श्री जगदीश काबरे
मनमंजुषेतून
☆ “तीन शब्दांची गोष्ट…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
“I Love You” हे तीन शब्द कुणी कुणालाही सहजपणाने म्हणता येऊ नयेत इतके वाईट आहेत का?
आपण आजच्या काळात जाता येता सर्रास शिव्या ऐकतो… त्याही आपल्याला सहजच वाटतात, पण कुणी ‘I love you’ हे सहजपणाने जरी बोलून गेलं तरी येणार्याजाणार्याच्या भुवया उंचावतात. अशिक्षित आणि सुशिक्षीत सगळीच माणसे याबाबतीत सारखीच.
तुमचं एखाद्यावर/एखादीवर प्रेम आहे, एखादा/एखादी तुम्हाला आवडते… हे त्याला/तिला सांगणं कसं चुकीचं आहे; हेच लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवल जातं. आणि मग हीच मुलं मोठी झाल्यावर खर्या प्रेमातही… ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’, हे साधंसं वाक्यही बोलायला कचरतात… बोलू शकत नाहीत… बहुधा घाबरतातच… कारण काही काही गोष्टी शिकवतांनाही त्या चुकीच्या पद्धतीने शिकवल्या गेल्या आहेत, असं मला बर्याचदा वाटतं.
अगदी ‘नमस्कार’ म्हणतो ना आपण ओळखणार्या प्रत्येकाला तेवढ्या सहजतेने… अगदी तस्सचं ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’, हे म्हणता यायला हवं. कारण प्रेम हे फक्त स्त्री आणि पुरुष संबंधातच असतं असं नाही; तर कोणत्याही दोन माणसात (gay and lesbian too) ते होऊ शकतं. असे घडले तरच आपण प्रेमाला सरकारात्मकतेने घेऊ शकू, आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ चा चुकीचा अर्थ काढणे बंद करू. मग जसे आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण साजरा करण्यासाठी आपण निमित्त शोधत असतो तसाच ‘व्हॅलेंटाईन डे’ हा सुद्धा आपल्याच संस्कृतीतील सण निमित्त म्हणून आहे असे समजता येईल. असे झाले तर प्रेम व्यक्त करायला एका दिवसाची गरज काय, असा उथळ प्रश्न विचारणे बंद होईल.
म्हणून मला वाटतं I love you म्हणणं हे इतकं सहजपणाने असायला हवं की, आपल्याला आवडणार्या कुणाही माणसाला ते न घाबरता म्हणता यायला हवं… जितक्या सहजपणे आपण आपला अहम दुखावल्यावर द्वेष करू लागतो. पण आजची परिस्थिती पाहता भारतात द्वेष करणे सोपे आणि प्रेम करणे तेवढेच कठीण! कारण प्रेमासाठी लागते मोकळे मन! ते किती लोकांकडे आहे?
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अगदी बरोबर!निरागस प्रेम व्यक्त करण्याचा संकोच नकोच.