्वत: यांच्या मुलाखतीच्या सोबत प्रकाशितही केली! एवढ्या मोठ्या संशोधकांच्या मांदियाळीत समाविष्ट व्हायची आमची खरोखरच लायकी आहे काय, हा प्रश्न मला तेव्हाही पडला होता आणि आजही पडतो.
०००
कोरोना आला आणि आम्हा दोघींच्याही जीवनात उलथापालथ करून गेला. सुपारे पन्नास वर्षांच्या सहवासानंतर उषाताईं कोरोनामध्ये वारल्या. त्यांच्या जाण्यानं ताराबाईंच्या जीवनातही एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. सांगलीतला त्यांचा मित्रपरिवार त्यांची मोठ्या प्रमाणात काळजी घेत असला तरी काही व्याकूळ क्षण पेलण्यासाठी आम्हा दोघींनाही एकमेकीची गरज लागत होती. त्यामुळे निरुद्देश आणि काहीही कारण नसताना केवळ भावनिक विसाव्यासाठी अक्षरश: केव्हाही एकमेकींना फोन करणं सुरू झालं. त्या वेळी तर रात्री अकरा-बारा वाजताही आम्ही एकमेकीना फोन करत एकमेकीना आधार देत-घेत होतो. या वेळी सामोर्या येणार्या विविध व्यावहारीक आणि मानसिक अडचणींविषयी आम्ही सतत बोलत होतो. त्या नाशिकला गेल्या तरी आमच्या बोलण्यात खंड पडत नव्हता. अशाच मनस्थितीत एकदा आमची सांगलीला त्यांच्या घरीही भेट झाली. तेव्हाची गळाभेट दोघींनाही शांतवणारी होती.
ताराबाईंच्या पुण्यातल्या कार्यक्रमांना न चुकता हजेरी लावणे ही माझ्या दृष्टीनं पर्वणीच होती. मग पुणे विद्यापिठाचा असो, साहित्य अकादमीचा असो किंवा महाराष्ट्र फौंडेशनचा मोठा पुरस्कार-समारंभ असो. आधी किंवा नंतर त्यांना भेटून विशेष गप्पा मारणं ही दोघींच्या दृष्टीनंही पर्वणीच! अशाच गप्पांमधून त्यांच्या हरीवंशराय बच्चन यांच्या `मधुशाला’च्या अनुवादाची माहिती कळाली. पाठोपाठ त्यांनी अनेक अनुवाद म्हणूनही दाखवले.
करोनाच्या काळात त्या काही कथांचं रेकॉर्डिंग करून पाठवायच्या. त्यातल्या काही कथा इतक्या उत्तम होत्या की मी त्यांना लिहिलं, `तुम्ही उत्तम कथाकार आहात. तुम्हाला केवळ लोककथाच्या अभ्यासक या सदरात का टाकलं जातं? मला तर काही कथा अनंतमूर्तींच्या तोडीच्या वाटतात.. ‘
त्यांचं `सीतायन’ आलं. त्या सुमारास त्या पुण्यात माझ्याकडे होत्या. पुस्तकाचा झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही एक छोटा कार्यक्रम केला. माझ्या घरासमोर राहाणार्या रवी परांजपे यांच्या घरासमोरच्या जागेत कार्यक्रम घ्यायला स्मिताताई परांजपेंनी परवानगी दिली आणि मुकुंद कुळे यांनी ताराबाईंची मुलाखत घेतली. अत्यल्प वेळात केलेल्या पब्लिसिटीला प्रतिसाद देत बरीच माणसे जमली आणि सगळ्यांनीच त्या मुलाखतीचा आनंद घेतला. मुलाखत आवडल्याचे नंतरही कितीतरी दिवस फोन येत होते.
इथे माझं एक निरिक्षण मला नोंदवलंच पाहिजे. साहित्य-जीवनात आम्हाला बर्याच जणांचा स्नेह मिळाला. त्यातल्या प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी होती. सगळेच एकमेकाच्या विचारधारेचा सन्मान करत असल्यामुळे, कुणाचाही कल कुठेही असला तरी आम्ही कडवे बनलो नाही. विविध विचारप्रवाह समजून घेऊन समृद्ध होत जायचं, या आमच्या मानसिकतेला कुणीच अटकाव केला नाही. उलट ती ती विचारधारा सामावून घेत आम्हाला अधिकाधिक श्रीमंत करत गेले.
त्यातलंच एक महत्वाचं नाव तारा भवाळकर हे आहे. मग त्यांचं ऋण नको का मानायला?
०००००
© सुश्री उमा वि. कुलकर्णी
मो. ९४२३५७२५५०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈