सुश्री नीता कुलकर्णी
☆ “शिक्षण…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
शिक्षण किती झालंय तुमचं?
‘ मी डॉक्टर, मी इंजिनीयर, मी वकील,मी शिक्षक, मी एम.बी.ए.,मी शेतकरी, मी ऑफीसर,मी दुकानदार, मी एम. ए. पीएच डी डॉक्टरेट मिळवली – – ‘
‘वा वा अभिनंदन अभिनंदन.. अरे वा म्हणजे बरचं शिक्षण झालय तुमचं. व्यवसाय चांगला करताय आता इतकं शिकलात तर तुम्ही हुशारच असणार म्हणा .. मग एक विचारू का?
— मी एक छोटी परीक्षा घेते .. काही वाक्य विचारते .. ती म्हणायला शिकलात का? पण खरी उत्तरं सांगा हं …..
बायकोला कधी हे म्हणालात का?–
” तू संसार चांगला केलास, घर नीट ठेवतेस, तुझी रांगोळी रेखीव असते, स्वयंपाकात सुगरण आहेस, सगळ्यांची सेवा करतेस, घर आणि नोकरी ही तारेवरची कसरत केलीस, नाती जपलीस “
….. तशी ही यादी मोठी आहे. तूर्तास या साध्या सोप्या प्रश्नांची तर उत्तरं द्या ‘
‘ अरेच्चा एकदम गप्प का झालात ? आत्ता आठवत नाहीये का..? वाटलं तर विचार करून थोडा वेळ घेऊन उत्तरं द्या ….
काय म्हणताय ….. ‘ हे तेवढं राहिलं….’…… असं कसं बरं झालं…? हेच नेमकं शिकायच राहिलं ?
का हा विषयच ऑप्शनला टाकला होता का.. याचा अभ्यास केला नाही….. बरं .बरं..असू दे असू दे.
होत अस बऱ्याच जणांचं … ‘
मग आता करा की हा कोर्स …. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरही हे शिकता येतं … वयाची तर काहीच अट नाही
ऑनलाइन.. करस्पॉन्डन्स.. सिलॅबस…. ते तुमचं तुम्ही ठरवायचं किती दिवसांचा आहे … कधी पूर्ण होईल … परीक्षा कधी आहे ???
…. सांगते सांगते… सगळं नीट सांगते
… तुम्ही कसा अभ्यास कराल त्याच्यावर हे अवलंबून आहे … परीक्षेची वेळ तुमची तुमची …
रिझल्ट ताबडतोब समोर प्रत्यक्ष दिसेल …
आणि फी….सांगते ना…..
एकदम किती प्रश्न विचारता?
आणि हो … हा प्राथमिक कोर्स झाला …. असे बरेच आहेत …
हळूहळू त्याची पण माहिती देईन .. सध्या तरी इतकं पुरे
विचार कसला करताय…. हुशार आहात जमेल तुम्हाला … घ्या की अॅडमिशन
आधीच उशीर झालाय राव … करा अभ्यासाला सुरुवात …
…. अरे एक सांगायच राहिलं .. याची गाईड बाजारात नाहीत .. हा विषय स्वयंशिक्षणाचा आहे
हवी असेल तर मी मदत करीन. मला फी पण नको .. मग लागा तयारीला .. प्रॅक्टीस केली की जमेल
आणि हो … रिझल्ट लागला की या पेढे घेऊन ..वाट बघते……ऑल द बेस्ट !! ‘
…….
साने काका घरी आले होते .. काकांनी हे वाचलं आणि हळुवार आवाजात म्हणाले
‘ मी त्या कोर्सला अॅडमिशन घ्यायच्या आधीच नापास झालो आहे ..
ही वर गेली .. आता हे सांगायच राहून गेलं. मला कधी सुचलंच नाही बघ .. नेहमी गृहीत धरलं तिला सगळ्या बायका हेच तर करतात त्यात काय विशेष .. त्याचं काय कौतुक करायचं असं मला वाटायचं ती असेपर्यंत कधी त्याची किंमत कळली नाही तुला एक सांगू .. तू त्या कोर्समध्ये अजून एक विषय ॲड कर …
… आयुष्यात कधीतरी ” माझं तुझ्यावर प्रेम आहे ” .. हे बायकोला एकदा तरी सांगा असं लिही ….
ती गेली आणि मग मला समजलं माझं तिच्यावर प्रेम होतं…”
हे बोलता बोलता त्यांचा आवाज विलक्षण कापरा झाला होता..
” काका खरं तर आम्हा बायकांना ते न सांगताच माहीत असतं जाणवतही असतं….
आतल्या आत…”
“असेल …कदाचित तसही असेल…”
“तरीपण बोलुन दाखवल तर आनंद होईल की नाही ?..”
“हो हे तुझं अगदी पटलं मला ”
“आजारपणात तुम्ही काकूंची काळजी घेत होता … तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या …’ यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर.. कसं होईल ग यांच माझ्या नंतर…’.
” हो खरंच असं म्हणाली होती ती?…”
” हो काका…..”
……. काकांचे डोळे भरून वहात होते……
पंच्याऐशींच्या सानेकाकांना समाधान व्हावे यासाठी खोटं बोललं तरी देव मला माफ करणार आहे……
हे मला पक्कं माहित आहे…
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈