श्री अ. ल. देशपांडे
☆ ‘ज्वारी… लय भारी…’ ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆
सध्या भाकर ही पंचतारांकित झाली आहे. ती आता श्रीमंताची झाली आहे. हुरडा देखील असाच item झाला आहे वगैरे गुणगान करणारी एक क्लिप wapp वर आली होती. ती वाचून मी देखील व्यक्त झालो खालीलप्रमाणे…
ज्वारी लयभारी… तुम्हाला प्यारी तर आम्हाला सगी सोयरी… तरी सुखी असे माहेरी.
मटणाच्या रश्याबरोबरची तर मला ज्ञात नाही ( तुम्हालाही नसेलच ही खात्री ) पण रात्रीच्या जेवणासाठी तयार केलेल्या आणि रात्री बेरात्री अतिथी आलाच तर वेळेवर पिठलं करून वेळ साजरी व्हावी म्हणून आवेलाच्या मागे ताठ उभ्या असलेल्या भाकरी जर शिल्लक राहिल्या तर सकाळच्या लोणचं, कढवलेलं तेल व हाताने फोडलेल्या कांद्याबरोबरच्या चविष्ट न्याहरीची गोष्टच न्यारी.
उमरीच्या घरच्या गोदामाकडील अंगणात अखंड अग्निहोत्रासम धगधगणाऱ्या चूल-माऊलीच्या उदरात असलेल्या तप्त निखाऱ्यावर ज्वारीच्या पिठाच्या पानग्याला दोन्हीकडून पळसाची पाने लावून झोकून दिल्यावर तावून सुलाखून बाहेर आलेल्या पानग्याची चवच जगावेगळी.
शिळ्या भाकरी त्यावर तिळाची चटणी, तेल, आंब्याचं रायतं, दोन तीन कांदे स्वच्छ पालवात बांधून कुंभीपट्टीकडील झोरमळ्यावर ( नदीवर ) जाऊन त्या अन्नपूर्णा देवीच्या प्रसादावर ( भाकरीवर ) ताव मारण्याचा स्वर्गीय आनंद अपारच. जन्मांध असलेल्या आबईने केलेल्या चुलीवरील बेदाग, शुभ्र भाकरीचे देखणे पहात रहावेसे रूप अवर्णनीय.
रात्री नुकतीच सामसूम झालेली असायची. तसेच बारभाईचं ( धबडक्याचं) घर सोडलं तर इतरत्र उमरीला रात्री आठ म्हणजे निरव शांतता असायची. उकंडबाऱ्याच्या वाडीकडील गावकुसातून अनवाणी पायाने हळुवार चालत आलेली सखू शांतपणे फरसावरून आवाज द्यायची, ” भाकर हाय का मायजी ? “
तिचा हा अगतिक स्वर तिच्या घरातील त्यादिवशी उपाशी असणाऱ्या कुणासाठी तरी असायचा.
काकी किंवा माई सखूची हाक ऐकून चुलीच्या बाजूला उभ्या ठेवलेल्या भाकरीपैकी एक, दोन भाकरी कोरड्यासासोबत ( वरण, भाजी किंवा लोणचं) डेलजी ओलांडून फरसावर येऊन सखूने पसरलेल्या लुगड्याच्या पदरात हळुवार वाढून देत असत. याचक म्हणून आलेली सखू पण माऊली.. आणि तिची झोळी रिकामी न जाऊ देणारी पण माऊलीच. एकीकडे अगतिकता दुसरीकडे संपन्नतेचा अहंकार नाही.
अशी ही भाकर.
… अशीच एक संध्याकाळ संपून उगवलेली रात्र. सर्वांची जेवणं आटोपलेली. जेवणाची ओसरीला पोतेरं लागलेलं. दिवसभर कष्ट सोसलेली हाडं ( विशेषतः बायकांची ) सातरीवर पहुडण्याची वेळ झालेली.
दूरवरून कुत्र्यांचे भुंकणे कुंद असलेल्या शांततेचा भंग करणारे. अशात मारुतीच्या पाराजवळील शुभ्र दाढीधारी ‘ मलंग ‘ नावाचा फकीर पांडेबुवांच्या अंगणात, एका हातात लांब काठी, खांद्यावर झोळी दुसऱ्या हातात कंदील घेऊन उभा ठाकलेला. अंगणातील प्रचंड कडुलिंबाच्या पानांची सळसळ थांबलेली आणि
” हाज़ीर है तो दे दे मां ” असं आर्जव.
… परत पांडे बुवांच्या घरातील लक्ष्मीच्या कानावर पडलेले ते शब्द. चुलीवर ठेवलेली भाकर परत फकीराच्या झोळीत समाऊन गेलेली.
” तुमची जेवणं झालेली आहेत, काही शिल्लक असेल तरच द्या “, अशी अपेक्षा असलेला मलंग फकीर. त्यांच्या किंवा त्याच्या कुंटुंबीयांच्या पोटात जाणारी ही मोलाची भाकर.
… ईश्वरदत्त भूक. याचनेतही विनय. सहज भावनेने, निर्लेप मनाने दिलेली ही “भाकर”.
© श्री अ. ल. देशपांडे
अमरावती
मो. 92257 05884
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मनमंजूषेत सांभाळलेले खूप छान