सौ. प्रतिभा कुळकर्णी
☆ “Minimalism…” — ☆ सौ. प्रतिभा कुळकर्णी ☆
आज सकाळीच महिन्याचे वाणसामान आले होते. त्यातील बरेचसे खराब होईल म्हणून फ्रीज मध्ये ठेवण्यासारखे होते. त्यासाठी मी चक्क बैठक मारून फ्रीज च्या पुढेच बसून विचार करत होते. इतक्यात माझ्या एका जवळच्या मैत्रीणीची मुलगी नीता खास आम्हाला भेटायला आली. ही स्वतः इंजिनिअर आणि उच्चपदस्थ असून ही अतिशय टापटीपीने संसार करणारी आणि सासू सासऱ्यांची लाडकी सून.
माझा एकंदरीत अवतार बघून म्हणाली, ” मावशी काय ग हा पसारा मांडून बसली आहेस? “
मी तिला माझी व्यथा ( हो व्यथा च तर काय…) सांगितल्यावर म्हणाली,
” रागावू नकोस मावशी, पण म्हणूनच आम्ही हल्ली minimalism lifestyle अंगिकारली आहे. म्हणजे काय तर, कंजूष पणा नाही . पण शक्यतो जेवढे लागेल तेव्हढेच आणायचे. आधी प्लॅनिंग केले की छान जमते. अवास्तव पसारा वाढवायचाच नाही. तू पण पुढल्या महिन्यापासून काकांना तशी लिस्टच काढून दे.” मला ही हे पटले. काका तर काय (मिशीतल्या मिशीत) हसतच होते.
गप्पा मारता मारता तिने येताना आमच्यासाठी आणलेला इडली सांबारचा नाश्ता केला. दुपारच्या जेवणासाठी ही मस्त रस्सा भाजी घेऊन आली होती. त्यामुळे मस्त मनसोक्त गप्पा मारल्या आणि आमची बॅटरी चार्ज करून गेली सुद्धा……
जाताना मला मात्र food for thought देऊन गेली.
ती गेल्यावर मी माझ्याच दोघांनी सुरु केलेल्या आणि आता पुन्हा दोघांवरच येऊन ठेपलेल्या संसाराकडे त्रयस्थपणे नजर टाकली. एक सर्कल पूर्ण झाले होते….
अक्षरशः दोन बॅग्ससह सुरु केलेल्या संसाराचा केवढा हा पसारा….आता खरच आवरायला हवा.
Minimalism स्वीकारायलाच हवे….
आणि मग डोळ्यासमोर आली एक एक घरातील वस्तू….
कपड्यांनी खचाखच भरलेली कपाटं, पुस्तकांनी भरलेले शेल्फ, हौस हौस म्हणून घेतलेले तर्हेतर्हेचे क्राॅकरी सेट्स, भांडीकुंडी हे सारेच आता कमी करायलाच हवे….
अनावश्यक वस्तूंचे Minimalism….
मग मनाशी विचार आला, वस्तूच काय….आपण स्वतःकडून आणि इतरांकडूनही किती अपेक्षा ठेवतो.
मी ह्यावेळेस असे वागलेच पाहिजे, हे केलेच पाहिजे……
मुलांनी, नातेवाईकांनी माझ्याशी असे वागावे, असे वागू नये….
नुसत्या अपेक्षाच नव्हे तर तसे घडले नाही तर मनस्ताप ही होतो. मग डिप्रेशन, बिपी ,शुगर मध्ये वाढ…
कशासाठी हे सारे???
त्यांच्याही काही अडचणी असतीलच की ….म्हणूनच आताची मुलं म्हणतात तशी प्रत्येकालाच त्याची space देऊया.
आपली मुलं, आपल्या मित्र मैत्रीणी ,जीवाभावाचे नातेवाईक ह्यांच्यावर आता निरपेक्ष प्रेम करण्याची वेळ आली आहे.
हेच तर अवास्तव अपेक्षांचे Minimalism….
हे दुष्टचक्र एवढ्यावरच थांबत नाही. मग सुरू होतात राग/ रुसवे…….
मीच का साॅरी म्हणू ? गरज तिला/त्याला ही आहे…अशा नको त्या मानापमानाच्या कसरती!
ह्यातून निष्पन्न होतो तो फक्त नात्यात दुरावा…
ह्या सगळ्यावर उपाय एकच राग / रुसव्या चे Minimalism!
आपल्या ह्या संसारातून परमेश्वरही सुटला नाही आहे बरं का….
कोणतेही व्रत, नामस्मरण करताना आपण ते निरपेक्षपणे किती करतो हा प्रश्न स्वतःलाच विचारायला हवा. काहीही मागितले नाही तरी फक्त, ” आम्हा सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी असू दे” एवढे तरी मागणे असतेच.( खरंतर लांबलचक लिस्टच असते…)
आता येणाऱ्या नवीन वर्षात मात्र शांतपणे परमेश्वराचे मनापासून नामस्मरण करुया आणि खरच minimalism lifestyle जगण्याचा प्रयत्न करुया.
अवघड आहे (कारण अनेक गोष्टीत आपली भावनिक गुंतवणूक असते…) पण अशक्य नक्कीच नाही.
© सौ. प्रतिभा कुळकर्णी
संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈