सुश्री नीता कुलकर्णी
☆ “रोजच्या व्यवहारातला दासबोध…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
त्या दिवशी दासबोध वाचत होते……
” अंतरासी लागेल ढका
ऐसी वर्तणूक करू नका
जिथे तेथे विवेका
प्रगट करी…. “
हे वाचताना अचानक जोशी बाईंची आठवण आली.
मी पाचवीत असतानाची गोष्ट. शाळा नुकतीच सुरू झाली होती बाई वर्गात आल्या आणि म्हणाल्या..
” मी काय सांगते ते नीट ऐका. उद्या आपल्या वर्गात मीनल नावाची नवीन मुलगी येणार आहे. तिच्या वडिलांची इथे बदली झाली आहे. तिला आई बद्दल काहीही विचारू नका….
कारण काही दिवसांपूर्वी तिची आई देवाघरी गेली आहे. “
सगळ्या वर्गात एकदम शांतता पसरली… स्तब्धच झालो…
गरीब.. बिचारी… बापरे. तीच्यावर किती मोठं संकट आलं आहे…
एखादीला आई नाही हे केवढे दुःख….. कारण त्या वयात आई हे मुलींच सर्वस्व असतं…
किती… किती विचार आमच्या मनात आले.. बाईंच्या ते लक्षात आले.
त्या म्हणाल्या,
” मीनलला तुमच्यात सामील करून घ्या. ईथे कोणी तिच्या ओळखीचं नाही. तुम्ही तिच्याशी गप्पा मारा. तिला मदत करा… “
सुट्टीत बोलायला तोच विषय होता.
आई नाही तर तिच्या घरी स्वयंपाक कोण करत असेल, घरं कोण आवरत असेल, तिची वेणी कोण घालत असेल हा सुध्दा प्रश्न आम्हाला पडला…
दुसरे दिवशी मीनलची आम्ही वाट पहात होतो. बाईंनी तिला मध्यभागी बसवलं. त्यामुळे आम्ही तिच्या जवळ होतो. दिवसभर आम्ही तिच्या मागेमागे होतो. डब्यातला खाऊ तिला दिला. शाळा दाखवली. जे शिकवून झाले होते ते दोघींनी तर तिच्या वहीत लिहूनही दिले… काय काय केलं….
तिचे वडील तिला न्यायला आले. ती त्यांना खुशीत म्हणाली,
” बाबा मला शाळा, बाई फार आवडल्या. आज मला नव्या मैत्रिणी मिळाल्या. “
नंतर हळूहळू ती सहजपणे रुळली…
आज समजतं त्या दिवशी बाईंनी आम्हाला केवढा मोठा धडा शिकवला होता.
एखाद्याचे दुःख समजून घ्यावं.. त्याला होईल ती मदत करावी, चारचौघात त्याला त्याविषयी विचारून कानकोंडं करू नये…. मुख्य म्हणजे त्याला आपल्यात सामील करून घेऊन देता येईल तो आनंद द्यावा.
आजही जोशीबाई आणि तो वर्ग आठवतो. बाईंनी शिकवलेलं अजून लक्षात आहे.
अंतःकरण न दुखावता विवेकानी वागायचा प्रयत्न सुरू ठेवू…
रामदास स्वामी आहेत शिकवायला…
त्यांनी त्यांच्या ग्रंथातून हेच तर सांगितलेले आहे. म्हणून ग्रंथ वाचताना समजून उमजूनच वाचावा.
आज दासबोध वाचायला घेतला तेव्हा हे सर्व आठवले…
रामदास नवमी जवळ आलेली आहे तर या ओव्या पण वाचा…
” आपणांस चिमोटा घेतला
तेणे जीव कासावीस झाला
आपणा वरून दुसऱ्याला
पारखीत जावे”
*
” विचार न करता जे जे केले
ते ते वाऊगे व्यर्थ गेले
म्हणून विचारी प्रवर्तले
पाहिजे आधी”
*
“उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा
शब्द निवडून बोलावा
सावधपणे करीत जावा
संसार आपला”
*
“नरदेहाचे उचित
काही करावे आत्महित
यथानुशक्त्या चित्तवित्त
सर्वोत्तमी लावावे”
*
आपल्या दृष्टीने सर्वोत्तम कुठले आहे हे आपले आपण ठरवायचे आहे. तिथे आपले सर्वस्व पणाला लावून स्वतःची ऊन्नती करून घ्यायची आहे.
सरळ सोप्या भाषेत रामदासांनी अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत.
रामदास स्वामींचे शब्दचं इतके बोलके आहेत की वाचता क्षणी त्याचा अर्थ लागतो. मनाला भावतो.. पटतो.. खूप क्लिष्ट नसल्याने आपण तो सहज अमलात आणू शकतो…..
हळूहळू आपली प्रगती निश्चित होईल ही खात्री आहे.
आता हे पण लक्षात येत आहे की पोथी, ग्रंथ हे नुसते वाचायचे नसतात. त्यातला अर्थ, भावार्थ, गुढार्थ, समजून घ्यायचा असतो. त्यातले गुह्य काय आहे हे ओळखायचे जाणुन घ्यायचे असते.
संतांनी अपार तत्त्वज्ञान अभंग, ओव्या, भारूड, ग्रंथ, पोथ्या यातून सांगितलेले आहे.
त्यातले काही थोडे तरी.. आपल्याला घेता आले पाहिजे. ते नुसते घेऊन थांबून चालणार नाही…
तशी वागणुक करून ते आपल्या प्रत्यक्ष कृतीतून, वाणीतुन दिसले पाहिजे. तरच त्या वाचण्याला अर्थ आहे….. यातूनच आपल्या मनाची शक्ती वाढणार आहे. मनाचे श्लोक वाचताना याचे प्रत्यंतर येतेच…
आपण जसजसे वाचू लागतो तसतसे कळत जाते की वरवर दिसतो तितका हा मार्ग सोपा नाही. त्यासाठी सातत्य, प्रयत्न, निष्ठा, प्रेम, अभ्यास आणि मनापासून बदलायची तयारी हवी तरच हे जमेल.
समर्थांनी दासबोधात हे कसे करायचे ते पण सांगितले आहे.
” आलस्य अवघाची दवडावा
यत्न उदंडची करावा
शब्द मत्सर न करावा
कोणा एकाचा”
साधक होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे….
” अवगुण त्यागी दिवसंदिवस
करी उत्तम गुणांचा अभ्यास
स्वरूपी लावी निजध्यास
या नाव साधक”
समर्थांनी सांगितलेले शब्द लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागूयात. त्यातील आवडलेल्या ओव्या लिहून ठेवू. कधीही काढून तेवढ्याच वाचता येतील… त्यातील सखोल अर्थ मनात झिरपत राहील… त्यातून हळूहळू प्रगती निश्चित होईल. मार्ग दाखवायला आपला दासबोध आहेच..
जय जय रघुवीर समर्थ.
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
पुणे
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈