श्री सुहास सोहोनी
☆ याला जीवन ऐसे नाव ! ☆ श्री सुहास सोहोनी ☆
😄 ०१-५० चढती कमान !
बालपण – शिक्षण – नोकरी – कारकून – प्रमोशन – साहेब – हाताखाली चार हुजऱ्ये –
बायको खुश – मुलं खुश –
इकडे तिकडे चोहिकडे –
आनंदी आनंद गडे…
🌸
🙂५०-६० समाधान !
वरची श्रेणी – पगार – निवृत्ती – निरोप समारंभ – पेन्शन – ग्रॅच्युइटी – मुलगा, मुलगी – दोघंही IT त – चांगली नोकरी – जावई भला – सगळे पाच, सहा आकडी पगार वाले – दोन नातवंडं – साठीशांतीला कधी नाही ते बायकोचे पण कौतुकाचे चार शब्द – स्वतःचा दुमजली बंगला -”समाधान निवास !”
🌸
😊 ६०-७० बोनस !
“साठी झाल्येय् असं वाटतंच नाही तुमच्याकडे बघून !” लोकांचं मत – माझी कॉलर ताठ – मलाही तसंच वाटतं – देवाच्या दयेने तब्बेत छान – काही म्हणता काहीही तक्रार नाही – आता कधी तरी सर्दी, पडसं, खोकला हे पाहुणे अधूनमधून यायचेच – काही वेळा खोकला मात्र हटता हटत नाही – आता सत्तरीही जवळ आल्येय्. मध्येच कोणीतरी मागून ढकलल्यासारखं वाटतं! पण तरीही जगायचा कंटाळा आलेला नाही. देवानं मोठ्या उदारपणानं ही बोनस वर्षं दिल्येत, ती नाकारायची कशी ??
🌸
😔 ७०-८० नाईलाज !
सत्तरी झाली तेव्हाच वाटलं होतं, आता बस् झालं की! आता खरं म्हणजे पोथी गुंडाळून फळीवर किंवा कोनाड्यांत ठेवली जावी, हीच इच्छा. आज्ञा झाली की प्रस्थान कधीही हलवण्याची तयारी आहे. तरी पण आपल्या हातांत काय असतं? मुला-नातवंडांनी मोठ्या उत्साहाने पंच्याहत्तरी साजरी केली. पण, त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून, मी केवळ नाईलाजाने सगळ्यांत भाग घेतला.
दाढी, अंघोळ, यांसारख्या रोजच्या कामांचा सुद्धा आताशा कंटाळा येऊ लागलाय्.
आता कोणतीही गोष्ट केवळ नाईलाज म्हणून करायची !
नाईलाज – नाईलाज – फक्त नाईलाज —
🌸
😖 ८०-९० आत्मनिर्भत्सना !
कशासाठी जगतोय तेच कळत नाही. आता कशातच राम वाटतं नाही. ओझं तरी किती दिवस टाकायचं दुसऱ्यांवर? एकदा आणि एकदाचं संपव रे बाबा !
🌸
😵💫 ९०-१०० शापित भूत !
घरातील बाकीचे :
गेले अडीच तीन महिने असेच निपचित पडलेलेच असतात. जवळजवळ वीस-बाविस दिवस हॉस्पिटलमध्ये होते. नंतर डॉक्टरच म्हणाले की आता घरीच घेऊन गेलात तरी चालेल. डॉक्टरी इलाज संपले. आता कळत पण काहीच नाही. काय करायचं आपण तरी? वाट बघणे एवढेच आपल्या हातात !!!
🌸
याला जीवन ऐसे नांव !!
🍁 🍁
© श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈