सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१४ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
बखळ, आळी, आणि बागा —
‘बोळ ‘ बंधूंचा आप्तस्वकीयांचा पसारा मोठा होता, बोळांना बऱ्याच बहिणी होत्या त्यावेळी बोळ पुढे बंद होत असेल, तर तो बोळ नसून त्याला ‘बखळ’ म्हणायचे. अहिल्यादेवीकडून शनिवारवाड्याकडे आम्ही जायचो ती होती हसबनीस बखळ. टिळक रोड जवळ स्काऊट समोरची म्हणजे (सध्याचं उद्यान प्रसाद कार्यालय) 1957 पूर्वी तिथे इचलकरंजीकरांची बखळ होती. पुण्यातले बोळ प्रसिद्ध होते तशा ‘आळ्या’ही अनेक होत्या. लोणीविके दामले आळी, गाय आळी, शुक्रवारांतील शिंदे आळी, त्याच रस्त्याने थोडं पुढे गेलात ना! की मग तुम्हाला लागेल खडक माळ आळी. गणपतीच्या दिवसात पायांचे तुकडे पडेपर्यंत पहाटे चार वाजेस्तोवर गणपती पहायला प्रत्येक बोळ् आणि अगदी आळीतले सुद्धा गणपती बघायला आम्ही भटकत होतो. या खडक माळ आळीचा भव्य दिव्य गणपती बघताना डोळे विस्फारायचे. कसब्यातील तांबट आळी अगदी डोकं उठवायची. कारण तांब्याची मोठमोठी सतेली, पातेली, टोप, बंब, अशी ठोक्याची भांडी, ते बनवणारे कारागीर कानात बोळे न घालता ठोक ठोक करून ठोकायची. बुधवारातील दाणे आळी, आणि हो विशेष म्हणजे तिथे एकही शेंगदाणा मिळायचा नाही, चोरखण आळीत चोर राहतात का?असा भाबडा प्रश्न विचारल्यावर आम्हाला टप्पल मारून ‘वेडपटच आहेस ‘असा शिक्का मिळून, अग चोर नाही. चोळखण आळी म्हणायचे त्या आळीला. तिथले धारवाडी खण प्रसिद्ध आहेत. तिथेच पुढे विजयानंद टॉकीजची गवळी आळी होती. तिथे एकही गाय गोठा किंवा डेअरी नव्हती. बहुतेक सगळ्या गाई गाय आळीत गेल्या असाव्यात. पूर्व भागांत होती बोहरी आळी, तिथे मात्र बोहारणींचा तांडा जुन्या कपड्यांच्या ढीगात फतकल मारून बसलेला असायचा. नुसता कलकलाट चालायचा जसा काही मासळी बाजारच भरलाय.
तर मंडळी अशी होती ही, काळा आड लुप्त झालेल्या बोळ ‘आळ्या’ बागा आणि बखळींची ची कथा.
– क्रमशः…
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈