सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
☆ चौकट… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
आज निराच्या घराची चौकट उभी करण्याचा मुहूर्त होता. नुकताच नीराने- माझ्या मैत्रिणीने एक प्लॉट घेतला होता. त्यावर घर बांधायचे ठरवले होते. आर्किटेक्ट कडून प्लॅन काढून घेऊन त्याची मान्यता आहे मिळाली होती त्यामुळे नीरा आणि तिचे पती नीरज यांनी घर बांधण्याच्या कामाला सुरुवात केली होती. पाया, चौथर्यापर्यंत बांधकाम आल्यावर आज प्रमुख चौकट बसवायची होती. चौकट म्हणजे घराच्या मुख्य दरवाजासाठी असलेला भक्कम आधार! त्यानंतर बाकीच्या दारांच्या, खिडक्यांच्या चौकटी बसवायचे काम सोयी सोयीने होत राहते पण मुख्य चौकट महत्वाची! त्यामुळे आम्ही दोघेही तिच्या या चौकटीच्या मुहूर्ताला आवर्जून गेलो. तिथे कॉन्ट्रॅक्टर, कामगार लोक आलेले होतेच. तसेच तिचे जवळचे नातेवाईक “गारवा”घेऊन आले होते. अजूनही लहान गावातून घरासंबंधी कामे करताना नातेवाईकांकडून म्हणजे माहेरून, नणंदे कडून किंवा इतर बहिणी यांच्याकडून गारवा आणण्याची पद्धत आहे. ‘ गारवा’ म्हणजे जेवण घेऊन येणे. खेड्यातून हे जेवण एका टोपलीतून, बुट्टीतून घेऊन येतात. त्यामध्ये पुरणपोळ्या, पुऱ्या, गावरान भाज्या, भाकरी, ठेचा, दहीभात, वेगवेगळ्या चटण्या वगैरे जेवणाचे पदार्थ घर बांधणाऱ्यांसाठी घेऊन येतात..
कदाचित घर बांधत असलेल्या माणसाला सर्वांचे करण्याची तसदी पडू नये म्हणून हे सर्व कार्यक्रमासाठी घेऊन यायची प्रथा पडली असेल! तो ‘गारवा’ शेजारीपाजारी तसेच सर्वांना वाटला जायचा आणि ‘चौकट’ उभारण्याचा सोहळा व्हायचा.
अशा या प्रथांमुळे नवीन शेजाऱ्यांची ओळख आणि माणसे जोडण्याची एक प्रक्रिया सुरू होत असे. चौकट हे घराचा मुख्य आधार त्यामुळे घर बांधायच्या पद्धतीची जी चौकट किंवा रुढी रूढ असेल त्याप्रमाणे
ही प्रथा चालू असते. अलीकडे एकत्र कुटुंबाच्या चौकटी बऱ्याच प्रमाणात निखळून पडल्या आणि विभक्त छोटी छोटी कुटुंबे आपल्याच चौकटीत राहू लागली. त्याचे काही फायदे आणि काही तोटे आपण पाहत आहोतच!
चौकट समारंभ उरकून घरी आले आणि माझ्या मनात विविध प्रकारच्या चौकटी उभ्या राहू लागल्या. मुख्य म्हणजे वागण्याची चौकट! समाजात राहताना आपण विशिष्ट चौकटीत राहत असतो. काही नीती नियम समाजाने आखलेले असतात. कोणीही उठावे आणि काहीही करावे ही सुसंस्कृत समाजाची चौकट नसते. उदा.
कारण नसताना घरात, घराबाहेर मोठमोठ्या आवाजाने बोलणे, स्पीकर लावणे, भांडणे करणे हे असभ्यपणाचे लक्षण समजले जाते. नीती नियमांची चौकट ही नेहमी लिखितच असते असे नाही, पण ती एक समाज पद्धती असते. रस्त्यातून जाताना जोरजोरात खिदळणं, मोठ्या आवाजात बोलणं, भांडणं हे चौकटी बाहेरच असतं! त्यासाठी कायद्याची चौकट असतेच, पण त्या चौकटीचा वापर अगदी आवश्यक असेल तेव्हाच केला जातो.
काही वेळा आपल्याला असे लक्षात येते की प्रत्येक कुटुंबाची एक विशिष्ट चौकट असते. काही कुटुंबात जुन्या पद्धतीचे संस्कार असतात म्हणजे कपडे वापरण्याची पद्धत, सणवार, व्रतवैकल्य करण्याची आवड, साधी राहणी, कोणत्याही प्रकारचा भपका न दाखवणारी अशी साधी माणसे असतात. अशा घरात जर एकदम मॉडर्न वागणारी सून आली तर ती बरेचदा चौकटी बाहेरची वाटते. तिचे वागणे, केसांच्या स्टाईल्स, कपडे हे सर्व जर त्या घराच्या चौकटीत नसेल तर ते इतरांच्या दृष्टीनेही वेगळे वाटते- विसंगत वाटते! म्हणून तर आपण घराला अनुरूप अशी मुलगी घरात आणण्याचा प्रयत्न करतो किंवा आपली मुलगी देतानाही दुसऱ्या घराच्या संस्कृतीचा विचार करतो.
ही चौकटीची व्याप्ती केवळ कुटुंबापुरतीच असते असे नाही तर त्या चौकटीची व्याप्ती आपण जेवढी वाढवू तेवढी वाढते! प्रथम आपल्या कुटुंबाची चौकट, तिचा आपण विचार करतो. मग समाजाची, राज्याची, राष्ट्राची आणि सर्व व्यापक जगाची! आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा हे थोडं फार लक्षात येतं.. चुकून कोणी आपल्यासारख्या राहणीचे दिसले किंवा मराठी बोलताना आढळले की लगेच हा महाराष्ट्रीयन आहे हे लक्षात येते आणि तो ‘आपला’ वाटतो. त्यावरून आठवले की, आम्ही प्रथम जेव्हा दुबईला मुलीकडे गेलो होतो, तेव्हा एका मोठ्या मॉलमध्ये फिरताना एक बाळ रडत होते आणि त्याचे आजी- आजोबा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. बाळाची आई काही खरेदीसाठी मॉलमध्ये गेली होती, त्यामुळे बाळाला रडू येत होते. त्यांच्यातील संवाद सहज कानावर पडला तो मराठीत! त्यामुळे आम्ही थबकलो. त्यांनाही आमच्याकडे बघून आम्ही भारतीय आणि मराठी माणसे आहोत हे लक्षात आले. आम्ही आपोआपच एकमेकांशी बोलायला उत्सुक झालो आणि बोललो. तेव्हा कळले की ते दोघेही महाराष्ट्रीयन असून आमच्याच भागातील होते. आपोआपच जात, भाषा, प्रांत, देश सर्व भिंतीच्या चौकटी गळून पडल्या आणि आम्ही एकमेकांशी गप्पा मारू लागलो !बाळाला खाऊ देऊन शांत केले आणि नंतर तिथून निघालो. हेच जर चौकट सोडून आपण बोललो नसतो तर तो जिव्हाळा आम्हाला लाभला नसता!
अशीच दुसऱ्या एका कुटुंबाची आमची एका बागेत भेट झाली. ते एक मुंबईचे आजी- आजोबा ह त्यांच्या नातवाबरोबर बागेत आलेले आणि आम्हीही आमच्या लेक आणि नातवाबरोबर बागेत आलो होतो. ते मराठी भाषिक आहेत हे लक्षात आल्यावर आम्ही एकमेकांशी बोललो आणि आता त्यांची आणि माझ्या मुलीच्या कुटुंबाची घट्ट मैत्री आहे!
‘मी कशाला बोलू?’ अशा विचाराने जर एकमेकांशी बोललंच नाही तर संबंध कसे जोडले जाणार? चौकटीच्या विचारा बाहेर पडले की मैत्रीची व्याप्ती अधिक वाढते हे मात्र खरे!
आपल्याकडे पूर्वीपासून जातीपातीच्या चौकटीत फार घट्ट होत्या. त्यामुळे एक प्रकारचा दुरावा कायमच असे. कोणाची जात उच्च, कोणाची खालची, यामध्ये भली मोठी दरी असे. काळाबरोबरच आता हे दुरावे थोडे कमी झाले आहेत. शिक्षणामुळे जातीची चौकट मोडली नसली तरी ढिली झाली आहे एवढे मात्र निश्चित!
परदेशात राहताना तर अशा वेगवेगळ्या चौकटी च्या नियमांनी माणूस बांधला गेलेला असतो. कायद्याचीही एक अशी चौकट असते. कायद्याच्या चौकटीनेही मनुष्य बांधला गेलेला असतो. परदेशात तर कायद्याच्या विरोधी वागले तर शिक्षा होऊ शकते..
चौकट ही अशी माणसाच्या रोजच्या जीवनाला ही व्यापून असते. काही कुटुंब चौकटीत राहतात, असं विधान करतो तेव्हा एखाद्या कुटुंबाच्या एकमेकांसोबत राहण्याच्या पद्धतीचा उल्लेख होतो. असे लोक चटकन बाहेर मिसळत नाहीत. ट्रीप ला गेले तरी ते आपल्या चौकटीतच राहतात. कोणाला सामावून घेत नाहीत आणि कुणामध्ये जात नाहीत. पु. ल. देशपांडे यांचा एक प्रसिद्ध लेख आहे त्यात त्यांनी अशा चौकोनी कुटुंबाचा उल्लेख केला आहे. नवरा, बायको, एक मुलगा, एक मुलगी असे ते चौकोनी कुटुंब! ज्यांचे वागणे आखीव – रेखीव, सुंदर, चित्रासारखे अगदी इस्त्रीचे परीट घडीचे कपडे, सौम्य वागणे, मोठ्याने न बोलणे, न हसणे, अशा अती व्यवस्थित कुटुंबातही आपला जीव गुदमरतो! अशावेळी वाटते की चौकट असावी पण ती इतकी घट्ट नसावी की, तिचा सर्वांना ताण वाटावा, सुटसुटीत, लवचिक चौकटीत माणसाने जगावे. सतत घडयाळाच्या काट्यावर राहणारी जर चौकट असेल तर त्यांना मुक्त जीवन म्हणजे काय ते कळणारच नाही!
महाराष्ट्रीयन परंपरांचे एक चौकट असली तरी आपला पूर्ण भारत देश विविधतेत एकता अनुभवतो आपल्या देशाच्या सर्व राज्यातील लोकांमध्ये एक प्रकारची सुसूत्रता आढळते. सणवार, रिती भाती वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या असतील तरीही आपली कुटुंब पद्धती, प्रदेशानुसार खाण्यापिण्याच्या पद्धती, इतरांबरोबर सन्मानाने आचरण करण्याची पद्धती हे सर्व थोड्याफार फरकाने सगळीकडे सारखेच आहे. आत्ता बनारसच्या कुंभमेळ्याला संपूर्ण भारतभरातून लोक एका श्रद्धेने येत आहेत. गंगेत स्नान करत आहेत. देवतांची पूजा करत आहेत. तेव्हा जाणवते की ही एक मोठी संस्कृती चौकट आहे! त्या चौकटीत आपली हिंदू संस्कृती वसलेली आहे तिचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
निराच्या घराच्या चौकट कार्यक्रमाचा विचार करता करता माझ्या मनातील विचार खूप दूरवर गेले! माणसाच्या मूलभूत गरजा आणि आवडी या साधारणपणे समान असतात. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबरच माणसाला एकत्र समाज करून राहणे, नीती नियमांच्या चौकटीत आणि आचार विचारांच्या चौकटीत राहणे हे आवडते. आपल्या भारत देशाची चौकट माझ्या डोळ्यासमोर आली. तिचा आणखी विस्तार केला तर जगभरातील माणसांची जी विविधतेने नटलेली चौकट आहे तिचाही आपण स्वीकार केला पाहिजे. या सर्व मानव जातीच्या चौकटीचा मनाने स्वीकार केला तरच ‘हे विश्वचि माझे घर’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने पूर्ण होईल….
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈