सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ मनमंजुषेतून ☆
☆ कुंभमेळा… लेखिका : सौ. प्राची सहस्रबुद्धे – वेलणकर ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
आतापर्यंत माझ्यासाठी कुंभमेळ्याचा रेफरन्स हा bollywood असल्याने, “कुंभ के मेले मे बिछड गये” हेच माहिती…
पण ह्यावर्षी काहीतरी वेगळे च! 2 /3 मैत्रिणीनी कुंभला जायचे booking केलेले. मला पण विचारलेले पण तसा काही फार इंटरेस्ट येत नव्हता, कारण ” bollywood बॅकग्राऊंड” आणि शिवाय मुलांच्या परीक्षा वगैरे होतेच. आताच भारतात जाऊन आल्याने तसेही काही पुण्याला जायचे वगैरे नव्हते..
पण नाही..कुंभस्नानाचा योग ह्यावर्षी होता..काहीतरी व्हायचे असेल तर “पुरी कायनात” ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करते. पुन्हा बॉलीवूड ज्ञान..
Dettol ची ad असते “सगळ्या germs ना संपवते” आणि मग साधारणपणे तो साबण घ्यायला बळी पडायला होते , काहीसे तसेच कुंभस्नानाबाबतीत झाले. कुंभस्नानाने सगळी पापे धुतली जातील, चक्र align होतील, अशा typeचे इतके फॉरवर्ड्स आले आणि त्यातून विशेष म्हणजे योगींनी केलेल्या व्यवस्थेचे videos. एवढ्या प्रचंड area मध्ये सामान्य लोकांसाठी बांधलेले तंबू , संत महंतांचे आखाडे, खाण्यापिण्याची व्यवस्था, सगळ्यांबद्दल बातम्या, forwards यांनी social मीडिया वर कुंभमेला गाजायला लागलेला.. मग एक दिवस मैत्रिणीला म्हणाले ,’जाऊया काय?’ तर ती तर तयारच होती , मग आणि एकीला पण विचारले..झाले .. तिघींचे जायचे तर ठरले..
आधी चर्चा झाली की 28 ला निघायचे , 29 ला शाही स्नान आणि 30 ला परत. मग कळले शाही स्नानासाठी पोचणे मुश्किल आहे, कारण सगळे रस्ते ट्रॅफिक कंट्रोलसाठी ब्लॉक करणार आहेत.
मग शाही स्नानाचा मोह सोडला. मग 31 to 2 फेब जायचे ठरवले. तिघींची सोय बघून ते त्यातल्या त्यात बरे वाटत होते, पण tickets बघितले तर खूप महाग !
मग काय कधी, कसे, असे करताना , 21 ला संध्याकाळी ठरवले, 23 ला निघू. नवऱ्याकडे पण बॉलीवूड ज्ञानच असल्याने त्याने जायला लगेच होकार देऊन तिकीट बुक करून दिले, “बरंय परस्पर काम झाले तर” असाच विचार असणार.. असा माझा दाट संशय आहे. आता घरातल्या विद्यार्थ्यांच्या exam तारखा पण फायनल कळल्या होत्या. ह्या काळात दोघांचेही अभ्यास करायचे प्लॅन नव्हते, कारण 23 ला दोघांच्या परीक्षा संपणार होत्या .
झालं मग, 23 ला वाराणसीला डायरेक्ट जायचे, 24 ला सकाळी अगदी लवकर उठून प्रयागला जायचे, संध्याकाळी परत यायचे आणि 25 ला परत. अगदी आटोपशीर..
पण देवाच्या मनात better प्लॅन होता.
23 ला आम्ही वाराणसीला 5 ला उतरलो, 6-30 ला ड्राइवर अनिल दुबेना भेटलो , तर त्यांनी सुचवले, की तसेही आताची संध्याकाळची गंगा आरती तुम्हाला मिळणार नाही, उद्या सकाळी निघायच्या ऐवजी आत्ता का निघत नाही. ‘तिथे राहायची सोय नाही’ हे कारण सांगितल्यावर , ‘ते मी बघतो’ असा त्यांनी विश्वास दिला, पण रात्रीची मेळ्याची मजा बघा- हा त्यांचा हट्टच होता. मग काय, मी बरं म्हणाले, प्रयागला जाताना वाटेत त्यांचे घर लागते तर त्यांनी घरी नेले, तिथे भरपूर पांघरूण बरोबर घेतली, घर आणि घरातले खूप छान होते. तिथून निघून 10-45 च्या आसपास प्रयाग ला पोचलो.
त्यांनी त्यांचे शब्द खरे केले. एका पुलावर गाडी उभी केली. इतका सुंदर दिसत होता मेळा. सत्य की स्वप्न प्रश्न पडावा. आम्ही आजूबाजूला लोकांना चालताना बघत होतो. लोकं 8 ते 10 किमी चालत होती, मोठ्या बॅग्स, मुलं बाळ सगळे… आम्हाला इतके लाजल्यासारखे झाले की आम्ही गाडीत निवांत बसलो होतो. लोकांच्या श्रद्धेला नमन करून, आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
खूप one ways, exit closed ह्यामधून मार्ग काढत तब्बल 45 मिनिटांनी आमच्या ड्राइवरने कुंभ मेळ्यात प्रवेश मिळवला, आणि गाडी डायरेक्ट संगमपाशी, जिथे पार्किंग होते तिथेच नेली. साधारण 11-30 झालेले , तर झोपायला कुठे जागा शोधायची? ह्यावर ड्राइवर काकांनीच ‘गाडीत झोपा’ असा तोडगा काढला. त्यांनीच अंथरूण घालून सीट फ्लॅट करून दिल्या. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी पाठ टेकली. आम्ही तिघी तशाच झोपलो.
साधारण 3 च्या आसपास जाग आली, बघितले तर एक मैत्रीण जागीच होती, म्हटलं, ‘चल, उठुया’
मग गाडीतून बाहेर आलो, काय व्यवस्था आहे ते बघायला. Lights भरपूर होते. त्यामुळे उजेड होता. Changing रूम्स, पब्लिक temporary टॉयलेट्स भरपूर होते. णी आपले आपण घेऊन जायचे असल्याने आणि आपले महान लोक तेवढे जबाबदार नसल्याने, आत सगळेच toilets स्वच्छ नव्हते , पण सरकारने केलेली व्यवस्था चोख होती. वापर करायची अक्कल नसेल तर सरकार काय करणार ! ते असो..
आम्ही फ्रेश झालो. आता आणि काय करणार असा विचार करून ब्रह्म मुहूर्तावर साधारण 3-45am च्या आसपास सरळ गंगेत डुबकी मारायला गेलो. पाणी खूप थंड होते, मी खूप थडथडत होते, पण मारल्या 4/ 5 डुबक्या. कुंभस्नान मिळेल का नाही असे वाटत असताना, देवाने ब्रह्म मुहूर्तवर स्नान घडवले. योगायोगाने तो सुनीताचा तिथीने वाढदिवस होता. मग जरा आवरून चक्कर मारायला बाहेर पडलो. कुठेतरी आत मनात “ब्रह्म मुहूर्तावर स्नान करायला हवे” ही इच्छा होती ती पूर्ण झालेली. एकदम जी मनात target achieved feeling होते. कोणालाच आम्ही ह्या कुंभमेळ्याला येण्याबद्दल सांगितले नव्हते कारण आम्हालाच खात्री नव्हती की हे घडू शकेल ..
तर अंघोळ झाल्यावर मेळ्यात tea कॉर्नरला मस्त आल्याचा चहा घेतला.
वाटेत एक आयुषवाल्यांचा टेंट दिसला, एक बाई उभी होती, म्हणून तिच्याशी बोलायला मी आत शिरले की चौकशी करावी , तर ती म्हणे, ‘आम्ही इथे फक्त टॉयलेट साठी आलोय’, इथे राहत नाही. त्यांचा उरका पडल्यावर मग आम्ही पण तिथेच नंबर लावला, भरपूर पाणी आणि स्वच्छ टॉयलेट होते. देवाने एकदम रॉयल व्यवस्था केली आमची. Adult diaper वापरावे का की काय करावे ह्या विचारात होतो तर देवाने कोणतीच कसर सोडली नाही.
आता परत किनाऱ्यावर आलो, तर गंगा स्नानासाठी बोटी सुरू झालेल्या . संगमाच्या मध्यात नेऊन स्नान .. मग आम्ही नुसते तरी जाऊ म्हणून गेलो. संगमात नुसते प्रोक्षण केले. अगदी छान वाटली बोट ट्रिप. तिथेच एक जण होती, २५ शी मधलीच असेल , ती म्हणाली, ” कितना अच्छा लग रहा हैं, सब लोग बस एकही सोच रहे है, ऐसा लगता हैं की सब एकही माँ के बच्चे हैं ” ..इतक्या साध्या शब्दात तिने तिथल्या वातावरणाचे यथार्थ वर्णन केले. Vibes का काय ते !!
सूर्योदय बोटीतून पाहिला, परत आलो तर 8-30 होत आलेले. मग एक रामकथा 9-30 ला सुरू होणार होती, तिथ गेलो. वाटेत जाताना आखाडे बघत गेलो, तिथे 2 तास बसलो आणि साधारण 11 ला परत गाडीकडे आलो आणि वाराणसीकडे निघू असे सांगितले फक्त जेवणाचा वेळ सोडला तरी जवळपास वाट काढत वाराणसीत यायला 4 वाजले. तिथे गेलो तर तिथे खूप जास्त ट्रॅफिक, त्यात बुक केलेले हॉटेल जरा आत गल्लीमध्ये. मग गाडी सोडली, चालत हॉटेलवर पोचलो. लगेच ड्रेस change करून गंगा आरतीला गेलो. बोट ride, गंगा आरती सगळं छान झालं..
एकाने अर्ध्या तासात दर्शन करवतो म्हणून गळी उतरवले आणि मी फसले. त्याच्या मागे गेलो. दर्शन होईस्तो 10-15 झाले रात्रीचे !
आधीच्या रात्री अवनीश exam म्हणून लवकर उठलेले, मग संगमावर गाडीत जेमतेम अडीच तीन तास.. त्यामुळे सकाळी 4-30 विश्वेश्वर दर्शनला निघायचं प्लॅन कॅन्सल केला. 11-15 पर्यंत पोचलो हॉटेल वर , 12 च्या आसपास झोपलो.
सकाळी परत 4-15 ला जाग !
5-30 ला आवरून हॉटेल बाहेर आलो तर लगेच समोर रिक्षा. मग संकटमोचन हनुमानला गेलो, झक्कास दर्शन झाले , फार गर्दी नव्हती.
तिथून अस्सी घाटला सूर्योदय बघितला. आदल्या दिवशी आरती घ्यायला मिळाली नव्हती , ती इथे मिळाली. तिथून मग कालभैरवला आलो, 8-30 च्या आसपास तेही झाले. मग विशालाक्षीचे दर्शन घ्यायचे ठरवले.
वाटेत वाराणसीच्या गल्ल्या मधून फिरलो, मग राम मिठाई भांडार लागले, तिथे फेमस कचोरी जिलेबीचा नाश्ता केला. मग भरपूर चालत गल्ली बोळ फिरत विशालाक्षीला आलो. वाटेत बघितलं आज विश्वेश्वराला भूतो न भविष्यती गर्दी होती. मोठ्या line लागल्या होत्या .त्यामुळे मधल्या छोट्या गल्ल्या बंद केलेल्या ..
आदल्या दिवशी दर्शन घेतले ते अगदी योग्य झालेले !
शक्ती पीठ असलेल्या विशालाक्षीचे दर्शन घेतले. मंदिर दक्षिणी पध्द्तीचे आहे पण खूप शांत वाटले. तिथली ऊर्जा जाणवत होती.
मग मात्र लगेच हॉटेल वर आलो. फ्रेश झालो व टॅक्सी बुक केली. ट्रॅफिकमुळे टॅक्सीवाल्याने मेन रोडपर्यंत म्हणजे जवळपास 2 किमी चालत यायला suggest केले , जे आम्ही मान्य केले कारण गाड्या हालतच नव्हत्या , थांबून राहिलो तर आमचीच flight मिस झाली असती.
चालत गेल्यावर लक्षात आले आमच्याकडे 1 तास हातात आहे. मग वाटेत सारनाथला जाऊ ठरले.
तिथे गेल्यावर बरीच निराशाच झाली. एवढी सुंदर मंदिरे, त्यावरचे कोरीव काम आपल्या सनातनी मंदिरांची असताना आमच्या लहानपणी कधीही अभ्यासात त्याबद्दल शिकवले गेले नाही आणि ह्या सारनाथबद्दल मात्र मलाच नव्हे तर माझ्या लेकीच्या अभ्यासात पण अजून त्याबद्दल माहिती आहे. पण काशीबद्दल नाही हे लक्षात आल्यावर चिडचिड झाली. असो .
परमेश्वराचीच इच्छा , त्याला जेव्हा प्रकट व्हायचे असेल तेव्हा तो नक्की होईलच फक्त आपला तो विश्वास कायम हवा.
एक मात्र नक्की ….
होतं ते बऱ्यासाठीच हा माझा विश्वास ह्या ट्रिपनंतर नक्कीच बळावला..
लेखिका : सौ. प्राची सहस्रबुद्धे – वेलणकर
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈