🪷 मनमंजुषेतून 🪷 

☆ मनसुमने – नृत्यांगना शिल्पाची ☆ मनोगत : सुश्री शिल्पा मुकुंद मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सौ.अंजली दिलीप गोखले 

साल 2025 सुरू झाले आणि माझ्या आयुष्यातील सुवर्णकाल सुरू झाला आहे याची अनुभूती मला यायला लागली. समाजरूपी देवतेने माझ्या कर्तृत्वाचे स्मरण ठेवून मानाचा शिरपेच माझ्या मस्तकात खोवला. आपल्याच सांगली मिरज या भागातील लोकमत सखी मंच या अतिशय प्रतिष्ठित असणाऱ्या सामाजिक संस्थेने लोकमत सखी हा सन्मान देऊन मला पुरस्कृत केलं.

सुश्री शिल्पा मैंदर्गी

माझा स्वयं चा प्रवास – 

स्वयम टॉक्स म्हणजे मोबाईल वरील एक लोकप्रिय ॲप ज्याच्याबद्दल मला फारसे माहीत नव्हते. मिरज मधील प्रतिष्ठित व्यक्ती महेश जी आपटे यांच्यामार्फत माझा स्वयं टॉक या संस्थेशी संपर्क झाला. स्वयं टॉक या संस्थेचे सर्वेसर्वा श्री नवीन काळे सर यांचा मला फोन आला आणि त्यांनी माझा व माझ्या गुरु सौ धनश्री ताई आपटे यांचा 25 वर्षांचा नृत्य प्रवास त्यांना स्वयं टॉक्सच्या मंचावर आणायचा आहे यासाठी तुम्ही तयार आहात का याची विचारणा केली.

अशाप्रकारे आयुष्य समृद्ध करणाऱ्या आणि एक आनंददायी अनुभव देणाऱ्या स्वयं टॉक्स या संस्थेशी मी जोडले गेले.

स्वयं टॉक्स च्या मंचावर माझी व माझ्या नृत्य गुरु सौ. धनश्रीताई आपटे यांची मुलाखत व माझ्या नृत्याचे प्रात्यक्षिक दाखवायचे ठरले आणि याची पूर्वतयारी जवळ जवळ वर्षभर सुरू होती.

आता आपल्याला स्वयं टॉक्स च्या मंचावर आपल्या नृत्याचे सादरीकरण करायचे आहे म्हटल्यावर माझा नृत्याचा सराव सुरू झाला. नृत्यासाठी कोणती रचना निवडावी त्या गीतास कशा प्रकारचे संगीत असावे याबाबत आम्हा दोघींची चर्चा सुरू झाली. 64 कलांचा अधिपती असणारा श्री गणेश याचे स्तवन आपल्या नृत्यातून सादर करावे यावर शिक्कामोर्तब झाले. दररोज दोन ते तीन तास ताई माझ्याकडून नृत्याचा सराव करून घेत होत्या. हा सराव सुरू असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या परंतु त्यावरही मात करून आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवले.

12 जानेवारी हा दिवस सगळीकडे युवा दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी स्वयं टॉक्स च्या मंचावर आमचा कार्यक्रम करण्याचे निश्चित झाले. आम्ही 11 जानेवारीलाच मुंबईमध्ये दाखल झालो आमची राहण्याची व्यवस्था स्वयं टीमने केलेलीच होती. मुंबईत गेल्यापासून आमच्याशी वेळोवेळी फोनवरून संपर्क करून स्वयं टीमने आम्हाला खूप सहकार्य केले. हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर बांद्रा मुंबई येथे होता. या कार्यक्रमासाठी आमच्या व्यतिरिक्त अजूनही सहा वक्त्यांच्या मुलाखती होत्या. आमची सर्वांशी एकमेकांशी ओळख व्हावी आणि मुख्य कार्यक्रमाची रंगीत तालीम व्हावी या दृष्टीने कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्हा सर्वांना एकत्र बोलवले होते. मी प्रत्यक्ष पाहू शकत नसल्यामुळे मला जिथे नृत्य करायचे होते त्या रंगमंचाचा अंदाज येण्यासाठी प्रत्यक्ष रंगमंचावर नेऊन तेथील लांबी रुंदीची कल्पना मला देण्यात आली. तिथे आलेल्या सर्वच वक्त्यानी एकमेकांशी ओळख करून घेतली एकमेकांची मनापासून चौकशी केली आणि असे करता करता जणू त्या रंगमंचाशी आमचे एक मैत्रीचा नातं जुळून आले.

१२ जानेवारी हा मुख्य कार्यक्रमाचा दिवस उजाडला आम्ही सकाळी साडेआठ वाजताच बालगंधर्व रंगमंदिर वांद्रे येथे उपस्थित झालो.

स्वयंंच्या सर्व टीमने आमचे सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले आमची मुलाखत घेणारे सुप्रसिद्ध सुसंवादक डॉक्टर उदय जी निरगुडकर आमच्या आधीच तिथे उपस्थित होते. रंगमंचाचा पडदा उघडण्यापूर्वी उदयजींनी आम्हा सर्वांची अगदी प्रेमाने आणि आपुलकीने चौकशी केली आणि ओळख करून घेतली. आणि रंगमंचावरती एक खेळीमेळीचे वातावरण तयार झाले आमची मुलाखतीची भीती त्याचवेळी निघून गेली.

बरोबर दहा वाजता पहिले वक्ते श्री. हेरंब कुलकर्णी यांच्या मुलाखतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यांच्यानंतर श्री. गणेश कुलकर्णी, धनश्री करमरकर, कियारा, सौरभ तापकीर, आनंदसागर शिराळकर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती झाल्या. या सर्वांचेच अनुभव त्यांना असणारे ज्ञान ऐकून सर्वच प्रेक्षक अगदी भारावून गेले.

संध्याकाळी बरोबर पाच वाजता माझी आणि धनश्रीताईंची मुलाखत सुरू झाली. दृष्टीहीन नृत्यांगना शिल्पा मैंदर्गी आणि तिला स्पर्शाच्या सहाय्याने भरतनाट्यम नृत्य शिकवणाऱ्या तिच्या गुरु सौ. धनश्रीताई आपटे या दोघींची मुलाखत ऐकण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर झाले होते. एखादी दृष्टीहीन मुलगी भरतनाट्यम विशारद कशी होऊ शकते याबाबत सर्वांच्याच मनामध्ये प्रचंड कुतूहल होते आणि हा गुरु शिष्याचा 25 वर्षांचा प्रवास जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

डॉक्टर उदय निरगुडकर आम्हा दोघींना कोणते प्रश्न विचारणार आहेत याची आम्हाला तसूभर ही कल्पना नव्हती. उदय जी यांनी आमची मुलाखत इतक्या कौशल्यपूर्ण रीतीने घेतली की त्यामधून आमचे गुरु शिष्याचे नाते अगदी अलगदपणे उलगडत गेले. आणि आणि गेले 25 वर्षाची आमची तपश्चर्या फळाला आली.

मुलाखतीच्या शेवटी माझ्या नृत्याचे सादरीकरण होते. श्री गणेशाचे स्मरण करून मी ही रचना सादर करायला सुरुवात केली. प्रेक्षक अगदी तन्मयतेने माझी ही रचना पहात होते. त्यांना एक दृष्टीहीन मुलगी भरतनाट्यम सादर करते आहे ही गोष्टच अद्भुत वाटत होती. आणि it’s a miracle, कमाल कमाल कमाल, अद्भुत, it’s impossible, unbeliveable अशा प्रकारच्या उद्गारांनी रसिक प्रेक्षकांनी माझ्या नृत्याला दाद दिली. माझे नृत्य संपल्यानंतर प्रेक्षक जवळजवळ पाच मिनिटे उभे राहून टाळ्या वाजवत होते रंगमंदिर टाळ्यांच्या कडकडाटाने भारून गेले होते. मला टाळ्या ऐकू येत होत्या प्रेक्षक उभे राहून माझ्या नृत्याला ताईंच्या अथक परिश्रमाला दात देत होते हे माझ्या बहिणीने सांगितल्यावर मला समजले त्यावेळी मला माझ्या आई बाबांची खूप आठवण आली. त्यांच्याही जीवनाचे सार्थक झाले अशी भावना मनात निर्माण झाली. माझे आई बाबा, माझ्या दोन बहिणी, एक भाऊ यांनी मी दृष्टिहीन असूनही लहानपणापासूनच माझ्या प्रत्येक गोष्टीत मला प्रोत्साहन दिले त्यांचेही सहकार्य मला आज मनापासून आठवते. तसेच माझ्या आयुष्यात आजपर्यंत आलेल्या माझ्या अनेक मैत्रिणी यामध्ये विशेष उल्लेख करावा वाटतो त्या म्हणजे गोखले काकू, अनिता खाडिलकर, कानिटकर मॅडम यांचाही मला सतत आधार वाटत आला आहे. या नृत्यकलेमुळेच माझा हा सन्मान आहे.

अशाप्रकारे माझी आणि ताईंची मुलाखत show stopper ठरली. प्रत्येक जण आम्हा दोघींना भेटण्यास उत्सुक झाला होता. प्रत्येकाने आमच्या जवळ येऊन हातात हातात हात घेऊन आमचे अभिनंदन करून शुभेच्छा देऊन आमच्या दोघींच्या प्रयत्नांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. भारतीय संस्कृती आणि भरतनाट्यम नृत्य कलेची जोपासना करणाऱ्या आमच्यासारख्या गुरु शिष्यांच्या मुलाखतीच्या गोड आठवणी मनामध्ये साठवून ठेवून प्रेक्षक रंग मंदिरातून बाहेर पडले.

आपली ही भारतीय संस्कृती भरतनाट्यम कला अशीच उत्तुंग नेण्याची माझी इच्छा आहे हे बळ माझ्या मध्ये देण्याची मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते आहे.

पुन्हा एक वार स्वयं टॉक्स च्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद ! 

मनोगत : सुश्री शिल्पा मुकुंद मैंदर्गी

मिरज

दूरभाष ०२३३ २२२५२७५

शब्दांकन : सौ. अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

(🙏🙏 शिल्पाने दिलेले हे मनोगत खूप बोलके आहे.) 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments