श्री सुहास सोहोनी
☆ माझी कामाठीपुर्यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक.. ! – भाग – १ – लेखक : श्री तात्या अभ्यंकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
१९९१-९२चा सुमार. मी तेव्हा नौकरी करत होतो.. फोरासरोडवरील झमझम नावाच्या सरकारमान्य देशी दारूच्या बारमध्ये.. कॅशियर कम मॅनेजर होतो मी.. आजूबाजूला सारी वेश्यावस्ती, दारुवाले, मटकेवाले, पोलिस, गुंड.. यांचंच सारं राज्य.. आयुष्यात एके से एक अनुभव आले त्या दुनियेत. कधी सुखावणारे, कधी दुखावणारे, कधी विचार करायला लावणारे, काही चित्र, काही विचित्र, काही नैसर्गिक, काही अनैसर्गिक.. अस्वस्थ करणारे.. आजूबाजूला अनेक प्रसंग रोजच्या रोज घडत होते.. स्वाभाविक, अस्वाभाविक.. पण प्रत्येक प्रसंग एक अनुभव देऊन गेला..
बारमध्ये असंख्य प्रकारची माणसं येत.. रोजचे नियमित-अनियमित बेवडे हजेरी लावायचेच.. त्याशिवाय रोज एखादी ‘काय अभ्यंकर, सगळं ठीक ना? काय लफडा नाय ना?” असं विचारणारी नागपाडा पोलिस स्टेशनच्या कदम हवालदाराची किंवा त्याच्या सायबाची फेरी.. मग कुठे बरणी उघडून फुकट चकली खा, चा पी असं चालायचं.. कधी हलकट मन्सूर किंवा अल्लाजान वेश्यांकरता भूर्जी, आम्लेट, मटन सुका, खिमपाव असं काहीबाही पार्सल न्यायला यायचे.. कधी अफूबाज, चरसी डब्बल ढक्कन यायचा.. कधी बोलबोलता सहज सुरा-वस्तरा चालवणारे हसनभाय, ठाकूरशेठ सारखे गुंड चक्कर काटून जायचे.. “क्यो बे तात्या, गांडू आज गल्ला भोत जमा हो गया है तेरा.. साला आजकल बंबैकी पब्लिकभी भोत बेवडा हो गएली है.. साला, एक हज्जार रुप्या उधार दे ना. ” असं म्हणून मला दमात घ्यायचे..
कधी त्या वस्तीत धंदा करणारे हिजडे यायचे.. उगीच कुठे ठंडा, किंवा अंडापाव, असंच काहीबाही पर्सल न्यायला यायचे.. ‘ए तात्या… म्येरा पार्सल द्येव ना जल्दि.. कितना मोटा है तू.. ‘ अश्या काहितरी कॉमेन्टस करत माझ्या गल्ल्याशी घुटमळत.. मी त्रासाने हाकलून द्यायला लागलो की काडकन टाळी वाजवून ‘सौ किलो.. !’ असं मला मिश्किलपणे चिडवायचे! अक्षरश: नाना प्रकरची मंडळी यायची त्या झमझम बारमध्ये आणि केन्द्रस्थानी तात्या अभ्यंकर!
गणपतीचे दिवस होते.. रस्ता क्रॉस केल्यावर आमच्या बारच्या समोरच्याच कामाठीपुर्यातल्या कोणत्याश्या (११ व्या की १२ व्या? गल्ली नंबर आता आठवत नाही.. ) गल्लीत हिजड्यांचाही गणपती बसायचा. हो, हिजड्यांचा गणपती! वाचकांपैकी बर्याच वाचकांना कदाचित ही गोष्ट माहीत नसेल. परंतु मुंबैच्या कामाठीपुर्यात अगदी हिजड्यांचाही गणपती बसतो.. साग्रसंगीत त्याची पूजा केली जाते.. कामाठीपुर्यात काही तेलुगू, मल्लू भाषा बोलणारे, तर काही उत्तरप्रदेशी हिजडे आहेत ते दरसाल गणपती बसवतात.. बरेचसे मुस्लिम हिजडेही त्यात आवर्जून सहभाग घेतात..
झमझम बारचा म्यॅनेजर म्हणून मला आणि आमच्या बारच्या सार्या नौकर मंडळींना त्या हिजड्यांचं सन्मानपूर्वक बोलावणं असायचं.. ‘तात्यासेठ, गनेशजीको बिठाया है.. ‘दरसन देखने आनेका.. खाना खाने आनेका.. ‘ असं आग्रहाचं बोलावणं असायचं.. ! अल्लाजान मला घेऊन जायचा त्या गणेशोत्सवात..
संध्याकाळचे सात वाजले असतील.. मी गल्ल्यावर होतो.. पूजाबत्ती करत होतो. तेवढ्यात अल्लाजान मला बोलवायला आला.. “गनेशके दरसन को चलनेका ना तात्यासेठ?”
मी दिवाबत्ती केली.. अर्जून वेटरला गल्ल्याकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि हिजड्यांच्या गणपतीच्या दर्शनाला अल्लाजानसोबत निघालो. कामाठीपुर्याच्या त्या गल्लीत गेलो.. खास दक्षिणेकडची वाटावी अशी गणेशमूर्ती होती.. नानाविध फुलं, मिठाई, फळफळावळ, थोडे भडक परंतु सुंदर डेकोरेशन केलेला हिजड्यांचा नानाविध अलंकारांनी नटलेला ‘अय्यप्पा-गणेश’ स्थानापन्न झाला होता.. एका म्हातार्या, स्थूल व टक्कल पडलेल्या हिजड्यानं माझं स्वागत केलं.. तो त्यांचा म्होरक्या होता. बसायला खुर्ची दिली.. झमझम बारचा म्यॅनेजर तात्याशेठ! म्हणून मोठ्या ऐटीत माझी उठबस त्या मंडळींनी केली.. अगदी अगत्याने, आपुलकीने.. !
हिजड्यांबद्दल काय काय समज असतात आपले? परंतु ती देखील तुमच्याआमच्यासारखी माणसंच असतात.. आपल्यासारख्याच भावभावना, आवडीनिवडी, रागलोभ असतात त्यांचे.. ते हिजडे कोण, कुठले, या चर्चेत मला शिरायचं नाही. ते धंदा करतात एवढं मला माहित्ये. चक्क शरीरविक्रयाचा धंदा.. पोटाची खळगी भरणे हा मुख्य उद्देश. आणि असतातच की त्यांच्याकडेही जाणारी आणि आपली वासना शांत करणारी गिहाईकं! कोण चूक, कोण बरोबर हे ठरवणारे आपण कोण?
मला सांगा – एखाद्या सिने कलाकाराने म्हणा, किंवा अन्य कुणा सेलिब्रिटीने म्हणा, दगडूशेठला किंवा लालबागच्या राजाला भेट दिल्यानंतर त्याचं होणारं आगतस्वागत आणि कामाठीपुर्यातल्या हिजड्यांच्या गणेशोत्सवाला तिथल्याच एका देशीदारूच्या बारच्या तात्या अभ्यंकराने भेट दिल्यावर हिजड्यांनी त्याच आपुलकीनं त्याचं केलेलं आगतस्वागत, यात डावंउजवं कसं ठरवायचं?
लौकरच एक अतिशय स्वच्छ प्लेट आली माझ्या पुढ्यात. वेफर्स, उतम मिठाई, केळी, चिकू, सफरचंद इत्यादी फळांच्या कापलेल्या फोडी, दोनचार उत्तम मावा-बर्फी, काजुकतलीचे तुकडे.. !
तो म्हातारा हिजडा मोठ्या आपुलकीनं आणि प्रेमानं मला म्हणाला..
“मालिक, थोडा नाष्टा करो.. “
“बादमे तुम्हे हमारा गणेशका पूजा करना है. और बादमे खाना भी खानेका.. !”
बापरे.. ! ‘मला यांच्या गणपतीची पुजा करायच्ये?’ मला काही खुलासा होईना.. ‘बघू नंतर काय होईल ते होईल, आपण आपली पुढ्यातली ही डिश खाऊन काहितरी कारण सांगून सटकू इकडनं.. ‘ अस ठरवून मी समोरच्या बर्फीचा एक तुकडा तोंडात टाकला.. सुरेखच होती बर्फी.. अगदी ताजी!
समोरच्या डिशमधलं थोडंफार खाल्लं मी. जरा वेळ तसाच तिथे बसून राहिलो. ‘आता दर्शन घ्यायचं आणि निघायचं’ असा मनाशी विचार केला आणि उठलो.. तोच तो मगासचा टकल्या हिजडा आणि इतर दोघेचौघे हिजडे पुढे सरसावले. त्यापैकी एकाच्या हातात मोठासा स्वच्छ नॅपकीन!
“आओ तात्यासेठ, अब न्हानेका और पूजा करनेका.. !”
न्हानेका और पूजा करनेका? मला काहीच समजेना. अल्लाजान होताच माझ्यासोबत. तो त्यांच्यातलाच.. त्याच्याशी बोलताना मला कळलं की आज मी त्यांचा पेश्शल पाहुणा आहे आणि मला पूजा करायच्ये किंवा सांगायच्ये!
ही कुठली पद्धत? कुणाला विचारून? मला क्षणभर काय करावं ते कळेचना! ‘सगळं झुगारून निघून जावं का इथून?’ हा विचार माझ्या मनात सारखा येत होता. पण माझ्या आजुबाजूला जमलेल्या, माझी इज्जत करणार्या त्या हिजड्यांच्या चेहर्यावर मला खूप आनंद दिसत होता, उत्साह दिसत होता..
‘देखे क्या होता है.. जो भी होगा, देख लेंगे.. ‘ या माझ्या नेहमीच्या स्वभावानुसार मी ती मंडळी म्हणतील ते करायचं ठरवलं. अधिक माहिती विचारता अल्लाजानकडून मला असं समजलं की मी एक पांढरपेशा उच्चभ्रू आहे असा त्यांचा समज आहे आणि माझ्या हातून आज त्यांच्या गणपतीची पूजा व्हावी अशी त्या मंडळातल्या हिजड्यांची इच्छा आहे आणि तशी पद्धतही आहे.. !
साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू?!
— क्रमशः भाग पहिला
लेखक : श्री तात्या अभ्यंकर
प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈