सुश्री नीता कुलकर्णी
☆ “प्रेम कसंही करता येतं…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
” नीता तुझ्याशी जरा महत्वाचे बोलायचे आहे. माझ्याकडे येशील का?” पाटणकर आजींचा फोन.
” येईन की… हल्ली तुमचे पाय दुखतात म्हणून तुम्ही फिरायला येत नाही. त्यामुळे बरेच दिवसात आपली भेटही झालेली नाही. येते मग उद्या. तुमच्याकडे “
तेवढ्यात त्या घाईघाईने म्हणाल्या,
” पण एक कर.. सकाळी साडेसातला हे फिरायला जातात ना तेव्हाच ये.. यांच्यासमोर बोलता येणार नाही. “
” का बरं ?
“ अग अस फोनवर सांगता येणार नाही… घरी ये मग उद्या सांगते “
“बरं बरं “
असं म्हणून मी फोन ठेवला. काय झालं कळेना… आजोबांसमोर न सांगण्यासारख एवढं काय असेल?
दुसरे दिवशी गेले. आजी वाटच पहात होत्या. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. म्हणजे मामला जरा गंभीरच होता तर….. त्या सांगायला लागल्या…
” अगं काय आणि कसं सांगू काही कळत नाही बघ…. यांच्या माघारी असं यांच्या तक्रारी करणं प्रशस्त वाटत नाही. पण सांगते…. हल्ली यांना निरनिराळे घरचे पदार्थ खावेसे वाटत आहेत”
” अहो मग त्यात काय झालं ?”
“तसं नाही ग.. कसं सांगू ?
“म्हणजे खूप खातात का ?”
“नाही ग.. मोजकचं खातात. पण रोज नवीन फर्माईश असते. सकाळचे सकाळी… रात्री परत वेगळं करायला सांगतात. घारगे कर, डाळ फळं कर, परवा तर मोठा नारळ आणला आणि म्हणाले आज ओल्या नारळाच्या करंज्या कर. मग दोन दिवसांनी उकडीचे मोदक करायला लावले…. “
” हो का?” मलाही जरा आश्चर्यच वाटलं.
“अग विशेष म्हणजे हल्ली घरी मदत पण करत नाहीत. कधी कधी तर चादरीची घडी पण करत नाहीत.
हे ऐकून मात्र मी चाटच पडले. कारण आजोबा घरात सतत काहीतरी काम करत असायचे.
“नीता तुला एक आतलं सांगु का? मला असा संशय येतो की हे काही डॉक्टरांना दाखवण्यासारखे वाटत नाही. हे काहीतरी वेगळेच….. मनाचे दुखणे यांना झाले आहे असे मला वाटते. तुझा आनंद सायकॉलॉजिस्ट आहे तर त्याला विचारशील का?”
” हो हो चालेल चालेल… त्यालाच विचारू तुम्ही म्हणताय तसच मला पण वाटतय… बोलते मी आनंदशी “
“आणि खरंच एक मात्र सांगते बाई… कोणाला काही सांगू नकोस. “
“नाही नाही… आजी नाही कुठे बोलणार नाही. “
“अग.. तू काही कोणाला सांगणार नाहीस हे मला माहित आहे. म्हणून तर तुझ्याशी मनमोकळे बोलले ग.. यांना काय झालं असेल याची मनाला फार चिंता लागुन राहिली आहे बघ.. ”
” घाबरू नका असेल काहीतरी उपाय”
आजींना कराव्या लागणाऱ्या कामापेक्षा आजोबांची काळजी वाटत होती. त्यांचे डोळे भरून आले होते…. अगदी रडवेला झाला होता त्यांचा स्वर…..
आजींचा निरोप घेऊन घरी आले.
नंतर विचार केला आणि ठरवलं की आधी आजोबांशी बोलावे. दुसरे दिवशी सकाळीच बागेत फिरायला गेले पण ते आलेच नव्हते.
तिसऱ्या दिवशी पण आले नाहीत. मग त्यांच्या ग्रुप मधल्या लोकांना विचारलं तर ते म्हणाले…
” आजोबा आज लवकर घरी गेले. साने डेअरीत चिकाच दूध आणायला जायचं आहे असं म्हणत होते. “
– – म्हणजे आज आजोबांना खरवस खावासा वाटत होता… म्हणजे आजी सांगत होत्या ते खरंच होतं तर…
आजींचा सकाळी फोन आला.
” अगं नीता आनंदशी बोलणं झालं का?”
“नाही हो तो जरा गडबडीतच आहे. जरा शांतपणे बोलायला हव…. म्हणून… आज उद्या बोलते”
” बरं बरं असू दे असू दे… अग यांनी काल गुळाचा खरवस करायला सांगितला. दोन मोठ्या कैऱ्या आणल्या आहेत. गोड आणि तिखट लोणचं करायला सांगितलेलं आहे. तुला बोलले ना तसं अजून चालूच आहे बघ… “
” हो का ? बोलते आनंदशी. बघू तो काय म्हणतो.. “
“हो चालेल.. जसं जमेल तसा कर फोन “त्या म्हणाल्या.
सहज विचारलं..
“आजोबा कुठे आहेत?”
” आता हे रोजच्यासारखे फिरायला गेले आहेत. ” त्या म्हणाल्या.
मग मी पटकन आजोबांना भेटायला बागेत गेले. ते होतेच तिथे.
म्हणाले ” काय म्हणतेस नीता ? कशी आहेस ?”
“आजोबा आज तुमच्याशीच बोलायला आले आहे. या बसू इथे बाकावर. “
आणि मग सरळ सरळ त्यांना आजींनी जे सांगितलं ते सांगायला लागले. तसं ठरवूनच गेले होते.
ऐकताना आजोबा गंभीर झाले. शांत आवाजात म्हणाले…
” सांगतो तुला… तिने सांगितलेलं सगळं खरं आहे. “
” खरं…. अस वागताय तुम्ही आजींशी ? आणि हे नवीन पदार्थ रोज करायला सांगताय त्याचे काय?”
मी विचारलं.
” हो…. मला वाटलच होत ती तुझ्याशी बोलेल… अग ऐक… झालंय काय तिचे हातपाय हल्ली दुखतात. तिचं फिरणं बंद झालं आहे. त्यामुळे संपर्क कमी. नुसती घरी बसून कंटाळायला लागली आहे. फोन तरी किती करणार ? कुणाला करणार? मग मी ही युक्ती केली. अॅण्ड् इट्स वर्क्स… “
“म्हणजे काय?”
“आता रोज असं नवीन काही काही बनवायला सांगितलं की तिची भरपूर हालचाल होते. भूक लागते. डॉक्टर म्हणाले व्यायाम करू दे. पण ह्या वयात कसं जमणार तिला? आजपर्यंत तिने कधी काही व्यायाम केलाच नाही…. “
” हो तुम्ही म्हणताय ते पटलं मला. अचानक व्यायाम करणे कठीणच असते. “
” म्हणूनच…. नाहीतर मी तिच्याशी असं वागेन का कधी ? पण हे काही तिला सांगु नकोस “
असं म्हणेपर्यंत त्यांचे डोळे भरूनच आले होते.
खोलवर मुरलेले स्वाभाविक, निर्मळ, प्रगल्भ, बायकोचे अंतरंग जाणणारे निर्व्याज्य प्रेम त्यांच्या डोळ्यात मला दिसत होते. दोघेही या वयात एकमेकांची मनं सांभाळत होते. एकमेकांना समजून घेत होते.
आजोबांचा निरोप घेऊन निघाले.
शांतपणे विचार केला. खरंतर अशावेळी मला फार विचार करावा लागत नाही. पण ही नाजूक अशी गोष्ट होती.
दूसरे दिवशी सकाळीच आजींकडे गेले. मला बघताच त्या म्हणाल्या..
“अग ये ये “
म्हटलं,
“आनंदशी बोलले “
त्यांनी अगदी उत्सुकतेने विचारले..
“मग तो काय म्हणाला ग ?काय सांगितलं आनंदनी?”
” आधी शांतपणे बसा इथं. सगळं सांगते.. “
मग त्यांना सांगितलं…
” तो म्हणाला हे विशेष काळजी करण्यासारखं काही नाही. माणसांना या वयात जुनं फार आठवतं. अगदी पदार्थ सुद्धा आणि ते खावेसे वाटतात म्हणजे उलट आजोबा ठणठणीत आहेत. “
” खरंच असं म्हणाला आनंद ?”
” हो… खूप वर्ष काम केले शरीर दमलं की आता थोडा आराम करावा असं वाटतं शरीराला… करू दे त्यांना आराम. “
” हो ग.. खरचं.. घरची परिस्थिती यथातथाच होती. वडिलांची साधी नोकरी त्यात दोन बहिणी… त्यांची लग्नं… फार लहानपणापासूनच नोकरीला लागले हे. शिवाय संध्याकाळी एका ऑफिसात हिशोब लिहायला जायचे “
” आनंदनी असं सुचवलं आहे की तुम्ही कामासाठी कोणाची वाटलं तर मदत घ्या. तुम्हाला त्रास होत असेल तर काही कामं बाईकडून करून घ्या. तुम्ही स्वतः घरी न करता काही गोष्टी विकत आणा. “
आजींनी पटकन माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या..
“अग ह्यांना विशेष काही झालं नाही. हे कळलं आता मला चिंता नाही. मी करीन उठत बसत काम. त्यात काय ग आपल्याला सवयच असते… “
आजींचा चेहरा खुलला होता.
“नीता माझ फार मोठं काम केलस बघ. माझ्या जीवाला फार घोरं लागला होता ग…. “
“आता आजोबांची काही काळजी करू नका.. आणि मस्त काहीतरी त्यांच्यासाठी बनवा.. खुष होतील… “
आजी खुद्कन हसल्या..
” बैस ग… आता आधी आपल्या दोघींसाठी कॉफी करून आणते”
अस म्हणून आजी आत गेल्या…
त्यांचा चेहरा एकदम बदलला होता.
खरं सांगू ?….
असा निरपेक्ष निर्मळ आनंद कुणाच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला की मला फार फार समाधान होते.
आता या वयात जगायला यासारखं दुसरं काही नको….
आजींना म्हटलं होतं कोणाला सांगणार नाही पण मुद्दाम हा लेख लिहिला… आपणही शिकू आजी आजोबांकडुन…. प्रेम कसंही करता येतं ते……
हो की नाही…
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
पुणे
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वाह! किती सुंदर नातं उलगडून ठेवलंय!