सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

देवळांचे आणि विद्येचे माहेरघर असलेले पुणे..

पुणे नांवातच पुण्यभूमी आहे आणि पुण्याचा वेगळा असा स्वतंत्र इतिहासही आहे. कारण या शहराच्या अंगा खाद्यावर ऐतिहासीक खुणा आहेत. त्या काळात पुणे म्हणजे पेन्शनरांच शहर म्हणून ओळखल जायच. ‘ संध्या छाया भिवविती हृदया ‘ त्याला कारण एकटेपणा, पण अहो!अशी आजची पण तीच परिस्थिती आहे, पण वेळ कसा? कुठे? कुणाबरोबर? घालवायचा हा राक्षसासारखा भेसूर पणे ‘आ ‘ वासलेला प्रश्न, तेव्हां इतका बिकट नव्हता, कारण जिवाभावाच्या मित्रांबरोबर सुखदुःखाच्या गोष्टी सदाशिव पेठेच्या कट्ट्यावर आणि देवळांच्या पायरीवर बसून शेअर व्हायच्या. विद्येच माहेरघर म्हणून ओळखल जाणार हे शहर देवदेवतांच्या देवळानी भरगच्च भरलेल होत. कथा कीर्तन, काकड आरती, भजन यात माणसं एकरूप व्हायची. त्यामुळे गुंडगिरी खून दरोडे अशा कुविचारांचा ‘खच ‘कमी होता. शक्यतोवर सातच्याआत पोरी घरी पळायच्या. मवाली मुलांच्या मनांत शिवाजी महाराजांचा ‘परस्त्री मातेसमान’ हा बाणा ठसलेला होता.

नाना वाड्यावरून, हुतात्मा चौकातून पुढे गेल्यावर एक पुरातन मंदिर दुकानांच्या गर्दीत लपलय. गर्द केशरी कोरीव नक्षीकाम केलेल्या दरवाजामुळे आपली नजर तिथे स्थिरावते. आत पाऊल टाकल्याबरोबर समोर मारुतीच्या शेंदूरचर्चित मूर्तीचं दर्शन होत. शेंदुराच्या असंख्य पुटांमुळे मूळ मूर्तीचा अंदाज येत नाही. पुण्यातील चित्रविचित्र नांवात या मारुतीची गणना होते. कारण पूर्वी ह्या परिसरात ‘भांग’ विकली जायची म्हणून या मारुतीरायाच नामकरण झाल, ‘ भांग्या’ मारूती. पुण्यात ‘करळेवाडी, ‘ प्रसिद्ध होती खूप बिऱ्हाड होती तिथे, सोमणांच्या हॉटेलवरून ‘फिम्को शू’ दुकानावरून पुढे गेल की कमानदार दरवाज्याची ‘करळेवाडी’ लागायची. तिथून शिरल की एकदम दक्षिण मुखी मारुतीच्या पुढ्यातच आम्ही पोहोचायचो. आणखी पुढे गेल की यायचा शनिवार वाडा, अस वाटायचं मस्तानी महाल, पेशव्यांची बैठक, दिवाणखाना, पेशवीण बाईंचे दागिने, थाटाच्या वस्तू बघायला मिळतील पण कसल काय! आतला सगळाच नक्षा बदललेला होता. तिथून बाहेर पडल्यावर म्हणूनच मन खट्टू व्हायच. कारण पेशवाई थाटाचे काहीच अवशेष तिथे आढळले नाहीत. नारायण महालातून बाहेर पडतांना आम्ही कानांत बोटे घालायचो, असं वाटायचं नारायणाच्या किंकाळ्या ऐकू येतील की काय! हीच दहशत बालमनांत ठसली होती. वसंत टॉकीजला त्यावेळी नेहमी ऐतिहासिक पिक्चरच लागत असत. नारायणाच्या खुनाचा, सगळा इतिहास आठवत डोळे पुसतच आम्ही बाहेर पडायचो.

मग शनिवार वाड्याच्या बुरुजाला वळसा घालून यायच ते शनी मंदिरापाशी. शनीच्या मंदिरात सगळी कडे तेलच तेल होत, मूर्ती, भिंती, जमीन, कठडे हात लावीन तिथे तेलच तेल असायचं त्यावेळी’ हात लावीन तिथे सोनं ‘हा पिक्चर गाजला होता. आम्हाला मोठ्या माणसांनी बजावलं होतं की शनीचं दर्शन अगदी त्याच्या समोरून घेऊ नये, नाहीतर फटका बसतो. लहानपणी बालमनाला वाटायचं प्रत्यक्ष शनीच मूर्तीतून बाहेर येऊन फटका मारतो की काय! आता हंसू येतेय पोरकट वयातले विचारही पोरकटच असतात नाही का. आम्ही मैत्रिणी एकमेकींना ढकलत कोपऱ्यात सरकायचो जमिनीवर सांडलेल्या तेलामुळे घसरगुंडी झालेली असायची. माझी मैत्रीण सुनंदा सटकन घसरली. ‘घालीन लोटांगण वंदिन शनिदेवा तुझे चरण. ‘अशीस्थिती झाली तिची. आणि तिने डोळे पांढरे केले, दोघी तिला धरायला आणि दोघी शनी महाराजांच्या विनवण्या करायला धावल्या, शनीदेव पावले. आणि सुनंदा शुद्धीवर आली. पण नंतर मात्र ती शनीमंदिराला ‘ दुरून डोंगर साजरे’ असं म्हणून रस्त्यावरून नमस्कार करायला लागली. आता मंदिर खूप स्वच्छ झालंय. पण त्यावेळी मात्र ‘आवजाव मंदिर तुम्हारा, असं होत. सगळेच अगदी मूर्ती जवळ जाऊन शनीला तैलस्नान घालायचे. भक्तांची ही श्रद्धा पुजाऱ्यांना फार महागात पडायची. कारण तिथे बसून तेही तेल्या मारुती झालेले असायचे. त्यामुळे मंदिरात बसताना गणवेशासारखा त्यांचा ड्रेस ठरलेला असायचा. त्यांच्या तुंदीलतनु अवताराकडे बघून आम्हाला हंसू यायचं. पाय घसरून पडणाऱ्या लोकांकडे बघितल्यावर तोंडावर हात ठेऊन हंसू दाबाव लागायचं पोटात मात्र हंसण्याच्या उकळ्या फुटलेल्या असायच्या. ‘जपून टाक पाऊल गडे’ असे म्हणत आम्ही एकमेकींचा हात धरत पुढे सरकायचो. तर मित्र-मैत्रिणींनो अशी होती ही शनि मंदिरा तुझी कहाणी.  शनिमहाराज की जय.

– क्रमशः …  

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments