श्री संजय जगन्नाथ पाटील
☆ “सर, एक अवघड काम आहे…” ☆ श्री संजय जगन्नाथ पाटील ☆
“सर, एक अवघड काम आहे.. “
तरुण भारत चे ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर यांचा फोन..
म्हटलं.. ” काय झालं ? “
” कृष्णाकाठ दिवाळी अंकासाठी तारा भवाळकर यांचा लेख हवाय.. त्यांच्यापुढं जायची भीती वाटते.. दडपण येतं.. जरा मिळवून द्या की तेवढा लेख.. “
शिवराजचा स्वतःचा दिवाळी अंक आहे कृष्णाकाठ नावाचा..
ही घटना सहा सात वर्षांपूर्वीची..
(हा फोटो.. सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित झालेल्या मायवाटेचा मागोवा.. या सिरीयलच्या रेकॉर्डिंग वेळचा.)
वयोमानानुसार ताराबाईंना लिहीताना त्रास होतो. त्यामुळं त्या लिहिण्याचं काही अंगावर घेत नाहीत हे ठाऊक होतं.. त्या काळात लिहिणं आणि प्रकृती मुळं बाहेरचे कार्यक्रम घेणं त्यांनी बऱ्यापैकी कमी केलेलं..
मग हे लेखाचं जमावं तरी कसं.. ?
प्रयत्न करून बघतो म्हणालो..
पण फारशी आशा नव्हती..
ताराबाईंशी बोललो.. अशानअसं म्हणून सांगितलं..
” सगळं तुझं ठीक रे.. पण मला आता सलग लिहिणं जमत नाही.. हात भरून येतात.. “
बाईंचं खरंच होतं..
लोकसाहित्यावर निगुतीनं काम करणाऱ्या सरोजिनीआक्का बाबर आणि तारा भवाळकर यांच्या विषयी मला आदरयुक्त गुढ आकर्षण होतंच.. सरोजिनी आक्कांचं लोक वाङ्मयाचं प्रचंड संकलन, त्यावरचं कृष्णामाईच्या तीरावरच्या तोंड भरून बोलल्या जाणाऱ्या साजीवंत शैलीतलं स्मरण रंजनात्मक लेखन.. याची भुरळ पहिल्यापासून..
तर याबरोबरच लोकसाहित्याची सूत्रबद्धपणे मांडणी करून लोक संस्कृतीचे अंतर्गत अदृश्य ताणेबाणे दागिन्यांच्या घडणावळीप्रमाणे उलगडून वस्तूनिष्ठपणे समोर मांडणाऱ्या लखलखीत ताराबाई..
या ना त्या अर्थानं दोघीही सांगलीच्याच..
इथल्या मातीचा गुण त्यांच्या अंगी भिनलेला.. अगदी ऐसपैस.. दोघीही लोक साहित्याच्या प्रांतातल्या जुळ्या बहिणीच…
कोणत्याही निमित्तानं त्यांच्याशी बोलणं हा साक्षात्काराचाच योग…
बोलणं म्हणण्यापेक्षा त्यांचं ऐकणं हेच अचंबित करणारं… ओघंवतं आणि रसाळ.. विषयाचे पापुद्रे अलगद उलगडत आतल्या गाभ्या पर्यंत कसे पोहोचलो ते ऐकणाऱ्याला समजणार सुद्धा नाही..
मी आकाशवाणीतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन बाहेर पडल्यावर एक छोटा रेकॉर्डर विकत घेतलेला.. त्याला माईक जोडून थोडंसं जुगाड करून आवडीचं काही दिसलं की रेकॉर्डिंग करायचो.. तशी ही जुळणी होतीच.. मी ताराबाईंना सुचवलं.. “तुम्ही बोलत रहा.. विषयानुरूप.. मी त्याचं ध्वनिमुद्रण करून घेतो.. ते ऐकून नंतर लिहून काढू..”
हा उपाय त्यांना आवडला..
सीतेसंबंधीच्या निरनिराळ्या प्रांतातल्या काही पारंपारिक रचनांचा मागोवा घेत सजग नितळ तर्काधिष्टित सम्यक नजरेने सितेकडं पाहूया असं त्यांचं म्हणणं पडलं..
ही आमच्या रेकॉर्डिंग ची पहिली सुरुवात..
ताराबाई, मी आणि शिवराज..
हा लेख दिवाळी अंकात छापून आला.. पुढं ताराबाईंना वाटू लागलं की या लेखातून व्यक्त झालंय त्याहूनही बरंच काही सांगता येण्यासारखं शिल्लक आहे.. तत्पूर्वी त्यांनी या विषयावर थोडं फार कुठंकुठं लिहिलंही होतं..
म्हटलं आहे डोकीत तर जसं जमेल तसं ध्वनिमुद्रण करत राहू..
मग पुढचं ध्वनिमुद्रण ठरलं.. पुढच्या एक दोन रेकॉर्डिंग ला आम्ही दोघंच.. त्या बोलायच्या आणि मी ऐकत बसायचो..
अधिकाधिक सहजता येण्यासाठी ताराबाईंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या काही मंडळींना बोलावून त्यांच्यासमोर सीता अख्यान लावलं तर आणखी मजा येईल असं वाटत होतं.. कारण समोर श्रोते असले की बाई अधिक खुलतात हे ठाऊक होतं..
मंडळी जमत गेली.. सगळ्यांचीच विषयातली गोडी वाढत गेली.. प्रा. अविनाश सप्रे, प्रतिमा सप्रे, नीलम माणगावे, आशा कराडकर, उज्वला परांजपे, प्रतिभा जगदाळे, सुनीता बोर्डे असा दरबारच भरू लागला, सीता समजून घेण्यासाठी…. एक वेगळाच भारून जाण्यासारखा माहोल तयार झालेला.. ध्वनिमुद्रण झालं की नंतर या विषयावर सगळ्यांच्या चर्चा रंगायच्या.. शंका निघायच्या आणि बाई उत्तरं द्यायच्या.. पुण्याच्या प्रतिभा गुडी यांनी संपूर्ण ध्वनिमुद्रण ऐकून त्याची संहिता तयार केली..
आज ते पुस्तक ‘सीतायन ; वेदना विद्रोहाचे रसायन.. ‘ या नावानं प्रकाशित झालंय.. सध्या हे बहुचर्चित पुस्तक जाणकारांच्या नजरेत आहे..
ताराबाईंनी मनोगतात लिहिलंय…
” कोरोना महासाथीच्या जागतिक आणि अनेकांच्या आयुष्यातील वैयक्तिक पडझडीच्या काळानंतर लगेच सीतायनातील प्रमुख कथाकथन मी सर्वांसमोर केलं होतं.. या सर्जक कामामुळे आम्ही सगळे सावरलो.. विशेषतः मला आयुष्याच्या उत्तरायणात या सीतायनाने खूप आधार दिला… “
या ध्वनीमुद्रणाच्या निमित्तानं सगळे एका प्रचंड ताणातून मोकळे झाले.. सीतेच्या वेदनांच्या कहाण्या ऐकताना आमची दुःखं छोटी वाटू लागली..
हे ध्वनिमुद्रण झालं आणि पुन्हा पूर्ववत पोकळी जाणवू लागली.. ताराबाई सतत अभ्यासात मग्न असल्या आणि त्यांच्या मेंदूत सतत काही उलथापालथ चालू असेल तर त्या ठणठणीत असतात हे आम्हाला जाणवलेलं.. त्यातूनच त्यांना रिकामं ठेवायचं नाही हे ठरवून वेगवेगळे विषय त्यांच्यासमोर काढत गेलो.. त्यातून बरीच ध्वनीमुद्रणं झाली..
जुन्या तरी नव्या कथा’ या नावानं त्यांनी काही कथा कथन केल्या.. जुन्यापुराण्या सांगीवांगीच्या कथांना नव्या आशयानं अभिव्यक्त करण्याचा एक वेगळा प्रयत्न त्यांनी केला.. त्याचंही पुस्तक झालं.. नंतर, “एक ओवी, एक कथा, एक प्रथा “ या नावानं बरंच ध्वनिमुद्रण केलं.. पारंपरिक ओवीच्या अनुषंगानं त्याच्या मागचं कथासूत्र शोधणं आणि इथल्या परंपरेचे त्यांचे अंत:संबंध उलगडणं असा एक वेगळाच आकृतीबंध ताराबाईंनी शोधला.. हा एक वेगळाच प्रयोग होता.. यात गीत होतं, कथा होती आणि सजगपणे सर्जकतेनं बुद्धीनिष्ठपणे या गोष्टीकडं पाहण्याची एक दृष्टी होती..
आकाशवाणी सांगलीनं ताराबाईंची पूर्वी एक प्रदीर्घ मुलाखत घेतली होती.. त्यांचा लोकसाहित्याचं संशोधन, त्यांनी लिहिलेल्या कथा, अनुवाद, एकांकिका आणि नाटक याचं लेखन, नाट्यविषयक लेखन असे बाईंचे अनेक अभ्यासाचे विषय आहेत.. त्याच धर्तीवर या सर्व अभ्यासाची एक सारभूत मुलाखत ध्वनिमुद्रित करायची तयारी केली.. अविनाश सप्रे यांनी त्यांची मुलाखत घेतली.. जवळजवळ सात ते आठ तासाचं अभ्यासपूर्ण ध्वनिमुद्रण हाताला लागलं.. यावेळी सदानंद कदम या प्रक्रियेत सामील झाला.. त्याने याची व्हिडिओ केली.. या अभ्यासपूर्ण मुलाखतीचं पुस्तक लवकरच आता भेटीला येईल..
नंतरच्या काळातील ताराबाईंचे वेगवेगळ्या विषयांवरचे लेख, त्यांनी इतरांच्या पुस्तकांना दिलेल्या प्रस्तावना, परिसंवाद, विविध विषयांवरचं त्यांचं लेखन, भाषणं, मनोगतं असं अनेक प्रकारचं मौलिक ध्वनिमुद्रण जमत गेलं.. सोयीसाठी ते सदानंदकडं एकत्रित ठेवलं आहे…
साधारण तीन साडेतीन वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या कल्पक कार्यक्रम अधिकारी उमा दीक्षित यांची आकाशवाणीकडून दूरदर्शनकडे बदली झाली.. उमा दिक्षित यांनी त्याआधी आकाशवाणी मुंबईसाठी ताराबाईंची तीन भागात मुलाखत घेतलेली.. त्यावेळी त्यांचा माझा परिचय गडद झालेला..
दूरदर्शन आणि आकाशवाणीचं खातं एक असलं तरी माध्यम नवं..
दूरदर्शनला आल्याआल्या एखादा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरुवातीलाच हाती घ्यावा असं उमा ताईंच्या संवादातून ठरलं.. पाऊल धाडसाचं होतं.. त्याचाच एक भाग म्हणून तेरा भागात लोक साहित्य संबंधातली ताराबाईंची समग्र मुलाखत घ्यायचं ठरलं.. अडीच तीन महिने या विषयावर चर्चा झाल्या.. विषय ठरले.. मुकुंद कुळे यांनी मुलाखत घ्यावी असा विचार केलेला.. माय वाटेचा मागोवा’ ही अभ्यासपूर्ण मालिका दूरदर्शन साठी रेकॉर्ड झाली.. बाई अखंडपणे रोज पाच पाच सहा सहा तास हातात कागदाचा चिटोराही न घेता बोलत राहिल्या.. हे विस्मयकारक होतं.. ताराबाईंच्या जीवनभरातल्या अभ्यासाचा प्रदीर्घ अनुभव चित्रीत झाला.. एक महत्त्वाचा दस्तऐवजच दूरदर्शनच्या प्रयत्नानं आकाराला आला.. लोकसहित्याचं सगळं संचित दृकश्राव्य माध्यमात जपलं गेलं.. त्यासाठी उमा दिक्षित यांची संपूर्ण टीम सांगली जवळच्या बुरुंगवाडी या गावात पाच दिवसाच्या मुक्कामाला आली.. तिथल्या निसर्गरम्य परिसरात रमली. बुरुंगवाडी चे विजय जाधव आणि ग्रामस्थांचं लाख मोलाचं सहकार्य लाभलं.. अगदी कमी वेळात अथक प्रयत्न करत मोलाचं काम केलं गेलं.. लोक संस्कृतीच्या अभ्यासातलं सार लोकांसाठी, पुढच्या पिढींसाठी टिपून ठेवलं गेलं..
बघता बघता, आज जवळजवळ 40 ते 50 जीबी इतका डाटा तोही mp3 ऑडिओ फॉर्मेट मध्ये आमच्याकडे संकलित झाला आहे.. बाकी इतर माध्यमांकडं असलेला संग्रह वेगळाच..
कृष्णाकाठ मधल्या एका लेखासाठी हा छोटा प्रवाह उगम पावला.. हळूहळू या कामाचं स्वरूप इतकं वाढत जाईल असं वाटलं ही नव्हतं..
ताराबाईंच्या या प्रचंड अभ्यासानं त्यांच्या कार्यानं दिपून जायला होतं.. 85 वय होऊन गेलं तरी अजूनही त्या नव्या उमेदीनं कार्यमग्न असतात.. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निमित्तानं चक्रधर ज्ञानेश्वर तुकाराम, सगन, होनाजी, पठ्ठे बापूराव, ते वाडीवस्तीतल्या, तुमच्या माझ्या घराघरातल्या माय माऊलींच्या तोंडची लोकभाषा त्यांनी मराठी सरस्वताच्या मखरात मानानं मिरवली आहे.. असंच काहीसं वाटतं आहे.
आपणाला त्या सोबत घेत आहेत यानंच हुरळून जायला होतं…
****
© श्री संजय जगन्नाथ पाटील
9422374848
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈