सौ. गौरी गाडेकर
मनमंजुषेतून
☆ मी, तो आणि व्हॅलेंटाईन… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆
सुप्त ज्वालामुखी अचानक जागृत होऊन त्यातून लाव्हा उसळावा, तशी अचानक त्याची आठवण आली.
तशी लहानच होते मी. सहावी-सातवीत असावे बहुधा. शाळा मुलामुलींची असली, तरी मुलं-मुलं, मुली-मुली असेच ग्रूप असायचे. मी तर अगदीच लाजाळू होते. ग्रूपबाहेरच्या मुलींशीही बोलायचे नाही मी. मग मुलांची तर बातच सोडा.
फेब्रुवारीचा मध्य असावा. अचानक तो समोर आला. आमच्या वर्गातला सर्वात हुशार मुलगा. नेहमी पहिला नंबर यायचा त्याचा. मी कितीही अभ्यास केला, तरी मी दुसरीच यायचे.
तर तो अचानक समोर आला. कोणाचं लक्ष नाहीसं बघून त्याने माझ्या हातात एक कागद दिला, ” माझ्या वडिलांची बदली झालीय. हे शहर सोडून चाललोय आम्ही. यात माझा नवीन पत्ता आहे. पत्र लिही मला. नक्की. “
त्याचे डोळे अगदी काठोकाठ भरले होते. कोणत्याही क्षणी तो रडायला लागेल, असं वाटत होतं.
कागदावर त्याच्या रेखीव अक्षरात त्याचा पत्ता होता. आणि बाजूला लाल पेनने रेखाटलेला गुलाब.
मी पटकन तो कागद दप्तरात टाकला. पुन्हा समोर बघितलं, तर तो नव्हता. तो गेला होता. नंतर दिसलाच नाही.
पण तो शाळा सोडून चाललाय, म्हटल्यावर मला आनंदच झाला. आता वार्षिक परीक्षेत आणि नंतरही माझाच पहिला नंबर येणार होता.
घरी गेल्यावर दप्तर जागेवर ठेवलं. कपडे बदलून, खाऊन मी खेळायला गेले.
नंतरही त्या कागदाचं माझ्या डोक्यातूनच गेलं.
पुढे ते चिटोरं कुठे गेलं, कोणास ठाऊक! तोही डोक्यातून निघून गेला.
तेव्हा ‘व्हॅलेंटाईन्स डे’ वगैरे संकल्पना तर सोडाच, पण तो शब्दही आम्हाला माहीत नव्हता.
पण आता त्याची आठवण झाल्यावर वाटलं, की तो माझा ‘व्हॅलेंटाईन’ असेल का? किंवा नेमकं सांगायचं झालं, तर मी त्याला त्याची व्हॅलेंटाईन वाटत होते का? कल्पना नाही.
त्या दिवशी तो गेला, तो माझ्या आयुष्यातूनच गेला. नंतर तो कधीच भेटला नाही. आता भेटला, तर मी बहुधा त्याला ओळखणारही नाही. पण मी कोणाला तरी आपली व्हॅलेंटाईन वाटले, याची मला गंमत वाटली. गंमत! हो. फक्त गंमतच.
© सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
छान लेख
अप्रतिम प्रस्तुति