श्री जगदीश काबरे
मनमंजुषेतून
☆ “’पाठ’ पुराण…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
शरीराच्या ‘पाठी’चा कणा ताठ असतो जेव्हा, मनाचा व्यवहार सुरळीत चालतो तेव्हा. खरे तर आपण म्हणजे ‘पाठ’च असतो. ‘पाठी’च्या कण्यावरच तर आपली शारीरिक, नैतिक आणि मानसिक भिस्त असते. त्या कण्याच्या जोरावरच आपले शरीर उभे रहाते. आणि त्याच्या ताठपणावरच आपले भावविश्व कधी झुकते, कधी खचते तर कधी उंच उभारी घेते.
शाबासकीची थाप ‘पाठी’वरच पडते. धपाटा वा रट्टाही ‘पाठी’वरच मिळतो. तसंच सहानुभूतीचा हात ‘पाठी’वरूनच फिरतो. आपल्याला उभारी देणारा अश्वासक हातही ‘पाठी’वरच ठेवला जातो. कघी संधीकडे, कधी आयुष्याकडे, तर कधी मोहाकडे माणसे ‘पाठ’ फिरवतात. कधीकधी वाऱ्याला ‘पाठ’ देत देत संकटाना तोंड देतात. ‘पाठी’ला ‘पाठ’ लावून आलेली भावंडे एकमेकांच्या ‘पाठी’त खंजीर खुपसतात. तर कधी मित्र म्हणवणारी माणसे ‘पाठी’शी खंबीरपणे उभी रहातात.
एखाद्या ध्येयाचा, प्रश्नाचा जन्मभर ‘पाठ’पुरावा करत माणसे चळवळी उभारतात आणि पोटात माया असलेली माणसे आसऱ्याला आलेल्यांची ‘पाठ’राखण करताना मिळणारी दूषणे ‘पाठी’वरच झेलतात. राजकारणी माणसे कधी एखाद्याला शिताफीने ‘पाठी’शी घालतात, तर कधी एखाद्याच्या ‘पाठी’मागे लपतात.
घोड्याच्या ‘पाठी’वर स्वार होतात तर गाढवाच्या ‘पाठी’वर ओझे लादले जाते. परिस्थितीवशात सुसरीबाईच्या खरखरीत ‘पाठी’लाही मऊ म्हटले जाते. आणि खारीच्या ‘पाठी’वर रामाची बोटेही दिसतात.
‘पाठी’चा कणा हा सर्वार्थाने आपल्या जगण्याचा आधार असतो. म्हणूनच शरीराचा अन मनाचा व्यवहार सुरळीत चालू रहातो. कसे?
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈