श्री मंगेश मधुकर
☆ फाटकी नोट… ☆ श्री मंगेश मधुकर ☆
कडक उन्हाळ्याचे दिवस, ऑफिसच्या कामासाठी भर उन्हात बाहेर पडावं लागलं. गाडी चालवायचा कंटाळा आला म्हणून रिक्षा केली. तासाभरात काम आटपून परत ऑफिसला निघालो दहा मिनिटं झाली तरी रिक्षा मिळेना. चार-पाच जणांनी ‘नाही’ म्हटलं. ऑनलाइन बुकिंग पण होत नव्हतं. चिडचिड वाढली. काही वेळाने एक रिक्षा थांबली. लाल रंगाचा शर्ट,जीन्स,मानेपर्यंत वाढलेले केस अशा हँकी-फिंकी तरुण ड्रायव्हरला पाहून खात्री झाली की नकार येणार पण तो चक्क तयार झाला. त्याचा विचार बदलायच्या आधी लगबगीनं रिक्षात बसलो.
“थॅंक्यु दादा,बराच वेळ थांबलो होतो. कोणी यायला तयार नव्हतं. ”
“रिक्षासाठी पॅसेंजर म्हणजे देव. त्याला नाही म्हणायचं नसतं” रिक्षावाल्याकडून अनपेक्षित उत्तर.
“तुमच्यासारखा विचार केला तर प्रॉब्लेमच नाही पण इथं प्रत्येकाला लांबचं भाडं पाहिजे. मोबाईल नाहीतर गप्पा मारत टाईमपास करतील पण कामं करणार नाही. ”
“काहीजण तर रिकामी गाडी चालवतात पण जवळचं भाडं घेत नाहीत. अशांमुळेच पब्लिक रिक्षावाल्यांना सरसकट शिव्या घालतं. ”रिक्षावाला मार्मिक बोलत होता. चांगलाच समजूतदार निघाला. गप्पांच्या नादात कधी उतरायचं ठिकाण आलं कळलचं नाही.
“एकशे तीन झालेत. ऑनलाइन पेमेंट करतो. ”मी
“साहेब,आजची भवानी तुमच्याकडूनच. कॅश असेल तर द्या. ”
“ओके” मी पाकीटात पाहिलं तर शंभरच्या तीन नोटा होत्या. एक नोट काढली पण त्याक्षणी मनात आलं की आपल्याकडची फाटकी नोट खपवावी म्हणून मधोमध फाटेलली पण चिकटपट्टी लावलेली नोट पुढे केली. रिक्षावाल्यानं आधी हँडलला मग कपाळाला लावून नमस्कार करून नोट खिशात ठेवली. त्यावेळी मी तीन रुपयांसाठी खिसे चाचपडत होतो.
“साहेब,राहू द्या ”
“नाही असं कसं,कष्टाचे पैसे आहेत”
“पुन्हा भेटलो की द्या ” छान हसत त्यानं रिक्षा सुरू केली आणि काही क्षणातच दिसेनासा झाला.
मी एकटक पाहत राहिलो. पेहरावाच्या अगदी विरुद्ध टोकाचं रिक्षावाल्याचं आदबीचं बोलणं आणि वागणं यामुळे भारावलो. त्याच्याविषयी प्रचंड आदर वाटायला लागला आणि एकदम आपण केलेली घोडचूक लक्षात आली. अरे बापरे !! स्वार्थाच्या नादात काय करून बसलो. रिक्षावाला माझ्याशी चांगला वागला आणि मी काय केलं तर फाटकी नोट देऊन त्याला फसवलं. स्वतःची लाज वाटायला लागली. प्रचंड राग आला. अस्वस्थ झालो. काय करावं सुचेना दुसरी नोट देऊन चूक सुधारावी असं डोक्यात आल्यानं तिरमिरीत गाडी घेऊन निघालो.
काळ्या हुडची रिक्षा,नंबर माहिती नाही आणि लक्षात राहिलेला ड्रायव्हर, एवढ्या भांडवलावर शोधाशोध सुरू केली. चार-पाच चौक फिरलो. रस्त्यावरची प्रत्येक रिक्षा निरखून पाहत होतो. रिक्षा स्टँड,दुकानं,पान टपरीवर चौकशी केली पण उपयोग झाला नाही. खूप निराश झालो. अपराध भाव वाढला. फाटकी नोट बघितल्यावर तो भला माणूस आपल्याविषयी काय विचार करत असेल या जाणिवेनं बेचैनी वाढली. जवळच्या दोन-चार किलोमीटर परिसरातील जागांवर चकरा मारून अर्धा-पाऊण तासानं ऑफिसमध्ये आलो. चेहरा बघून सहकाऱ्यांनी “काय झालं” म्हणून विचारलं.
“काही विशेष नाही. नंतर सांगतो म्हणत बोलणं टाळलं आणि कम्प्युटर सुरू केला पण चित्त थाऱ्यावर नसल्यानं कामात लक्ष नव्हतं. वारंवार चुका व्हायला लागल्या.
“काय साहेब,तुमच्यासारख्या जंटलमनकडून ही अपेक्षा नव्हती” फाटकी नोट हातात घेऊन बोलणारा रिक्षावाला सारखा डोळ्यासमोर यायला लागला.
तब्येत ठीक नाही कारण देऊन ‘हाफ डे’ सुट्टी घेऊन घरी आलो. मला अवेळी आलेलं पाहून बायकोला आश्चर्य वाटलं पण तिनं लगेच काही विचारलं नाही. थोड्यावेळानं बायकोला घडलेला सगळा प्रकार सांगितल्यावर काहीच प्रतिक्रिया न देता ती एकटक माझ्याकडे पाहत राहिली.
“काय झालं असं का पाहतेस”
“साध्या साध्या गोष्टींचा किती त्रास करून घेतोयेस”
“तुला वाटती तितकी साधी गोष्ट नाहीये. एका चांगल्या माणसाला फसवलं”
“इट्स ओके,ठिक आहे. तुला चूक कळली. सुधारायचा प्रयत्न देखील केलास यातच सगळं आलं”
“अगं पण”
“असं होतं. ठरवून नाही परंतु एखाद्या क्षणी मोहाला भुलून जाणीवपूर्वक चुकीचं वागतो नंतर त्याचा खूप पश्चाताप होतो मग स्वतःलाच दोष देतो अशावेळी फक्त मनस्तापा शिवाय काही हाती लागत नाही. प्रत्येकाला हा अनुभव येतो ”.
“पण माहिती असूनही मी मुद्दाम वागलो याचाच जास्त त्रास होतोय. ”
“बास आता !! जे झालं ते झालं त्यावर उगीच जास्त विचार करू नकोस. आपल्याला मिळालेली फाटकी नोट दुसऱ्याच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न सगळेच करतात. म्हणून म्हणते तू फार मोठा गंभीर गुन्हा केलायेस असं काही नाही आणि शंभर रुपयांसाठी इतका त्रास करून घेतलाय तो पुरेसा आहे. ”
“रिक्षावाल्याचं नुकसान झालं ना”
“मग भरून देऊ. भरपाई म्हणून डबल पैसे देऊ. ”
“हा बरोबर. असंच करू”
“चल. त्याला पैशे देऊ आणि सॉरी सुद्धा म्हणू. ” बायको उपहासानं म्हणाली.
“पण तो भेटणार कसा? हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना ” मी विचारलं.
“अरे सोन्या !!,एवढं कळतयं ना मग कशाला जीव जाळतोस. एक काम कर, त्याची मनापासून माफी माग म्हणजे बरं वाटेल आणि आता हा विषय सोडून दे. होतं असं कधी कधी….. ”
बायकोनं समजावल्यानं अपराधभाव बऱ्याच कमी झाला तरी सल कायम होती. बरोब्बर शंभर दिवस झालेत अजूनही तो रिक्षावाला भेटलेला नाही. कधी भेटेल ते माहिती नाही. मी मात्र अजूनही आशा सोडलेली नाही. या दरम्यान अजून एक फाटकी नोट पाकिटात आली. ती मात्र घरातच ठेवलीय…..
उगीच पुन्हा…..
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप छान मनोविश्लेषण