प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
☆ नदी आणि मी… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
अनादी अनंत तुझे ते अव्याहत वाहत जाणे ! तुझे कार्यच तसे, वाहणे ! काळाच्या कसोटीवर तुला, अनेकदा पाहिलं.. तुझं काम चोखच ! किती जणांची पापे तू धुतलीस ते तुलाच माहीत ! तुझ्या किनारी कितीतरी पिढ्यानपिढ्या गाणी गायली ! त्यांची सर्व दुःख वेदना पोटात घेऊन, तू परत स्वच्छच राहिलीस !
तुझ्या पोटातील घाण वेळोवेळी कचऱ्यासारखी बाहेर पण टाकलीस ! तो कचरा पण प्रवाहापासून अलग होऊन, दोन्ही किनार्ऱ्यांना बाजूला झाला !
तोच कचरा परत काही कालानी परत वेदना घेऊन तुझ्याच जवळ आला ! पापक्षालनासाठी ! असं अव्याहत वर्तुळ तू पूर्ण करण्यासाठीच तुझा जन्म झाला का ?
नियतीने तुला त्यासाठीच जन्माला घातले का ? तुझ्याजवळ आला तरी तो पापी पुण्यच पदरी घेऊन गेला ! तू मात्र आहे तशीच राहिलीस ! तुझ्यात यत्किंचितही बदल झाला नाही ! हेच तुझे वैशिष्ट्य जगाला दिलेस ! तुझ्याशिवाय जन्मच हा अपुरा वाटतो, व ते तेवढंच सत्य आहे ! काळाच्या पडद्याआड कितीतरी गोष्टी लपल्या ! पण ते उघड गुपित … ते गुपितच ठेवून तुझा हा अखंड प्रवास चालूच आहे !
आजन्म तृषार्ताला तू नाही म्हटलं नाहीस ! प्रत्येकाची तृष्णा तू भागवून दमली नाहीस ! तुझे हे रूप चिरतरुणच राहिले ते तुझ्या स्वभावामुळे !
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈