सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “नावांची गंमत…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पूर्वी घरातल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव आत्यानी काहीही ठेवलं असलं तरी त्या नावाने मुलाला हाक मारली जायची नाही. प्रत्येकाला वेगळंच एखादं टोपण नाव असायचं.

तेव्हा घरात चार-पाच मुलं असायची. पहिल्या मुलाचे नाव सहसा जे कुलदैवत असेल त्याचं ठेवलं जायचं. मला वाटते की त्यानिमित्ताने देवाचं नाव घेतलं जावं असा हेतु होता.

दत्तात्रय,पांडुरंग,खंडोबा वगैरे नावं ठेवली जायची. पण त्याचे अपभ्रंश होऊन दत्या, पांड्या, खंड्या अशीच हाक मारली जायची.

माझ्या मामाचे नाव ज्ञानेश्वर होते. त्याला ज्ञाना किंवा माऊली म्हटले जायचे. ते मात्र कानाला फार गोड वाटायचे.

माझ्या मोठ्या दिरांचे नाव नरसिंह आहे. उभ्या आयुष्यात त्यांना त्या नावाने कोणीही हाक मारली नाही. त्यांना बंडू हे टोपण नाव पडले होते. तेच सगळीकडे वापरले जायचे.

बाळू हे नाव पण त्या काळी फार प्रचलित होते. नंतर बाळू नाव फार पुढे गेले नाही. कारण नंतर बाळू हा शब्द.. “जरा यडाच आहे.. ” अशा अर्थाने वापरला जायला लागला.

यांच्या एका मित्राचे नाव तर बाळ असे आहे. अगदी एक्याऐंशीव्या वर्षी सुद्धा ते बाळच आहेत… आहे की नाही गंमत..

घरात धाकटं भावंड जन्माला आलं की ते मोठ्या भावाला दादा म्हणायचं. लाडाने त्याला दाद्या.. सुद्धा म्हटलं जायचे…. अजून मुलं झाली की त्यांना तात्या, आप्पा, अण्णा,भाऊ अशा नावाने बोलवले जायचे. ते इतके सार्वजनिक व्हायचे की सगळेजण त्याच नावाने त्यांना हाक मारायचे आणि तेच नाव त्यांना आयुष्यभर लागायचे.

यांच्या एका बहिणीला पोपट असे म्हणायचे.. का ते माहित नाही… गंमत म्हणजे ते नाव त्यांच्या इतकं अंगवळणी पडलं होतं की त्यांना त्याचं काही वाटायचं नाही.

एखादी मैना पण असायची..

” काय ग चिमणे ” असं माझ्या मैत्रिणीला कधीतरी लहानपणी म्हणे तिचे आजोबा म्हणाले होते..

आता साठीतही ती चिमणीच आहे.

एखादा बोका आणि माऊ पण असायची…

सोनुल्या,छकुल्या मोठेपणी सोनाबाई छकुताई होतात..

गोडुल्या मात्र गोडुल्याच राहतात.

ठकू,ठकी तसंच राजू आणि पप्पू पण असायचे…

राजा आणि राणी ही नावं पण बरीच वर्ष राज्य करत होती.

बंटी बबली पण त्यावेळेस जोरात होते.

यात सगळ्यात मोठा भाव खाल्ला ” बेबी “या नावाने … हे इतकं प्रसिद्ध झालं होत की प्रत्येक घरी एक तरी बेबी असायचीच.. म्हाताऱ्या झाल्या तरी त्यांना त्याच नावाने हाक मारायचे..

परवाच मी बहिणीला फोन केला तेव्हा म्हटलं,

“अगं तो बेबीचा नातू आहे.. “

त्याच्यानंतर माझी नात मला विचारत होती,

“आजी बेबीला नातु कसा काय झाला? “

मी हसायला लागले. म्हटलं, “अग बेबी सत्तर वर्षाची आहे”

तिला खूप वेळ हसू येत होत.

एका मागोमाग एक मुली झाल्या तर त्यांना आक्का, ताई असं म्हटले जायचे. मग अजून मुली झाल्या की ताईची मोठी ताई व्हायची आणि दूसरी छोटी ताई व्हायची.

नंतर इतकं मोठं म्हणायला नको म्हणून तिला सुटसुटीत छोटीच म्हणायला सुरुवात व्हायची.

परवाच आम्ही आमच्या नात्यातल्या छोटीच्या पंच्याहत्तरीला गेलो होतो.

काही वेळेस हौसेनी,कौतुकाने मोठी नावं ठेवली जायची. पण इतकं मोठं नाव कोण घेणार? 

मग सरस्वतीची सरू, निलांबरीची निला,गोदावरीची गोदा,कलावतीची कला आणि कुमुदिनीची कुमुद होऊन जायची.

अगदी तीन अक्षरी नाव असेल तर तेही पूर्ण उच्चारले जायचं नाही. मालतीचं मालु, शैलजाचं शैला, सुशीलाचं सुशी, नंदिनीचे नंदा,मिलिंदचे मिल्या, मंगेशचे मंग्या होऊन जायचं…

तसंच सुनेत्रा,सुमेधा,सुरेखा,या नावातला सु काढून टाकला जायचा.

त्यामुळेच मला वाटते नंतर हेमा, शांता, सुधा,लता, नंदा,नीता अशी सुटसुटीत नावं ठेवली गेली असावीत.

अर्थातच सीमा, मीना,गंगा, चंद्रा यांना हाक मारताना जर कोणी त्यांच्यावर रागवले असेल तर सीमे,मीने, गंगे,चंद्रे होऊन जात असे.

प्राणचा खलनायक इतका गाजला की कोणी कधी आपल्या मुलाचं नाव ” प्राण “ठेवलंच नाही.

रामायणातली “कैकयी” पण एकमेवच…

आमच्या नात्यात एकांना ओळीने पाच मुली झाल्या. मग त्यांनी म्हणे नवस केला की मुलगा झाला तर त्याचे नाव ” दगडू “ठेऊ..

नेमका मुलगा झाला. तो दगडूच राहिला… परत त्याचं काही वेगळंपण वगैरे कोणाला वाटायचं नाही. त्याला प्रेमाने सगळे दगडू म्हणायचे.

माझ्या एका मैत्रिणीचे नाव ” मनकर्णिका ” असे होते. ती या नावाला फार वैतागत असे. कारण या नावाने तिला कोणी कधीही हाक मारली नाही. तिचे मनू हेच नाव प्रचलित झाले.

लहानपणी लाडानी ” गुंड्या चांगलाच खोडकर आहे ” असं कोणी म्हटलं की त्याचं नाव “गुंड्याच” पडायचं.

काही वर्षांनी कानाला ते बरं वाटतं नसावं, मग त्याचा गुंड्याभाऊ झाला असावा…

चिंटू मात्र चिंटूच राहिला.

गंमत म्हणजे लाडाने ठेवलेल्या या टोपण नावात प्रेम, माया,आपुलकी असायची. त्यामुळे त्याचा राग कधी यायचा नाही. उलट त्यात आपलेपणा वाटायचा. म्हणूनच साठीला आलेला माझा पुतण्या प्रशांत म्हणाला की, ” अजूनही मला कोणी पशा म्हटलं की मला फार आवडतं.. लहानपण आठवतं. आता असं म्हणणारे पण खूप कमी झाले आहेत… “……

वय कितीही वाढलं तरी मनाला बालपणाची ओढ असतेच…

त्या नावातला स्नेह हवाहवासा वाटतो….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments