डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ मदतीचा त्रास… ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

विशु आमची जवळची मैत्रीण.

स्वभावाने लाख, हुशार आणि मदतीस अगदी तत्पर.

गम्मत अशी, की विशूचा मनुष्य संग्रह अत्यंत मोठा… कोणतेही काम सांगा, हिच्याकडे त्यावर उत्तर तयार असते… बरं, यात तिला मोठेपणाही नको असतो… पण मदत करण्याची भारी हौस— 

हसू येईल सांगितले तर,.. पण हिच्या मदतीचा लोकांना त्रास होतो.

कसे म्हणताय?…… ऐका तर.

लेकाचे लग्न विशूने हौसेने केले. सूनबाईना वेगळा फ्लॅट आधीच घेऊन ठेवला होता. सूनबाई घरी प्रवेश करायच्या आधीच, विशूने, आपल्या हौसेने घर अगदी मस्त लावून टाकले.

सूनबाईने बघितले, आणि म्हणाली, “ मला हा नको होता फ्रीज. आणि मला हा रंग नाही आवडत भिंतींना. मला तरी विचारायचे ना आधी. ” 

…. झाले. एवढा खर्च, कष्ट करूनही दोघीही नाराजच.

तरी विशूची जित्याची खोड जात नाही. ती इतकी भाबडी आहे ना, की, समोरचा रागावूही शकत नाही.

सहज वीणा म्हणाली, “ बाई ग परवा केळवण करणार आहे, १0 माणसे यायची आहेत. , काही सुचत नाही बघ, काय मेनू करू, आणि कसे करू. ” 

विशूने तिला न विचारता, तिच्या समोरच एका बाईना फोन केला, आणि मेनूही सांगून मोकळी झाली.

वीणा म्हणाली, “ अग हे काय,. मी आहे ना इथे, मला विचार की. पैसे मी देणारे ना… आणि तुला कुणी सांगितलं मला बाई हवीय ? मी बघीन काय करायचे ते “.

ते विशूच्या गावीही नव्हते..

हल्ली लोक तिला बोलवेनासे झालेत. आली की सर्व सूत्रे हाती घेतलीच म्हणून समजा. भिडस्त लोकांना हे आवडत नाही पण बोलताही येत नाही.

…. तिलाही फटके कमी नाही बसत.. या स्वभावाचे.

कामवालीच्या उनाड मुलाला हिने नोकरी लावून दिली. ४ दिवसात मालकाचा हिलाच फोन. “ बाई कसला मुलगा दिलात–. गेला की काम सोडून. ” 

हिने विचारले कामवालीला, तर फणकाऱ्याने म्हणाली, “काय व बाई. असली नोकरी देतात व्हय? दुधाच्या पिशव्या टाकायच्या- तर कोण तिसऱ्या तर कोण पाचव्या मजल्यावर राहत्यात. पोराचे पाय दुखले, दिली सोडून नोकरी “.

…. विशू हतबुद्ध झाली.

शेजारच्या मुलीचे लग्न जमता जमत नव्हते. विशूच्या ओळखीचा एक मुलगा होता. हिने लगेच, त्या मुलीला, त्याचे स्थळ सुचवले. दोघे, भेटले, बोलले.

ती मुलगी विशूला म्हणाली, “काकू, कसला मुलगा सुचवलात हो. सगळे एकत्रच राहतात. केवढी माणसे, घरात. आणि त्याला पगारही माझ्यापेक्षा कमी. नका बाई असले मुलगे सुचवू. ”

…. बिचारी विशू.

आनंदी गुणी आहे विशू.

मागच्याच महिन्यात तिच्या नातवाची मुंज होती. मुलगा सून विशूकडे आले. म्हणाले, “ आई, कृपा कर. पण आम्हाला तुझी कोणतीही मदत नकोय. आमचे आम्ही समर्थ आहोत सगळं करायला. तुम्ही दोघे फक्त मुंजीला आणि सगळ्या कार्यक्रमाला या. ”…. थोडक्यात, तू अजिबात लुडबूड करू नकोस ही गर्भित धमकीच होती.

विशूला वाईट वाटलं. आमच्या कट्टयावर हिरमुसून बसलेली विशू बघून इतर मैत्रिणींनी विचारलं,

“काय ग काय झालं? “

विशूने घडलेली हकीगत सांगितली. आमची दुसरी मैत्रीण माया म्हणाली,

“आता तरी शहाणी हो ग बाई. तू चांगल्या भावनेने करायला जातेस पण लोकांना तुझी मदत आवडत नाही.

करू देत ग सून मुलगा हवी तशी मुंज. तू फक्त गप्प बस आणि त्यांच्या आनंदात सहभागी हो. अजिबात लोकांना यापुढे नको असलेली मदत करायची नाही. जमेल का एवढं?”

विशू म्हणाली, “ हो ग. मी हे पथ्य नक्की पाळेन. बघालच तुम्ही. ” 

आश्चर्य म्हणजे आता आमची विशू खरोखर सुधारली. कोणी विचारलं तरी सुद्धा ती हल्ली न मागितलेली मदत करत नाही की सल्ले देत नाही…

… त्यामुळे तिला सुख झाले. विशूची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.

©  डॉ. ज्योती गोडबोले 

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments