श्री जगदीश काबरे
☆ “दृष्टिकोन बदला, विचार बदलेल – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆
खूप खूप वर्षांपूर्वी वाचलेली गोष्ट. एका छोट्याशा गावात आकाशवाणी होते, “ज्यांना स्वर्गप्राप्ती हवी असेल त्यांनी संध्याकाळी गावाच्या वेशीवर जमावे. ” संध्याकाळी जवळजवळ सारा गाव वेशीवर जमा होते. काळोख पडण्याच्या सुमारास पुन्हा आकाशवाणी होते, “आता सर्वांनी आपापल्या डोळ्यांवर पट्ट्या बांधाव्यात आणि जंगलाच्या दिशेनं वाटचाल सुरू करावी. ”
त्याप्रमाणे डोळ्यांवर पट्ट्या बांधून गावकरी चालू लागतात. पडत, ठेचकाळत, तोंडाने शिव्याशाप उच्चारत काही तास वाटचाल केल्यावर पुन्हा आकाशवाणी होते, “तुमच्यापैकी तिघांनी माझी आज्ञा पाळली नाही. त्यांनी डोळ्यांवर पट्टी का बांधली नाही ह्याची कारणे सांगावीत!”
“मी व्यवसायाने वैद्य आहे”, पहिला इसम बोलला, “ह्या जंगलात बर्याच औषधी वेलीवनस्पती आहेत. मी त्यांचे वर्णन आणि उपयोग लिहून ठेवत आहे. तो कागद इथेच सोडणार. पुढेमागे ह्या वाटेनं जाणाऱ्या कुणाला तरी तो सापडेल आणि समाजासाठी उपयोग करेल!”
“मी चालू लागल्यावर लगेचच ठेचकाळून पडलो. ” दुसरा इसम बोलला, “मनात विचार आला की, असे बरेचजण पडत असतील म्हणून मी पट्टी काढून टाकली आणि पडणार्यांना आधार देऊ लागलो!”
“मी पट्टी बांधलीच नाही, ” तिसरा इसम म्हणाला, “कुणीतरी सांगतो म्हणून तसं वागायचं माझ्या स्वभावात नाही. माझा मार्ग मी निवडतो. मग खड्ड्यात पडलो तर मी मलाच दोष देईन. मजल गाठली तर ते यश माझेच असेल!”
“तुम्हा तिघांनाही आपापला स्वर्ग सापडला आहे”, पुन्हा आकाशवाणी झाली, “तुम्ही इथून परत फिरलात किंवा असेच पुढे चालत राहिलात तरी चालेल. इतरांनी मात्र आपली वाटचाल चालू ठेवावी!”
थोडक्यात काय तर, प्रत्येक माणसाचा स्वर्ग हा पृथ्वीवरच आहे आणि ह्या पृथ्वीचा स्वर्ग करायचा की नरक हे त्या माणसाच्या हातातच आहे.
उदाहरणार्थ, नदीला देवी म्हणून पुजत असतानाच नदीचे गटार करण्याचा नीचपणा आपल्याला सोडावा लागेल. स्त्रीची देवी म्हणून आरती करताना स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे, असे समजणे सोडून द्यावे लागेल. चातुर्वर्ण्य व्यवस्थेतून आलेलीच श्रेष्ठ-कनिष्ठतेची वृत्ती सोडून द्यावी लागेल. प्रत्येक माणसाशी माणसासारखा माणुसकीने व्यवहार करावा लागेल. स्वतःच्या जबाबदारीवर जगायला शिकावे लागेल. मगच दृष्टिकोन बदलला तर विचार बदलेल आणि विचार बदलले तर पृथ्वीचा स्वर्ग होईल.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈