श्री जगदीश काबरे
☆ “तुझे आहे तुजपाशी – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆
मोगो नावाचा एक चिनी मुलगा. तो बिचारा दगड फोडायचं काम करायचा. हाताला फोड यायचे. उन्हातान्हात दगड फोडून अंगाला घामाच्या धारा लागायच्या. लोकांना कसली भन्नाट कामं करायला मिळतात आणि आपल्याच नशिबी काय ही दगडफोडी, असं तो नेहमी मनात म्हणे आणि दुःखी होई.
एकदा त्याचं दुखणं एका देवदुतानं ऐकलं. त्याचे दयावून त्याने त्याला विचारलं की, “का तू इतका उदास?”
मोगो म्हणतो, “देवानं माझ्यावर अन्याय केलाय. हे असलं काम दिलंय मला. तू विचार देवाला की, का त्यानं असं केलं?”
देवदूत देवाकडं जातो विचारतो, “का या तरुणावर अन्यायकेला तुम्ही?”
देव म्हणतो, “ठीक आहे. आजपासून त्याला जे काम आवडेल ते त्याला मिळेल. “
त्याच दिवशी मोगो दगड फोडताना एक श्रीमंत माणूस पाहतो. तो असतो हिर्यांचा व्यापारी. मोगोला वाटतं, ‘असं नशीब पाहिजे होतं आपलं. ‘
देवदूत तथास्तू म्हणतो आणि मोगो एकदम बडा व्यापारी होतो. एका महालात हिरे-जवाहरात लोळू लागतो. पण नेमका त्या वर्षी उन्हाळा फार असतो. काही दिवसात तो कंटाळतो. त्याला वाटतं, ‘या पैशाला काही अर्थ नाही. आपण थेट सूर्याइतकं पॉवरफूल व्हायला हवं. ‘
त्याच क्षणी त्याचं सूर्यात रूपांतर होतं… सर्वोच्च स्थान! सारं जग त्याच्याभोवती फिरू लागतं. उन्हाळा सरून पावसाळा येतो. ढग सूर्याला ग्रासून टाकतात. मोगोला तर पृथ्वीही दिसेनाशी होते. त्याला वाटतं, ‘सूर्यापेक्षा ढग जास्त पॉवरफूल आहे. ‘
मग काय तो ढग होतो… बरसतो. पण पाहतो तर काय, सगळं जग भिजतंय पण एक टणक खडक मात्र कोरडाच. पाण्यानं तो न फुटतो न हलतो. मोगो म्हणतो, ही खरी ताकद. त्याक्षणी तो खडक होतो.
काही दिवसांत एक माणूस येतो खडक फोडायला लागतो. मोगो पुन्हा ओरडतो आणि म्हणतो, ‘देवा मला खडक फोडणारा कर, तो खरा स्ट्राँग!’
झालं, मोगो पुन्हा दगडफोड्या होतो.
मग मोगो देवदुताला विचारतो, “म्हणजे मीच खरा पॉवरफूल आहे की काय?”
देवदूत हसतो आणि म्हणतो, “तुला मनापासून तुझं काम आवडलं, त्यात सुख वाटलं तर तूच खरा पॉवरफूल. नाहीतर तू कुणीही झालास तरी असमाधानीच राहशील. “
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈