सुश्री प्रभा हर्षे

??

☆ कॅटॅलिस्ट— – लेखिका – सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे 

” हल्ली वयाची तीस-पस्तीस वर्षं उलटून गेली तरी मुलांची किंवा मुलींची लग्नच ठरत नाहीत “….. हा विषय सध्या ऐरणीवर आहे.. यावर पॉडकास्टमधे, अनेक निरनिराळ्या माध्यमांवर, पालकांमधे चर्चासत्रं घडतायत…

अशातच परवा माझ्या तेहतीस वर्षांच्या एका लग्नाळु भाच्याने ” ही मुलगी फारच बारीक आहे ” असं कारण देऊन विवाहसंस्थेतून आलेली एक मुलगी माझ्यापुढेच नाकारली. त्या मुलीत असलेल्या चार चांगल्या गोष्टी आमच्या भाच्याच्या दृष्टीने नगण्य होत्या…

यात मला फारसं आश्चर्य वाटलं नाही… तो नाही…. त्याचं तारुण्य ते बोलत होतं..

पण ” बरं, तुला फार बारीक वाटतेय न ही मुलगी मग राहूदे… ऐपवर इतर अनेक मुली आहेत… त्या बघ… ” असं म्हणत माझ्या मैत्रिणीने म्हणजे त्याच्या माऊलीने जेंव्हा ” त्या मुलीचा विषय ” पाच मिनिटांत निकालात काढला… तेंव्हा मात्र या पोराचे चाळीशीपर्यंत काही दोनाचे चार हात होत नाहीत, याची खात्री पटली….

रिक्षातून घरी परतताना माझ्या समस्त आई, आज्या, मावश्या, काकवा, आत्या, माम्या यांनी माझ्या डोक्यात फेर धरला… आम्ही सख्खी, चुलत, मामे, आते, मावस भावंडे लाडाकोडात वाढत केंव्हा मोठी झालो ते कळलचं नाही… शिक्षणं पार पडली … मुलगे नोकरी धंद्याला लागले.. साहजिकच उपवर झाले..

मुली मोठ्या दिसू लागणं.. फारतर पदवीधर होणं… एवढंच क्वालिफिकेशन त्याकाळात मुलींच्या लग्नासाठी पुरेसं असायचं.. “करीअर ” हा शब्द मुलांसाठीही जिथं फारसा महत्त्वाचा नसायचा तिथं मुलींची काय बात ?

मुलानं नोकरीधंदा करावा.. स्वयंपाकपाणी थोडक्यात गृहकृत्ये येणा-या मुलीशी लग्न करावं..

मुलीला वडिलांच्या संपत्तीत हक्क नाही तर तिच्या वडिलांनी किमान दोन-चार तोळे सोनं मुलीच्या अंगावर घालून दोन्ही अंगानं लग्न करून द्यावं… लग्नात मानपानावरून रुसणं हा वरपक्षाचा हक्क..

लग्नानंतर वर्षाच्या आत हललेला पाळणा.. ही लग्नाची यशस्वीता..

…. संसारवेलीवर एक मुलगा नि एक मुलगी फुलणं.. ही संसाराच्या स्पर्धेतील सुवर्णपदक प्राप्ती…

नव-याने इमाने-इतबारे केलेला नोकरीधंदा, बायकोने टुकीने केलेला संसार-आदरातिथ्य, मुलांचं संगोपन… आईवडिलांच्या वृद्धापकाळात केलेली त्यांची सेवा, यथासांग पार पाडलेले त्यांचे दिवसकार्य…

चांगली निघालेली सुसंस्कृत मुले नि त्यांची वेळेवर झालेली लग्नकार्ये..

आणि…. मुलांनी साजरी केलेली आईची साठी नि वडिलांची पंचाहत्तरी…

एवढ्या माफक अपेक्षा असलेलं जीवन…

कधीतरी हॉटेलातला डोसा.. बांधलेलं एखादं टुमदार घर… बायकोला अस्सल सोन्याचा केलेला छोटासा दागिना…. एखादा दूरचा नाहीतर अगदी क्वचित परदेश प्रवास … हा एखाद्यालाच नशीबाकडून मिळालेला बोनस…

अशा परिस्थितीत जीवनाच्या साथीदाराकडून लग्नासाठीच्या कितीशा अपेक्षा असणार ?

तरीही पसंती -नापसंती असायचीच…

माझ्या आतेभावाला एखादी मुलगी सांगून आलेली असायची… बघण्याचा कार्यक्रम पार पडलेला असायचा.. घरातील समस्त मंडळी गोल बसलेली.. अर्थातच ” मुलगी ” हाच चर्चेचा विषय..

गोरटेली एकशिवडी ती मुलगी सगळ्या महिलावर्गाच्या मनात भरलेली..

” मला नको ही… फारच बारीक आहे.. ” आतेभावाचं डायरेक्ट रिजेक्शन…

” अरे पद्या… नलूमामीकडं बघं.. लग्नात या मुलीच्या निम्मी होती.. उसाचं चिपाड बरं.. आता बघ कशी झालीय… गादीची वळकटी बरी…

(इथं बायांच्या चेह-यावर पदराआड दडलेलं मिश्किल हसू )

“अरे प्रदीपबाळा, पहिल्या बाळंतपणानंतर बायका नको म्हणण्याइतक्या भरतात…

म्हणून सुरुवातीला बारीकच ब-या.. !!” 

– – प्रदीपभाऊंना हा सुशीलामामीचा युक्तीवाद पटायचा नि दिवाळीनंतरच्या पहिल्या मुहुर्तावर ते बोहल्यावर चढायचे..

” फार जाड आहे गं ही मुलगी, नाही म्हणून कळवून टाका.. ” वैतागलेल्या पुतण्याला हीच सुशीलाकाकू सांगायची,

” अरे जयंता… काय करायची बारीक मुलगी घेऊन… सासरची माणसे खायला घालतात की नाही, असे लोक विचारणार… शिवाय अशा बारीक पोरींना सारखी आजारपणे…. त्यापेक्षा ही खाल्ले -प्यालेले अंगावर दिसणारी मुलगी बरी रे.. अशा पोरी कामाला वाघ असतात.. आणि दोन पोरं झाली की हे बाळसं जातं रे… !!

…… जयंता केंव्हा त्या बाळसेदार मुलीला पसंती देऊन बसायचा, ते त्याचं त्यालाच कळायचं नाही..

” या टकलू मुलाशी मी आजिबात लग्न करणार नाही ” म्हणून हटून बसलेल्या माझ्या मावसबहिणीच्या तोंडावर

” खल्वाटो निर्धनो क्वचित् ” म्हणजे टकलू माणूस कधीच निर्धन नसतो.. ( नेहमी श्रीमंत असतो ) असं संस्कृत सुभाषित फेकून तिला ” मी याच्याशीच लग्न करणार ” असं म्हणायला माझ्या आईनं. भाग पाडलं होतं…

पुण्यातील मामेबहीण जेंव्हा मिरजेसारख्या लहान गावातील मुलाला केवळ गाव लहान म्हणून नाकारू लागली तेंव्हा…

.. पुणं, पुण्यातील महागाई, तिथली माणसं, लांब-लाब अंतरं, लहान घरं… यापुढे मिरज हे कसं चांगलं आहे आणि मुख्य म्हणजे तिच्या कफ प्रवृत्तीला मिरजेतच राहणं कसं श्रेयस्कर आहे… हे माझ्या शोभामावशीनं एखाद्या निष्णात वकिलाला लाजवेल, अशा युक्तीवादानं पटवून दिलं होतं.. अन् खरच सविताताई लग्न करून जी मिरजेत आली… तिने मिरज कधीच सोडलं नाही…

“कुटुंबाची आर्थिक स्थिती गरिबीची.. स्वत:चं घरही नाही”… म्हणून अतिशय हुशार, उच्चशिक्षित नि कष्टाळु अजितरावांना नाकारणा-या अपर्णाताईला आमच्या आजीने असं काही फैलावर घेतलं…

“तुला देवानं हातपाय दिलेत, आईवडिलांनी शिक्षण दिलं.. ते कशासाठी ?आयतं बसून खाण्यासाठी ?

नव-याबरोबर कष्ट कर… त्याला साथ दे… अगं दोघे मिळून एकच काय चार घरं बांधाल… “

…. अपर्णाताईच्या डोळ्यात तेंव्हा पाणी आलं.. पण तिला आजीचं कुठेतरी पटलं.. तिने अजितरावांना होकार दिला…. नुसताच होकार नाही तर कष्टाचीही साथ दिली…. अजितराव-अपर्णाताईचे चार कारखाने, महालासारखा बंगला.. त्यांचं दृष्ट लागण्यासारखं वैभव पहायला दुर्दैवानं आजी या जगात नव्हती…. पण अपर्णाताईने तिच्या प्रत्येक वास्तुत आजीचा फोटो मात्रं आठवणीने लावलाय… !!

ही वानगीखातर दिलेली काही उदाहरणे…

आम्हा भावंडांपैकी प्रत्येकाच्या लग्नात आमचे आई, बाबा, आजी-आजोबा, मावशी, काका-काकू, आत्या, मामा-मामी, वडील भाऊ-बहिणी..

यांनी कधी आंजारून -गोंजारून, कधी रागावून, कधी क्वचित खरं-खोटं बोलूनही लग्नाला तयार केलं..

अर्थात यामागे त्यांनी पाहिलेल्या अनेक उन्हाळ्या-पावसाळ्यांचा अनुभव होता.. आपल्या पोरांचं भलं व्हावं.. सारं काही वेळच्या वेळी व्हावं… आयुष्याच्या सप्तरंगांचं त्यांना दर्शन व्हावं.. ही सदिच्छा होती…

अन् त्यासाठी वाईटपणा घेण्याचीही तयारी होती…

कारण त्यांनी आम्हा मुलांना आपलं मानलं होतं..

परवा मला एक बाई भेटल्या.. ज्ञानवृद्ध नि वयोवृद्ध…

” मी नं कुणाचं लग्न ठरवण्याच्या भानगडीत पडत नाही.. अगदी जवळच्या नात्यातही नाही… काही झालं तर उगीच वाईटपणा कोण घेणार ?”

मी दचकले..

… हे बोल या काळाचं प्रतीक तर नव्हेत ? कुणीच कुणाच्या अध्यात मध्यात शिरायचं नाही…

अगदी आई-वडिलांनी सुद्धा… ?

मुलं शिकलेली असतात, वयानं मोठी असतात… त्यांची मतं ठाम असतात..

त्यानी स्वत:च्या आयुष्याची आखणी केलेली असते…

विवाहसंस्था असतात.. मुलं नाव नोंदवू शकतात.. एकमेकांना भेटू शकतात… पटलं तर लग्नही ठरवू शकतात… आई-वडिलांची, नातेवाईकांची यासाठी काहीच गरज नसते..

पण मग वय वाढलं तरी लग्नं का ठरत नाहीत?

ठरली तरी होतीलच असं नाही…

झालं तरी टिकतीलच असंही नाही..

लग्न ठरायचा दर खूप कमी झालाय

 नि

लग्न मोडायचा दर खूप वाढलाय..

– – कारण लग्न ही एक अभिक्रिया आहे… रिएक्शन आहे.. अन् अभिक्रियेसाठी -रिएक्शनसाठी उत्प्रेरक म्हणजे कॅटॅलिस्ट असला तर ती अभिक्रिया होते… वेगाने होते… अन् वेगाने होते म्हणून कंटाळवाणी होत नाही…

काही अभिक्रिया तर कॅटॅलिस्टशिवाय होतच नाहीत… लग्नाच्या या अभिक्रियेत आपले गणगोत हे कॅटॅलिस्ट असतात -असले पाहिजेत..

…. पण दुर्दैवाने कॅटॅलिस्टना अभिक्रियेत भागच घ्यायचा नाहीये नि रिएक्टंटना कॅटॅलिस्टची गरजच वाटत नाहीये…. म्हणूनच अभिक्रियेचा लोचा होतोय…. चूक समजून सांगणारी मायेची माणसंच नाहीयेत…. आणि असली तरी मुलांना त्यांचं ऐकायचं नाहीये..

आम्हाला पटवून, आमची समजूत काढून, प्रसंगी रागावून आम्हाला या आमच्या माणसांनी बोहल्यावर उभं केलं… म्हणून आमचं सारंच आलबेल होतं का?.. नक्कीच नाही..

रूळ बदलताना होणारा खडखडाट झालाच.. पण गाडीनं रूळ सोडू नये किंवा रुळावरून घसरू नये, यासाठी सासर-माहेरच्या वडीलधाऱ्यांनी कवचाचं काम केलं.. स्वत:ची जबाबदारी समजून..

कारण लग्न ठरवणं ही जशी त्यांनी आपली जबाबदारी मानली होती तशी ते टिकवण्याचा ठेकाही त्यांनी मायेने घेतला होता.. नि तो आम्हालाही मान्य होता..

ना प्रदीपदादाची बायको कधी जाड झाली…. ना जयंतदादाची कधी बारीक झाली…

सुरुवातीला दोघांना थोडी लाज वाटायची.. रागही यायचा…

पण नंतर एकमेकांना एकमेकांचा सहवासाने असा काही लळा लागला की एकमेकांवाचून रहाणं अशक्य झालं… जाडी, बारीकपणा, टक्कल, गाव, आर्थिक स्थिती… सारं बाजूला पडलं… नि….

तुझं मन माझं झालं 

माझं मन तुझं झालं 

आता सगळेच साठी -सत्तरीला आलेत..

कुणाची साठी साजरी होते.. कुणाची पंचाहत्तरी..

कुणाचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस..

त्या मंगलप्रसंगी फार वर्षापूर्वी लग्नासाठी कॅटॅलिस्ट झालेली नव्वदीतली काकू बोळक्या तोंडाने म्हणते,

” हा गधड्या तेंव्हा हिच्याशी लग्न करायला तयार नव्हता.. आणि आता बघा कसा बायकोशेजारी हसत बसलाय “

… तेंव्हा आयुष्यात लाभलेल्या सुखाची नकळत उजळणी होते, डोळे भरतात नि तोंडात आपोआप शब्द येतात – – ” थॅंक यू !! “

लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले

प्रस्तुती –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments